मेहेरबान डॉलर बर्ड!

पक्ष्यांचे छायाचित्रण करण्याकरिता मला देशातील विविध दुर्मिळ भागात जाण्याची संधी मिळाली. काही माहिती असलेले, तर काही अनोळखी ठिकाणी जातानाचा अनुभव भन्नाट होता.
Dollar Bird
Dollar BirdSakal
Summary

पक्ष्यांचे छायाचित्रण करण्याकरिता मला देशातील विविध दुर्मिळ भागात जाण्याची संधी मिळाली. काही माहिती असलेले, तर काही अनोळखी ठिकाणी जातानाचा अनुभव भन्नाट होता.

- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

कोचीवरून वालपराईला मिनी बसमधून जात असताना एका वळणावर आमचा मार्गदर्शक अचानक ‘डॉलर बर्ड’ असे ओरडला. डावीकडे रस्त्यावरून अगदी जवळ एका उघड्या खोडावर तो बसला होता. घाईघाईत सर्वांनी कॅमेरे काढले आणि त्याची छायाचित्रे टिपणे सुरू केले. आमची गाडी मागे-पुढे होत असतानाही डॉलर बर्ड जागचा हलला नाही, बहुदा तो आमच्यावर मेहेरबान होता!

पक्ष्यांचे छायाचित्रण करण्याकरिता मला देशातील विविध दुर्मिळ भागात जाण्याची संधी मिळाली. काही माहिती असलेले, तर काही अनोळखी ठिकाणी जातानाचा अनुभव भन्नाट होता. माहीत असलेल्या ठिकाणी गेल्यास तेथे अमुक काही पक्षी हमखास दिसतील, याची खात्री असते. अशा ठिकाणी ग्रुप घेऊन गेल्यास निराशा होत नाही; मात्र माहीत नसलेल्या ठिकाणी तेथील पक्षी शोधून त्यांचे छायाचित्रण करण्यात वेगळीच मजा असते. उत्सुकता, उत्कंठा वाढते. अशा अज्ञात ठिकाणी जरी पक्षी संख्येने कमी दिसले, तरी त्यात समाधान अधिक असते. आपण एक नवीन ठिकाण शोधल्याचा आनंद असतो. अशा ठिकाणी नेमका कुठला पक्षी, कधी समोर येईल सांगता येत नाही. त्यामुळे हा अचानक मिळणारा आनंद पक्षीदर्शनाचा अविस्मरणीय क्षण ठरतो. त्यात कधी कधी मोठ्ठं घबाडही सापडत असतं, जे आयुष्यभर आपल्यासाठी यादगार ठरत असतं.

अंदमानचा दौरा केला तो मुख्यतः तेथील घुबडे पाहण्यासाठी. पाच दिवसांत तब्बल ११० पक्ष्यांचे निरीक्षण व त्यांचे छायाचित्रण केले. शोलबे परिसरात पक्ष्यांचे छायाचित्रण करताना अचानक एका उंच झाडाच्या वरच्या फांदीवर हा ‘डॉलर बर्ड’ दिसला. पहिल्यांदा त्याचे छायाचित्रण केले; पण फार दुरून. गतवर्षी लाटपंचर येथे पक्षी छायाचित्रणासाठी गेलो असता शिवखोला येथे जाताना खोल दरीतील एका झाडाच्या शेंड्यावर हा बसलेला दिसला. तेव्हाही फार दूरच होता. अतिशय सुरेख दिसणारा हा पक्षी त्याच्यावर व्यवस्थित सूर्यप्रकाश पडला, तर त्याचा मोरपिशी-निळसर रंग चमकतो. मानेचा रंग जांभळा-मोरपिशी असतो. चोच लाल असते. पंख पसरले की त्यावर नाण्याच्या आकाराचे चिन्ह दिसते आणि म्हणूनच त्याला डॉलर बर्ड म्हणतात. हा दिसणे फार दुर्मिळ नक्कीच नाही; मात्र चांगले छायाचित्र मिळणे मात्र कठीण असते. कारण हा खूप सावध व लाजरा असतो आणि बहुतेक वेळा दूरवरच दिसतो.

मागील आठवड्यात वालपराई व अण्णामलाई येथे पक्षी छायाचित्रणार्थ ग्रुप घेऊन गेलो. हा प्रदेश अजून पक्षी छायाचित्रणाकरिता फारसा परिचित नाही. त्यामुळे आमच्या मार्गदर्शकाने जरी आम्हाला संभाव्य दिसणाऱ्या पक्ष्यांची यादी पाठवली असली, तरी फार पक्षी दिसत नव्हते. मात्र कोचीवरून वालपराईला मिनी बसमधून जात असताना एका वळणावर आमचा मार्गदर्शक अचानक बस थांबवायचा इशारा करू लागला, ‘डॉलर बर्ड’ असे ओरडला व बस रिव्हर्स घ्यायला सांगू लागला. आम्ही कॅमेरा अजून बॅगेतून काढलेच नव्हते. कारण पूर्वानुभवावरून हा पक्षी दूरवर असेल, असेच वाटले आणि बस त्याच्या समोरच थांबली. डावीकडे रस्त्यावरून अगदी जवळ एका उघड्या खोडावर, आमच्या अगदी समोर बसला होता. आता मात्र आमची तारांबळ उडाली. घाईघाईत सर्वांनी कॅमेरे काढले, लेन्स काढली, ती कॅमेऱ्यावर बसवली व जसे जमेल त्या कोनातून त्याची छायाचित्रे टिपणे सुरू केले. हा पक्षी पुन्हा इतका जवळ कधीच दिसणार नाही, हे आम्हाला ठाऊक होते.

बसमधून खाली उतरलो, तर हा नक्कीच उडणार, हे माहीत होते. त्यामुळे बस पुढे-मागे करून प्रत्येकाला त्याचे समोरून छायाचित्र टिपण्याची संधी दिली. डॉलर बर्डदेखील आमच्यावर मेहेरबान होता. इतकी हालचाल होऊनही तो जागचा हलला नाही. सर्वांचे छायाचित्रण आटोपले तोच हा भुर्रकन उडाला. जणू केवळ आम्हाला त्याचे छायाचित्रण करता यावे म्हणूनच तिथे तो बसला होता. सर्वांनाच त्याची चांगली छायाचित्रे मिळाली. या दौऱ्यात त्यानंतर अजूनही काही पक्ष्यांची व प्राण्यांची छायाचित्रे टिपता आली; परंतु ‘डॉलर बर्ड’चे ते दर्शन व त्याच्या छायाचित्रणाचे ते क्षण कायम लक्षात राहतील.

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com