स्काय सिटीत पर्यटकांची गर्दी मोठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्काय सिटीत पर्यटकांची गर्दी मोठी

स्काय सिटीत पर्यटकांची गर्दी मोठी

गगनबावडा : निसर्गाचा चमत्कार, इतिहासाचा साक्षीदार, आध्यात्मिक पिठाचा वारसदार असणारे, प्रति महाबळेश्वर म्हणून संबोधले जाणारे गाव म्हणजे गगनबावडा. अर्थातच, स्काय सिटी! कोरोना काळात ठप्प झालेले पर्यटन आता मुक्त झाले. गगनबावडा परिसर गर्दीने फुलला आहे. सध्या परिसरात नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याने निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या गगनबावड्यातील हॉटेल व्यवसायिक, टपरीवाले, दुकानदार, फेरीवाले यांना सध्या 'अच्छे दिन' आले आहेत.

जैवविविधता, अनेक प्रकारची फुलपाखरे, झाडे, वेलींनी नटलेल्या ऐतिहासिक गगनगडावर रोज सातशे ते आठशे पर्यटक रोज भेट देत आहेत. शासनाने परवानगी दिल्यास दोन वर्षे बंद असलेला दत्तजयंती उत्सव भक्त व पर्यटक यांना पर्वणी आहे. येथे व्यापारी उलाढाल २५ लाखांच्या आसपास असते, असे विश्वस्त रमेश माने यांनी सांगितले. सध्या पर्यटकांना राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची सुविधा व इतर हॉटेल्सही आहेत. ती शाकाहारी, मांसाहारी, मत्स्याहारी स्वादासाठी पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरवत स्वागतासाठी उभी आहेत.

हेही वाचा: पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस ची पाईप लाइन फुटून आग

ठिकाणे अशी

ऐतिहासिक गगनगडाशिवाय करूळ-भुईबावडा घाट, सांगशी येथील पाचव्या शतकातील चालुक्यकालीन शिलालेख, पळसंबे येथील पांडवकालीन गुंफा, कुंभी, वेसरफ व कोदे येथील जलाशय आदी अनेक नयनरम्य ठिकाणे पर्यटकांना खुणावतात.

गगनबावडा चौकात चहाची गाडी आहे. बँकेचे कर्ज काढलेले असून, कोरोना काळात पर्यटन बंद असल्याने बँकेचा कर्जाचा हप्ता भरताना दमछाक झाली. रोजीरोटी चालविणे अवघड झाले. सध्या बरे दिवस आले आहेत. निदान कर्जाचा हप्ता तरी भरता येईल.

  • आशिम पाटणकर, चहाची टपरी व्यावसायिक

  • निसर्गाची मुक्त हस्ते उधळण

  • रोज ७००-८०० पर्यटकांची भेट

  • उलाढाल २५ लाखांच्या आसपास

  • नागराज मंजुळेंच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू

"महाबळेश्वरचे आता शहरीकरण झाले आहे. मात्र, गगनबावड्याचे हवामान व रमणीय निसर्ग पाहून पुणे, मुंबईच्या पर्यटकांना गगनबावडा हवाहवासा वाटतो. कोरोना काळात खूप त्रास झाला. पण, आता ‘अच्छे दिन’ आले आहेत."

- जगन्नाथ शेट्टी, व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, गगनबावडा

loading image
go to top