जंगल भ्रमंतीचा त्रिवेणी संगम

Karnala Bird Sanctuary
Karnala Bird Sanctuarysakal media

जंगल भ्रमंतीचा त्रिवेणी संगम

कर्नाळा खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचे असेल, तर पायवाटांवरून चालण्याशिवाय पर्याय नाही. जंगल धुंडाळून काढण्यासाठी या अभयारण्यात चार वेगवेगळ्या पायवाटा आहेत. प्रत्येक पायवाट जंगलाचे वेगळे दर्शन घडवून आणते. पायाखाली पानांचा खच, आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट, वेली, छोट्या झुडपांवर वावरणारे लहान-मोठे कीटक आणि मधूनच नजरेस पडणारे सरपटणारे प्राणी एक दिवसाची जंगलसफर अवस्मरणीय करून टाकतात.

मुंबईबाहेर पडल्यानंतर पनवेलच्या पुढे गोव्याच्या रस्त्याला लागताच एक उंच अंगठ्यासारखा सुळका लक्ष वेधून घेतो. लांबून छोटासा दिसणारा सुळका अंतर कापायला लागल्यावर अधिक ठळकपणे आपले अस्तित्व अधोरेखित करतो. समुद्रसपाटीपासून दीड हजार फूट उंचीवर असलेला हा सुळका म्हणजे कर्नाळा किल्ला.

प्राचीन काळी पनवेल व चौल बंदरादरम्यान होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाळा किल्ल्याचा वापर होत असे. आजच्या काळात किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व कमी झाले असले, तरी पायथ्याशी असलेले अभयारण्य हा संरक्षित प्रदेश म्हणून राखीव आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जंगलात आढळणारे दीडशेहून अधिक पक्षी. ट्रेकिंग, जंगलसफारी आणि पक्षीनिरीक्षण असा त्रिवेणी संगम कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या भेटीदरम्यान साधता येतो.

पश्चिम घाटांच्या डोंगररांगेत कर्नाळा अभयारण्य आहे आणि या त्याच्या गर्द झाडीतून उभ्या चढणीच्या प्रशस्त वाटेवरून अडीच तास ट्रेकिंग करत गेल्यास कर्नाळा किल्ल्यावर पोहोचता येते. एकेकाळी कर्नाळा किल्ला व्यापारीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असला, तरी सध्या तो फारसा चांगल्या स्थितीत नाही. अतिशय छोटासा माथा असलेल्या किल्ल्याची तटबंटी, वाडा, देवीचे मंदिर, दगडांमधील पाण्याची नैसर्गिक टाकी, धान्याची कोठारं आणि इतर बांधकाम पाहण्यासारखे आहे. किल्ल्यावरील सुळक्याची उंची आणि विस्तार अचंबित करणारा असून, तो चढण्यासाठी प्रस्तरारोहणाचे तंत्र आणि योग्य साहित्य असावं लागतं.

कर्नाळा पक्षी अभयारण्याला जाताना पक्ष्यांविषयी थोडी माहिती आणि जंगलाचे काही नियम समजून घेतल्यास अभयारण्याची भेट खऱ्या अर्थाने आनंददायी ठरते. याचे कारण कुठल्याही सर्वसामान्य माणसालाही आजूबाजूला नीट निरीक्षण केल्यास पंचवीस-तीस पक्षी सहज दिसतात. सुतारपक्षी, कोतवाल, तांबट, मोर, हरियाल, घुबड, भारद्वाज, दयाळ, गरूड, घार, पोपट, बगळा, बुलबुल आदी माहितीतले पक्षी आजूबाजूला किलबिलाट करताना दिसत राहतात. ज्यांना पक्षीनिरीक्षणाची खरंच आवड आहे, त्यांनी पक्षी अभ्यासकांसोबत अभयारण्याला भेट देणं अधिक संयुक्तिक ठरतं. कर्नाळा अभयारण्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये भेट दिल्यास स्थलांतरील पक्षीसुद्धा पाहता येतात. पक्ष्यांसोबतच माकडे, मुंगूस, ससे, रानडुक्करही नजरेस पडतात. अभयारण्यात बिबट्याचाही वावर असल्याचे सांगितले जाते. यावरून जंगलाची समृद्धी लक्षात येते.

अभयारण्याचे जंगल अनुभवणे हासुद्धा एक वेगळा अनुभव आहे. येथील वृक्षसंपदेची पर्यटकांना माहिती व्हावी, यासाठी वनखात्याने झाडांवर त्यांच्या प्रजातींची नावे लिहिलेली पाहायला मिळतात. विविध प्रकारच्या औषधी व दुर्मिळ वनस्पतींचीही माहिती या जंगलसफरीमध्ये होते. अभयारण्याला खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचे असेल, तर पायवाटांवरून चालण्याशिवाय पर्याय नाही. जंगल धुंडाळून काढण्यासाठी कर्नाळा अभयारण्यात चार वेगवेगळ्या पायवाटा आहेत. प्रत्येक पायवाट जंगलाचे वेगळे दर्शन घडवून आणते. पायाखाली पानांचा खच, आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट, वेली, छोट्या झुडपांवर वावरणारे लहान-मोठे कीटक आणि मधूनच नजरेस पडणारे सरपटणारे प्राणी एक दिवसाची जंगलसफरही अवस्मरणीय करून टाकतात; पण तुम्ही जंगलसफारी पहिल्यांदा करणार असाल, तर वाटाड्याला सोबत न्यायला विसरू नका.

nanawareprashant@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com