मन प्रसन्न करणारं ॲग्रो गार्डन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agro Garden Mumbai
मन प्रसन्न करणारं ॲग्रो गार्डन!

मन प्रसन्न करणारं ॲग्रो गार्डन!

हिरव्या रंगाच्या असंख्य छटा, दाटीवाटीने तरीही शिस्तीत वाढलेली, लावलेली झाडे, वेली, पार्श्वसंगीत म्हणून पक्ष्यांची किलबिल आणि आजूबाजूच्या फुलझाडांवर स्वछंदपणे बागडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे... असे मन प्रसन्न करणारे ॲग्रो गार्डन. हे गार्डन फार लांब नाही, ते आहे सीबीडी बेलापूरच्या सेक्टर नऊमध्ये नागरी वस्तीला खेटून...

मुंबई शहराची वाढ दक्षिण, पूर्व आणि पश्चिमेकडील समुद्रामुळे मर्यादित आहे. परिणामी मुंबईच्या विकासासाठी उपलब्ध एकूण जमीन क्षेत्र मर्यादित आहे. त्यामुळे मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई हे नियोजित शहर म्हणून विकसित करण्यात आले. जगातील सर्वांत मोठे, नियोजित, संतुलित आणि आधुनिक शहर म्हणून नवी मुंबईकडे पाहिले जाते. या शहराची आणखी एक ओळख म्हणजे जागोजागी असलेली मोकळी आणि हिरवीगार उद्याने. नवी मुंबईतील पर्वतीय भूभाग, तलाव आणि हिरव्यागार जागा जतन करण्यासाठी प्रशासनातर्फे विशेष काळजी घेण्यात आली आहे. एवढंच नव्हे, तर शहराचे संतुलन बिघडू नये यासाठी नागरिकांनाही त्यामध्ये सहभागी करून घेतले आहे. त्याचाच एक सुंदर परिपाक म्हणजे सीबीडी बेलापूरच्या सेक्टर नऊमध्ये नागरी वस्तीला खेटून असलेल्या या ॲग्रो गार्डनमध्ये प्रवेश करताच आपण जंगलात उभे आहोत की काय, इतकी समृद्ध जैवविविधता आजूबाजूला दिसू लागते.

हिरव्या रंगाच्या असंख्य छटा, दाटीवाटीने तरीही शिस्तीत वाढलेली, लावलेली झाडे, वेली, पार्श्वसंगीत म्हणून पक्ष्यांची किलबिल आणि आजूबाजूच्या फूलझाडांवर स्वछंदपणे बागडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे मन प्रसन्न करून टाकतात. १९९५ मध्ये सिडकोने शून्य झोपडपट्टी योजना सुरू केली तेव्हा शहरातील काही भूखंड मोकळे करण्यात आले. त्याजागी पुन्हा झोपड्या वसवल्या जाऊ नये म्हणून हे भूखंड हरित राखण्याची कल्पना मांडली. यासाठी सोसायटी किंवा ट्रस्ट स्थापन करणं आवश्यक होतं. सीबीडी बेलापूरच्या काही दूरदर्शी रहिवाशांनी सिडकोकडून एक हेक्टर आकाराचा सेक्टर नऊला समांतर असणारा अतिउच्च दाबांच्या तारांखालचा जमिनीचा पट्टा हरित करण्यासाठी भाडेतत्त्वावर मिळवला. सोसायटी स्थापन करून आणि पदरचे पैसे खर्च करून अनेक अडचणींवर मात करून कालांतराने हा पट्टा लागवडीखाली आणला. रहिवाशांच्या पंचवीस वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर आज या जागेत नैसर्गिक वन, फलोद्यान, वनस्पती आणि फुलपाखरू उद्यान उभं राहिलं आहे.

ॲग्रो गार्डनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या उंच आणि बहरलेल्या झाडांमुळे डोईवर कायम सावली असते. लोखंडी दरवाजा असलेल्या उद्यानाच्या प्रवेशद्वारावर वेलींनी तयार झालेल्या छपराखालून आत शिरताच समोर हिरवेगार पटांगण आहे, ज्याच्या चारही बाजूंनी झाडे आणि बसायला बाक दिसतात. प्रवेशद्वारावरच एक पडवी दिसते, ज्यामध्ये मळ्यातून काढलेल्या ताज्या भाज्या विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. उद्यानाच्या डाव्या बाजूच्या उंचावरील जमिनीवर फळे आणि भाज्यांची शेती केली जाते. ज्यामध्ये वांगी, गवार, टोमॅटो, दोडका, भेंडी, कारली, घोसाळी, मायाळू, मिरची, पालक, लाल माठ, हिरवा माठ, मेथी या पालेभाज्या, पुदिना, कडिपत्ता, गवती चहा तसेच केळी, चिकू, पेरू, आंबा, नारळ, चेरी, पपई आणि स्टार फ्रूटसारख्या फळांची लागवड केलेली आहे. अनेक झाडांची कलमंही विक्रीला ठेवलेली असतात.

गार्डनच्या उजव्या बाजूचा भाग जवळपास जंगलासारखा आहे ज्यामध्ये दाटीवाटीने वाढलेल्या आणि लावलेल्या विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. हा भाग विकसित करतानाही जास्तीत जास्त टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आलाय. जंगल बहरत गेल्यानंतर आठ वर्षांपूर्वी येथे फुलपाखरू आणि वनस्पती उद्यान सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजघडीला येथे झाडांच्या शंभरहून अधिक प्रजाती आहेत. पावसाळ्यात ही संख्या दोनशेपर्यंत जाते. त्यामध्ये मोठे वृक्ष, झुडपं, वेली, तण प्रकारातील झाडे, फूलझाडे, फळझाडे आहेत. लोकांना अभ्यासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील अशी शोभेची, औषधी झाडे, रानभाज्याही येथे आहेत. इथे फिरताना झाडांविषयी नवनवीन माहिती कळते आणि त्यांची रूपंही दिसतात. उदा. लहानपणी आपण ज्या सागरगोट्यांनी खेळतो त्याचे झाड दिसते, कधी न दिसणारी कडीपत्त्याच्या झाडाला आलेली सुवासिक फुलं दिसतात. तीन प्रकारचा अळू, पूर्वी मुंबईत जागोजागी दिसणारी परंतु आता नाहीशी झालेली निर्गुडी, दोन प्रकारची कर्दळ, तेरडा, पॅगोडा फ्लॉवर, अडुळसा, हडजोडी, आंबेहळद, इन्सुलिन अशी वेगळी झाडं इथे पाहायला मिळतात. त्यावर बसलेले कीटक, अळ्या आणि गुणगुणणारे कोकीळ, दयाल, बुलबुल आणि इतर पक्ष्यांचे दर्शन होते.

गार्डनमध्ये तब्बल ५५ प्रकारची फुलपाखरं आहेत. पावसाळा संपल्यावर आणि हिवाळा सुरू होण्याआधी फुलपाखरं पाहण्याचे कार्यक्रम येथे आयोजित केले जातात. त्याशिवाय फेब्रुवारीमध्ये वसंतोत्सव असतो. मुलांसाठी झाडं कशी लावायची, कुंडी कशी भरायची, झाडं लावण्याच्या जपानी पद्धती कोणत्या आहेत याविषयी कार्यशाळाही आयोजित केल्या जात असतात. यामागचा उद्देश म्हणजे लोकांमध्ये निसर्गप्रेम वाढावे आणि र्यावरणाची काळजी वैयक्तिक पातळीवरही घेता येऊ शकते, हा विचार रुजवणे. गार्डनमध्ये एक छोटा तलाव तयार करण्यात आलाय, त्यात कमळं फुललेली असतात. पाण्याची विहीरदेखील आहे आणि सर्वांत मोठे पावसाळी आकर्षण म्हणजे गार्डनच्या बाजूने एक वाहता ओढा आहे. पहिल्या पावसानंतर हा ओढा तुडुंब भरून वाहू लागतो आणि संपूर्ण माहौल बदलून टाकतो. किरकोळ प्रवेशशुल्क देऊन हे उद्यान सर्वांना पाहता येते. दररोज सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत आणि वर्षाचे बाराही महिने गार्डन पायी फिरताना तीनचार तास कधी उलटून जातात याचा पत्ताही लागत नाही. इथली जैवविविधता अनुभवायची असेल तर प्रत्येक ऋतूमध्ये एक फेरी इथे मारली पाहिजे.

दरवर्षी ५ जून हा दिवस पर्यावरणदिन म्हणून साजरा केला जातो, पण केवळ समाजमाध्यामांवर संदेश देण्यापुरता तो मर्यादित राहता कामा नये. पर्यावरण टिकवायचे असेल तर निसर्गाच्या सान्निध्यात जाणं गरजेचं आहे. तो फक्त तज्ज्ञांनी नव्हे, तर आपण सर्वांनी लक्ष घालण्याचा विषय आहे. ग्लोबल वॉर्मिंगला दोष देत बसण्यापेक्षा आपल्या आजूबाजूची हवा, माती, पाणी आणि पर्यावरण जपणे आवश्यक आहे. म्हणूनच आपल्या शहरातील रहिवाशांनी पुढाकार घेऊन निर्मिलेल्या या गार्डनची भेट अनिवार्य ठरते.

nanawareprashant@gmail.com

Web Title: Prashant Nanaware Writes Agro Garden Tourism

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top