esakal | मुंबईच्या फुप्फुसाची सफर | Trip
sakal

बोलून बातमी शोधा

Trip
मुंबईच्या फुप्फुसाची सफर

मुंबईच्या फुप्फुसाची सफर

sakal_logo
By
प्रशांत ननावरे

उद्यानाच्या आत पाऊल ठेवताच डोक्यावर झाडांचं छप्पर येतं. गाड्यांच्या कर्कश हॉर्नच्या आवाजाची जागा पक्ष्यांचा किलबिलाट घेतं आणि शहराच्या गर्दीमध्ये घुसमटणारा श्वास मोकळा होऊन जातो. हे ठिकाण म्हणजे मुंबईच्या मध्यभागी असलेलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ज्याला मुंबईचं फुप्फुस म्हटलं जातं...

मुंबईकर काँक्रीटसोबतच झाडांचं जंगल असलेल्या शहरात राहतो. त्यामुळे आठवडाभराच्या कामाचा क्षीण घालवायचा असेल, तर चित्रपटात ज्याप्रमाणे डोळे मिटल्यावर एका वेगळ्याच जगात प्रवेश केल्याचं दाखविलं जातं, तसं इथं करण्याची सोय उपलब्ध आहे. आपण बोलतोय मुंबईच्या मध्यभागी असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाविषयी, ज्याला मुंबईचं फुप्फुस म्हटलं जातं. तुम्ही कधी या फुप्फुसांच्या पोटात नेमकं दडलंय काय, हे जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय का? काहींनी नक्कीच केला असेल, तर काहींनी नाही; पण ‘एसजीएनपी’ असं ठिकाण आहे, जे कित्येक भेटी दिल्या तरी पूर्ण पाहून होणार नाही. त्याचं आणखीन एक कारण म्हणजे प्रत्येक ऋतूमधलं जंगल वेगळं असतं. म्हणूनच कोणताही ऋतू असो, शहराच्या कोलाहलातून बाहेर पडायचं असेल, तर शहराच्या बाहेर जाण्याची आवश्यकता नाही.

मुंबई महानगराच्या मध्यभागी १०३ चौ.कि.मी. जागेवरील या जंगलामध्ये बोरिवली, गोरेगाव, मुलुंड, ठाणे अशा वेगवेगळ्या ठिकाणांवरून प्रवेश करता येतो. जंगलाच्या सीमेवरील भागात नागरिकांना प्रवेश असला, तरी वन्यप्राण्यांचा अधिवास असल्यामुळे घनदाट जंगलात जाण्याची सामान्य नागरिकांना परवानगी नाही; तरीही जंगलाचा जो भाग नागरिकांसाठी खुला आहे, त्यावरील जैवविविधता अचंबित करणारी आहे. ‘एसजीएनपी’मध्ये वाहनांना प्रवेश असला, तरी जंगल जवळून पाहायचे असेल, तर सायकल भाड्याने घेऊन फिरण्यात खरी मजा आहे. त्यासाठी प्रवेशद्वारावरच असलेल्या सायकल स्टॅन्डवर सायकली तासाच्या हिशेबाने भाड्यावर मिळतात.

उद्यानाच्या आत पाऊल ठेवताच डोक्यावर झाडांचं छप्पर येतं, गाड्यांच्या कर्कश हॉर्नच्या आवाजाची जागा पक्ष्यांचा किलबिलाट घेतं आणि शहराच्या गर्दीमध्ये घुसमटणारा श्वास मोकळा होऊन जातो. ‘एसजीएनपी’चा विस्तार प्रचंड असल्यामुळे प्रवेश केल्यावर काही अंतरावरच असलेल्या ‘निसर्ग शिक्षण केंद्रा’ला जरूर भेट द्या. उद्यानात नेमकं कुठे काय आहे आणि काय पाहायचं, याची इत्यंभूत माहिती इथे मिळते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूंमध्ये जंगल वेगळं भासत असलं, तरी पावसाळा हा सर्वात उत्तम ऋतू म्हणता येईल. उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये राहणारे आदिवासी जागोजागी रानमेवा घेऊन बसलेले असतात. तो खात पावसात चिंब भिजत फिरण्याची मजा काही औरच आहे. तुफान कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी झरे वाहत असतात, आकाशातून पडणाऱ्या जलधारामुळे झाडाचे पान अन् पान टवटवीत झालेले असते, मोकळ्या मातीवर नवीन झुडपं आलेली असतात आणि ओल्या मातीच्या सुवासाने अवघा आसमंत दरवळून निघालेला असतो.

उद्यानात प्रवेश केल्यावर अगदी हाकेच्या अंतरावरील कृत्रिम तलावात पेडल बोटीचा आनंद घेता येतो. महात्मा गांधी यांचे स्मृतिस्थळ असलेल्या गांधी टेकडीवरून सभोवतालच्या सुंदर जंगलाचे दर्शन होतं. जंगल पर्यटनाचा आनंद द्विगुणित करायचा असेल, तर गांधी टेकडीच्या सभोवतालच्या टेकड्यांमधून वाट काढत धावणाऱ्या मिनी ट्रेन म्हणजेच वनराणीची सफर करता येते. जंगलातच फिरत असल्यामुळे रंगीबेरंगी फुलपाखरं जागोजागी दिसतील, पण फुलपाखरू उद्यानामध्ये फारसे कष्ट न घेता वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं अगदी जवळून पाहता येतात. जंगलभेटीचं थ्रिलिंग अजून वाढवायचं असेल, तर सिंह आणि व्याघ्र सफारीला पर्याय नाही. सुरक्षित बंदिस्त वाहनातून वाघ आणि सिंहांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याचा थरार अनुभवण्याची संधी यानिमित्ताने मिळते. कधी मुक्तपणे विहार करणारे, कधी आपल्या बछड्यांसोबत खेळणारे, कधी पाणी पिताना; तर कधी पाण्यामध्ये नुसते पहुडलेले वन्यप्राणी जवळून पाहायला मिळाल्याने उद्यानभेट सार्थकी लागते.

उद्यानामध्ये अनेक औषधी, सुगंधी आणि वेगळ्या वनस्पती आहेत ज्या आपल्याला सहज पाहायला मिळत नाहीत. त्यासाठी अनेक लहान-मोठे ट्रेल्स ‘एसजीएनपी’ प्रशासन किंवा विविध खासगी संस्था आयोजित करत असतात. वनस्पती, झाडं-झुडपं, फुलं, पानं, वेली, रानभाज्या, कीटक यांमध्ये तुम्हाला रुची असेल, तर अशा माहितगार लोकांसोबत जाऊन जंगल एक्स्प्लोर करता येईल. फोटोग्राफीची आवड असेल, तर कॅमेऱ्यामध्ये जंगल बंदिस्त करता येईल, नाही तर केवळ दुर्बिणीच्या सहाय्याने कावळा, चिमणीव्यतिरिक्त वेगळे पक्षी पाहता येतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मुंबईतील सर्वात उंच ठिकाणही ‘एसजीएनपी’मध्येच आहे. जंगलाच्या बरोबर मध्यभागी असलेल्या ‘व्ह्यू पॉईंट’ नामक ठिकाणाहून मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी, विहार आणि पवई असे तीनही तलाव नजरेच्या एका टप्प्यात पाहायला मिळतात.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उद्यानातील बौद्धकालीन लेणी- कान्हेरी गुंफा. ज्वालामुखीपासून निर्माण झालेल्या दगडामध्ये कोरलेली शंभराहून अधिक लेणी येथे आहेत. शैक्षणिक विद्यापीठ आणि व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे केंद्र म्हणून चौथ्या शतकातील या लेण्यांचे ऐतिहासिक महत्त्व फार मोठे आहे. त्यामुळे ‘एसजीएनपी’च्या भेटीत लेण्यांना धावती भेट दिली, तरी फक्त लेणी पाहण्यासाठी स्वतंत्रपणे भेट देणे अधिक संयुक्तिक ठरेल. निसर्ग पर्यटनाची आवड असेल आणि शहराच्या बाहेर पडायचे नसेल, तर अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या जंगलाला कोणत्याही ऋतूमध्ये एकट्याने किंवा ग्रुपसोबत भेट देता येईल.

nanawareprashant@gmail.com

loading image
go to top