बोरघाटाचा रक्षक

राजमाचीवरून आजूबाजूचा परिसर विलक्षण सुंदर दिसतो. दूरवर पसरलेली सह्याद्रीची रांग आणि खाली कोकणचा सखल भाग नजरेस पडतो.
Borghat
Borghatsakal
Updated on

राजमाचीवरून आजूबाजूचा परिसर विलक्षण सुंदर दिसतो. दूरवर पसरलेली सह्याद्रीची रांग आणि खाली कोकणचा सखल भाग नजरेस पडतो. पश्चिमेकडे कर्जतहून लोणावळ्याकडे जाणाऱ्या लोहमार्गाचं आणि एका बोगद्यामधून बाहेर येऊन पुढच्या बोगद्यात पटकन शिरणाऱ्या गाडीचं दर्शन होतं. पूर्वेकडे शिरोट्याचा जलाशय चकाकताना दिसतो.

वनसृष्टीने व्यापलेला, निसर्गाची अनेक गुपिते उघड करणारा, दोन बालेकिल्ले असणारा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला अशी ज्याची ओळख आहे तो राजमाची आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भूरचनेमुळे जुन्या-नव्या भटक्यांना कायम आकर्षिक करत आलाय. गेली अनेक शतकं बोरघाटाचा रक्षक म्हणून त्याकडे पाहिलं जातं. राजमाचीला देदीप्यमान इतिहास असला, तरी तो अधिक लक्षात राहतो त्याच्या भवतालामुळे. गडावरून दिसणाऱ्या जंगलातून उसळी घेतलेला ढाकचा किल्ला, नागफणीचे टोक, दूरवरचा माहुली, कर्नाळा आणि माणिकगडाची दुर्गशिखरे, डोंगरांच्या बेचकीतून चमचमणारे वळवंड धरणाचे पाणी आणि उल्हास नदीचे खोरे अशा एकाहून एक सरस ओळखीच्या जागा एका ठिकाणाहून नजरेस पडतात आणि डोंगरमाथ्यावर पोहोचण्यासाठी केलेल्या पायपिटीचे सार्थक होऊन जाते.

राजमाची किल्ल्यावर जाण्याचे दोन मार्ग आहेत- तुंगार्ली आणि कोंदिवडेमार्गे. लोणावळ्यापर्यंत एसटी हा पर्याय उत्तम आहे; अन्यथा कर्जतहून सहाआसनी रिक्षाने कोंदिवडे गाव गाठायचे. आणखीन एक पर्याय म्हणजे घाटातील छोटासा थांबा असलेल्या ठाकूरवाडी रेल्वे स्थानकावर पटकन उतरायचे आणि समोरची उल्हास दरी उतरत राजमाचीच्या डोंगराला भिडायचे. एक मात्र नक्की आहे की, कुठल्याही मार्गाने गेलात तरी दीड-दोन हजार फुटांची सरळ चढण चढावीच लागते.

राजमाचीच्या वाटेवर सर्वप्रथम भवतालची हिरवाई आपलं मन जिंकते. त्यातही लोणावळ्याकडून येणारी वाट अधिक सुखकारक आहे. वेगवेगळ्या वृक्षवेली, पशुपक्षी, कीटक, फुलपाखरे, ओढेनाले ही सर्व नैसर्गिक संपदा आपल्याला वेड लावून टाकते. दिवसा ट्रेकिंगची मजा आणि सुरक्षितता अधिक असली, तरी राजमाचीचा ट्रेक हा रात्री करण्यात खरी मजा आहे. थंडीचा काळ हा त्यासाठी सर्वोत्तम होय. त्यातही पौर्णिमेची रात्र असेल, तर अंधारातून चालताना कोणत्याही कृत्रिम प्रकाशाची गरजसुद्धा भासत नाही. ‘चंद्र आहे साक्षीला... (आणि साथीला)’ हे शब्द या वेळी खऱ्या अर्थाने अनुभवता येतात. रात्री त्या वाटेवरून मार्गक्रमण करताना शहरात कधीही न दिसणाऱ्या काजव्यांचे दर्शन होते. तेसुद्धा एकट्यादुकट्याचे नाही, तर संपूर्ण झाडेच्या झाडे काजव्यांच्या प्रकाशाने लखलखत असतात. तो नजारा शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. या चमचमणाऱ्या झाडांसमोर फदकल मांडून बसणं आणि तो नजारा नजरेत सामावून घेणं, एवढीच गोष्ट तेव्हा करायची असते.

किल्ल्याच्या अलिकडे उढेवाडी नावाच्या गावाला खेटून एक दाट राई आहे. या राईत एक बांधीव तलाव आणि त्याच्या काठावर मध्ययुगीन महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे डोंगरातून येणारा झरा गोमुखाद्वारे मंदिराच्या पुढ्यात असलेल्या टाकीत पडतो आणि पुढे मुख्य तलावात सामील होतो. हा तलाव दंडा राजपुरीच्या कुणा देशमुखाने शके १७१२ मध्ये बांधला होता, अशी माहिती तळ्याच्या काळावर असलेल्या शिलालेखात आहे. या तलावाच्या स्वच्छ नितळ पाण्यात साऱ्या राजमाचीचे प्रतिबिंब पडलेले दिसते. लोणावळ्याच्या बाजूने मार्गक्रमण करताना एके काळी गडाची वेस असणारी तळातील तटबंदी लागते. वेशीच्या आत शिरताच डाव्या हाताला गणेश, मारुतीचे मंदिर आहे. पुढे काही अंतरावर सतीच्या शिळा आहेत. ही वेस ओलांडल्यावर राजमाचीची हद्द सुरू होते. गडाची या माचीवर दोन उपदुर्ग किंवा बालेकिल्ले आहेत. पूर्वेकडील उंच असलेला श्रीवर्धन; तर पश्चिमेकडील बसका वाटणारा मनरंजन.

राजमाचीची रचना सातवाहन काळात झाली. सातवाहन नंतरच्या सर्व राजवटी या किल्ल्यानं पाहिल्या. १६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामिल करून घेतला. श्रीवर्धन आणि जवळच असलेल्या मनरंजन या किल्ल्यांच्या मध्ये खिंड आहे. त्या खिंडीत एक बहिरोबाचं मंदिर आहे. मंदिराच्या समोरच दीपमाळ आहे. जवळच पाण्याची टाक्याही आहेत; पण ती दिसायला थोडं वळण घ्यावं लागतं. मंदिराच्या समोरून श्रीवर्धन किल्ल्याकडे; तर पाठीमागून मनरंजन किल्ल्याकडे पायवाटा जातात. पूर्वेकडे वर चढल्यावर वीसेक मिनिटांच्या चढानंतर पडझड झालेल्या दरवाजातून गडप्रवेश केल्यावर दरवाजातून उजवीकडे गेल्यावर डावीकडील कड्याच्या पोटात खोदलेलं धान्यकोठार आणि शेजारीच पाण्याचं टाकं दिसतं. किल्ल्याचा माथा अगदीच चिटुकला असला, तरी तटबंदी घालून सुरक्षित ठेवलेला आहे.

राजमाचीच्या या सर्वोच्च ठिकाणाहून आजूबाजूचा परिसर विलक्षण सुंदर दिसतो. दूरवर पसरलेली सह्याद्रीची रांग आणि खाली कोकणचा सखल भाग नजरेस पडतो. पश्चिमेकडे कर्जतहून लोणावळ्याकडे जाणाऱ्या लोहमार्गाचं आणि एका बोगद्यामधून बाहेर येऊन पुढच्या बोगद्यात पटकन शिरणाऱ्या गाडीचं दर्शन होतं. दक्षिणेला नागफणीच्या नाकाडाचंही दर्शन होतं. पूर्वेकडे शिरोट्याचा जलाशय चकाकताना दिसतो. एरव्ही हा परिसर इतका स्पष्ट दिसतो; मात्र पावसाळ्यात डोंगरमाथा ढगांमध्ये गुरफटलेला असतो.

श्रीवर्धननंतर मनरंजन किल्ल्याकडे मोर्चा वळवायचा. या किल्ल्यावरही धान्य कोठारं, पाण्याच्या टाक्या आहेत. गडाला चारही बाजूनं तटबंदी आहे. या गडाच्या तटावरून सूर्यास्ताची कॅलिडोस्कोपमधील आकृत्यांसारखी सतत बदलणारी रंगाकृती बघणं हा एक वेगळाच आनंद असतो.

राजमाचीचं वैशिष्ट्य म्हणजे तो प्रत्येक ऋतूमध्ये वेगळा भासतो आणि तितकाच आनंद देतो. शिशिरात गोठतो, वसंतात पुन्हा बहरतो आणि वर्षाकाळी चिंब न्हाऊन निघतो, मोकळं रान होतो, धुक्यात हरवून बसतो आणि झाडे, गवतफुलांनी रंगीबेरंगीसुद्धा होतो. निसर्गाची ही अनोखी किमया पाहायची असेल आणि साहस करायचं धाडस असेल, तर राजमाचीला एकदातरी जायलाच हवं.

nanawareprashant@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com