विरारचा पाणकोंबडा

गेली तीन वर्षे लाजऱ्या व गवतात लपणाऱ्या पाणकोंबड्याचे छायाचित्रण करण्याचा मी प्रयत्न करीत होतो; पण त्याला यश येत नव्हते.
Waterfowl
Waterfowlsakal
Summary

गेली तीन वर्षे लाजऱ्या व गवतात लपणाऱ्या पाणकोंबड्याचे छायाचित्रण करण्याचा मी प्रयत्न करीत होतो; पण त्याला यश येत नव्हते.

- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

गेली तीन वर्षे लाजऱ्या व गवतात लपणाऱ्या पाणकोंबड्याचे छायाचित्रण करण्याचा मी प्रयत्न करीत होतो; पण त्याला यश येत नव्हते. वन्यजीव छायाचित्रण म्हणजे चिकाटी व संयम असते, त्याचाच प्रत्यय विरारमध्ये अलीकडे पाणकोंबडा शोधताना आला. तब्बल पाच तासांच्या प्रतीक्षेनंतर त्याने पुन्हा क्षणभरासाठीच दर्शन दिले. प्रदीर्घ प्रतीक्षा केल्यानंतर ‘वॉटर कॉक’ची छायाचित्रे मिळाली आणि पक्षी छायाचित्रांचा संग्रह समृद्ध झाला.

जूनची २ तारीख असावी. संध्याकाळी क्लिनिकमध्ये असताना अचानक मयूर केळस्करचा फोन आला. म्हणाला, ‘‘सर, ‘वॉटर कॉक’ दिसत आहेत.’’ मयूर हा विरारमध्ये राहणारा एक गुणी पक्षीनिरीक्षक. विरार परिसरात शिल्लक असलेल्या काही हरित पट्ट्यात फिरून पक्षी निरीक्षण, छायाचित्रण करणारा व त्यांची नोंद ठेवणारा हा युवक तिथे पक्षीनिरीक्षण करू इच्छिणाऱ्या सर्वांना मदत करण्यास तत्पर असतो. त्याच तत्परतेने मयूरने वॉटर कॉकची माहिती दिली. गेली तीन वर्षे या लाजऱ्या व गवतात लपणाऱ्या पाणकोंबड्याचे (वॉटर कॉक) छायाचित्रण करण्याचा मी प्रयत्न करीत होतो; पण त्याला यश येत नव्हते. नाही म्हणायला कोरोनाच्या काही दिवस आधी आम्ही अंदमानला छायाचित्रणाकरिता गेलो असताना तेथील सिप्पी घाट परिसरात या वॉटर कॉकची मादी पाहिली होती. तिचे छायाचित्र टिपले होते; पण ते फार लांबून. समाधानकारक मुळीच नव्हते.

गेल्या वर्षी कोरोनाचा जोर असतानाही एके रविवारी डॉ. रजनीश व मयूरसोबत विरारच्या विवा येथील पाणथळ भागात या ‘वॉटर कॉक’करिता गेलो होतो. त्या वेळी चार तास तो परिसर पिंजून काढला; मात्र छायाचित्र मिळाले नव्हते. त्यामुळे आता काहीही करून पाणकोंबड्याचे छायाचित्रण करायचेच असे ठरवले होते. मयूर लवकर येण्यास सांगत होता, कारण पावसाने जोर धरला व विरारच्या पाणथळ जागी पाण्याची पातळी वाढली तर पाणकोंबडे दिसण्याची शक्यता कमी झाली असती. तिथे लवकर जायचे होते; परंतु ४/५ जूनला भीमाशंकरला जायचे आधीच ठरले होते. त्यामुळे त्या रविवारी जाता येणे शक्य नव्हते. बरं आठवड्याच्या मधल्या दिवशी जाणे म्हणजे क्लिनिकला दांडी मारावी लागली असती. त्यामुळे आम्ही १२ तारखेला जायचे निश्‍चित केले. आताशा विरारमध्ये अनेक नव्या इमारती व हाऊसिंग कॉम्प्लेक्स होत आहेत व त्यामुळे हरित पट्टे कमी होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत पुढच्या वर्षी वॉटर कॉक तिथे दिसेलच याची खात्री नाही.

पहाटे ४.३० ला मित्र अमेय भावेसोबत विरारसाठी निघालो. गुगल नकाशावर ट्राफिक अजिबात दाखवत नव्हते. त्यामुळे आम्ही खुश होतो; पण ओवळा परिसर पार करताच संपूर्ण ट्राफिक जाम झाले होते. त्यामुळे विरार-विवा येथे पोहोचायला ६.३० वाजले. वाटेत मयूरला सोबत घेतले. मयूर आम्हाला योग्य ठिकाणी घेऊन गेला. इथेच आदल्या दिवशी डॉ. राजनीशने ‘वॉटर कॉक’चे छायाचित्रण केले होते. रजनीशही आम्हाला सोबत म्हणून तिथे थोड्याच वेळात पोहोचला. अजूनही काही छायाचित्रकार आले होते; परंतु त्यांना बहुधा हे ठिकाण माहीत नसावे. ते विरुद्ध बाजूला लांब उभे होते. थोड्याच वेळात ‘वॉटर कॉक’ची मादी गवतातून बाहेर आली व तिने छान छायाचित्रे टिपण्याची संधी दिली. काही वेळात अजून तीन माद्या तिथे आल्या. आम्ही एका झाडामागे लपल्यामुळे त्या बऱ्यापैकी जवळ आल्या. ‘बदामी तापस’ असे रजनीश कुजबुजला. गवती झुडुपाच्या किनाऱ्याला हा बदामी तापस अक्षरशः गोल चेंडूसारखा स्तब्ध बसून होता. जणू काही मातकळ दगडच. इतक्या जवळून व उघड्यावर या बदामी तापसाला प्रथमच पाहत होतो. त्याचीही छान छायाचित्रे मिळाली व तेवढ्यात आभाळ भरून आले.

थोडा काळोख झाला आणि नेमका त्याच वेळी ‘वॉटर कॉक’ एका झुडुपातून बाहेर आला. क्षणार्धात दुसऱ्या झुडुपात शिरला. जेमतेम क्षणभरच त्याने दर्शन दिले. त्या वेळी जमतील तशी त्याची छायाचित्रे टिपून घेतली. कमी प्रकाशातील छायाचित्रे होती; त्यामुळे आम्ही अजूनही थांबायचे ठरवले. ९ वाजता मयूर व रजनीश निघून गेले. मी व अमेय मात्र वॉटर कॉकची चांगली छायाचित्रे मिळतील या आशेने चक्क ११ वाजेपर्यंत थांबलो; परंतु तो काही दिसला नाही. आम्ही निघणार इतक्यात झाडीतून पुन्हा क्षणभरासाठीच ‘वॉटर कॉक’ पुन्हा बाहेर आला व लगेच झाडीत शिरला. सुमारे पाच तासांच्या प्रतीक्षेनंतर त्याने पुन्हा क्षणभरासाठीच दर्शन दिले होते. वन्यजीव छायाचित्रण म्हणजे चिकाटी व संयम असते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. तीन वर्षे वाट पाहिल्यानंतर आता कुठे त्या ‘वॉटर कॉक’ची छायाचित्रे मिळाली होती व त्या आनंदातच आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com