
Monsoon Destinations in South India: बेळगाव जिल्ह्यातील गोडचिनमलकी धबधबा, ज्याला मार्कंडेय धबधबा म्हणूनही ओळखले जाते, पर्यटकांसाठी ते एक लोकप्रिय स्थळ ठरत आहे. विशेषत: जून ते ऑक्टोबर या काळात या ठिकाणाचे निसर्गसौंदर्य अधिक वाढते. बेळगाव शहरापासून ५१ तर गोकाकपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर स्थित मार्कंडेय नदी निसर्गसौंदर्याने नटलेल्या दरीमधून वाहते. त्यामुळे येथील धबधबा मनमोहक आहे.
अलीकडच्या काळात गोडचिनमलकी धबधब्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. पावसाळ्यापूर्वीचे आल्हाददायक हवामान आणि पावसाळ्यात धबधब्याचे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करत आहेत. विशेषत: कुटुंबे, निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंगचे शौकीन या नयनरम्य ठिकाणाकडे आकर्षित होतात.
गावापर्यंत जाण्यासाठी परिवहन मंडळाच्या बसेससह खासगी प्रवासी सेवा पुरेशा प्रमाणात आहेत. वर्षा पर्यटनाच्या काळात गोकाक फॉल्स येथून गोडचिनमलकीला प्रवासी वाहने सोडली जातात. यानंतर सुमारे दीड किलोमीटरची पायवाट आहे. त्यामुळे प्रत्येकाला या ठिकाणी ट्रेकिंगचा अनुभव घेत येतो.
पर्यटकांची संख्या वाढत असल्याने येथील स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. गावात आणि आजूबाजूला भोजनालये आणि स्टेशनरी दुकानांची संख्याही वाढत आहे. पूर्वी या ठिकाणी स्थानिक पर्यटकांची गर्दी होत होती; पण आता बेळगावात पर्यटनासाठी येणारे पर्यटक हमखास या ठिकाणाला भेट देतात. एक दिवसाची सहल म्हणून देखील एक चांगले पॅकेज इथे तयार केले जाते.
परिवहन मंडळाकडून दरवर्षी पावसाळ्यात पर्यटन विशेष बस सुरू केली जाते. ही बस सकाळी साडेसात वाजता बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकावरून सुटून गोकाक फॉल्सला पोहोचते. त्या ठिकाणी काही काळ थांबून नंतर ही बस गोडचिनमलकीला रवाना होते. तिथे भेट दिल्यानंतर बस हिडकल डॅमला जाते. असे तीन पर्यटनस्थळ केल्यानंतर बस प्रवासी घेऊन सायंकाळी सात वाजता बेळगावचा परतीचा प्रवास करते. ही तिन्ही स्थळे एकमेकांजवळ आहेत.
वर्षभर या धबधब्याला पाणी राहते. त्यामुळे या ठिकाणी कधीही पर्यटनासाठी म्हणून जाता येते; पण बेळगावकर वर्षा पर्यटनासाठी म्हणून या स्थळाला निवडतात. कारण, पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य आणखी खुलून निघालेले असते. धबधब्याच्या शेजारी माळरान असल्याने अनेकजण या ठिकाणी जाऊन स्वयंपाक करण्याचा देखील बेत आखतात. सहकुटुंब जाण्यासारखे हे स्थळ असल्याने बेळगावकरांच्या पसंतीला उतरलेले आहे. पर्यटन विभागाने देखील या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढू लागलेली असल्याने अनेक सुरक्षात्मक उपाय आणि खबरदारीच्या सूचनांचे फलक बसविले असून पर्यटन विकासाला देखील चालना दिली जात आहे.
- विनायक जाधव
(सकाळ अर्काईव्हमधून)