मुंबईतील चायना टाऊन

मुंबई हे असे दुर्मिळ शहर आहे ज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अचंबित करून टाकणाऱ्या गोष्टी सामावलेल्या आहेत.
China Town
China TownSakal
Summary

मुंबई हे असे दुर्मिळ शहर आहे ज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अचंबित करून टाकणाऱ्या गोष्टी सामावलेल्या आहेत.

सीमेवरील कुरघोडीमुळे भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या अनेक घडामोडी आपण बातम्यांमधून वाचतो. प्रसंगी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची भाषा केली जाते. एकप्रकारे भारताचा प्रतिस्पर्धी असलेल्या चिनी लोकांचं मुंबईतही श्रद्धास्थान आहे, हे सांगितल्यावर एखाद्याला आश्चर्य वाटेल; मात्र माझगाव डॉक परिसरातील ‘चायनीज टेम्पल’मधील सुंदर चित्रे, पुतळे, कलाकृती पाहण्यासारखे आहे.

मुंबई हे असे दुर्मिळ शहर आहे ज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अचंबित करून टाकणाऱ्या गोष्टी सामावलेल्या आहेत. विविध आकार आणि रंगांच्या काचेच्या तुकड्यांमधून ज्याप्रमाणे एक सुंदर कलाकृती तयार होते, मुंबई तशी आहे. माणसांची गर्दी असलेले हे शहर विविध संस्कृती, लोक आणि परंपरांनीही गजबजलेले आहे. याच गजबजाटात आपला शेजारील देश आणि सर्वांत मोठा प्रतिस्पर्धी असलेल्या लोकांचे श्रद्धास्थान असलेली शतकभर जुनी वास्तू म्हणजे ‘चायनीज टेंपल’. हे केवळ मुंबईतील नव्हे; तर महाराष्ट्रातील एकमेव चिनी मंदिर होय.

माझगाव डॉक येथील नवाब टँक रोडच्या छोट्याशा गल्लीत जुन्या चाळींप्रमाणे दोन्ही बाजूंना जवळपास एकाच उंचीच्या दुमजली इमारती आहेत. या अरुंद गल्लीतील काही इमारतींच्या दारावर चिनी भाषेत विशिष्ट मजकूर लिहिलेला आढळतो. बहुतेक मजकुरांत ‘सी युप कून’ हे शब्द दिसतात, ज्याचा शब्दशः अनुवाद ‘समुद्री व्यापाऱ्यांसाठी सराय’ असा होतो. याच गल्लीतील उजव्या हाताला असलेली तिसऱ्या क्रमांकाची वास्तू भडक लाल रंग, सोनेरी-गडद हिरव्या रंगाचे वेगळे छत, चॉकलेटी आणि सोनेरी रंगातील नक्षीकाम आणि चायनीज अक्षरातील नामफलकामुळे लक्ष वेधून घेते. ही वास्तू प्रत्यक्षात किती जणांनी पाहिली आहे याची कल्पना नाही, पण अलीकडेच आलेल्या ‘मॉडर्न लव्ह मुंबई’ या वेबमालिकेतील विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘मुंबई ड्रॅगन’ या कथेमध्ये अनेकांनी नक्की पाहिली असेल.

ईस्ट इंडिया कंपनीसोबत कामाच्या निमित्ताने चिनी कामगार आणि व्यापारी मुंबई बंदरमार्गे भारतात आले आणि माझगाव परिसरात स्थायिक झाले. त्या काळी या परिसरात चिनी लोकांची संख्या मोठी असल्याने या परिसराला ‘चायना टाऊन’ म्हणून ओळखले जाई. भारताच्या स्वातंत्र्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश भारत सोडून गेल्यावरही येथे स्थायिक झालेले चिनी नागरिक भारतातच राहिले. त्यापैकी काही १९६२ मध्ये भारत-चीन युद्धानंतर मायदेशात परतले. तरीही काहींनी इथेच राहण्याचा निर्णय घेतला. आजही मुंबईत हजार ते दीड हजार चिनी नागरिक अनेक पिढ्यांपासून गुण्यागोविंदाने नांदत आहेत. त्यांचे श्रद्धास्थान आणि या शहराशी त्यांची नाळ जोडणारी वास्तू म्हणून ‘क्वान ताई कुंग मंदिर’ ओळखलं जातं.

चीनमधील कॅंटन (ग्वांगझू) या प्रांतातून भारतात स्थलांतरित झालेल्या कुटुंबियांचे वंशज अल्बर्ट थाम हे गेली अनेक दशके या मंदिराची निगा राखत आहेत. गेटवे हाऊसमधील सिरफा लेन्टीन यांच्या लेखानुसार थामच्या आजोबांनी हे ठिकाण प्रामुख्याने तरुण चीनी पुरुषांना वेल्डर, फिटर आणि जहाज सुतार म्हणून प्रशिक्षित करण्यासाठी बांधले होते. यामुळे तरुणांना नजीकच्या माझगाव डॉकमध्ये नोकऱ्या मिळण्यास मदत झाली. पूर्वी याच वास्तूच्या आजूबाजूला अनेक चीनी लोकांची घरं, रेस्टॉरंट्स आणि दुकाने होती. त्या काळी मुंबईत दोन चायना टाऊन होते, एक माझगाव डॉक येथे आणि दुसरे नागपाडा येथील सुखलाजी रस्त्यावर. (मध्य मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात १८८९ मध्ये चिनी व्यापाऱ्यांनी विकत घेतलेल्या जमिनीवर बांधलेली एक चिनी स्मशानभूमीदेखील आहे.) नागपाडा येथे आता त्याच्या कोणत्याही खाणाखुणा सापडत नाहीत; मात्र माझगावमधील ही वास्तू चिनी संस्कृती आणि परंपरेचं द्योतक बनून आजही उभी आहे.

न्याय, संरक्षण आणि धैर्याचे प्रतीक असलेला चिनी योद्धा क्वान ताई कुंगला हे मंदिर समर्पित आहे. तळमजला आणि पहिला मजला अशा दोन भागांत मंदिर आहे. तळमजल्यावरील छोट्याशा खोलीत दया, शांती आणि शहाणपणासाठी पूज्य असलेली महिला देवता गुआन यिनची स्थापना केलेली आहे. डाव्या भिंतीवर भगवान बुद्ध आणि उजव्या भिंतीवर चिनी दैवते व योद्ध्यांची चित्रे दिसतात. छतावर गरुड पक्ष्याची चित्रे रंगवण्यात आली असून चिनी ड्रॅगन आणि लाल रंगाचे कागदी आकाशकंदील लटकावले आहेत. पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी लाकडी जिना आहे. जिन्याच्या भिंतीवर समृद्धी, अधिकार आणि दीर्घायुष्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनुक्रमे फूक, लूक आणि साऊ देवतांची चित्रे रंगवलेली आहे. जिन्याच्या कोपऱ्यात सिंहाचे छोटे पुतळे ठेवलेले आहेत. वरच्या मजल्यावरील बाल्कनीतून बाहेर पाहिल्यास उजव्या हाताला एका रांगेत शिस्तबद्धरितीने उभ्या असलेल्या इमारती आणि डाव्या बाजूला माझगाव डॉकचा मोठा बोर्ड दिसतो.

मंदिराच्या खोलीत प्रवेश केल्यावर लाल रंगाने रंगवलेल्या भिंती, कपाटे, दारं आणि खुर्च्या दिसतात. चिनी संस्कृतीत हा सर्वांत शुभ रंग मानला जातो. जुने घड्याळ, पंखा, वाद्ये, चिनी त्रिशूळ, ग्रंथ, छायाचित्रे, कुत्र्याचे शिल्प, जमिनीवरचे वाघाचे मखमली कटआऊट अशा असंख्य गोष्टी नजरेस पडतात. समोरच्या टेबलावरील अनेक पारंपरिक जुन्या चिनी वस्तू, मूर्ती आणि छताला लटकणारे नक्षीकाम केलेले कलात्मक शिल्प लक्ष वेधून घेते. देव्हाऱ्यात न्याय आणि धैर्याच्या प्रतीक असलेल्या चिनी देवता विराजमान आहेत. एका गोल डबीतील लाकडी काड्यावर असलेला मजकूर आणि क्रमांकांच्या आधारे या कागदांवरील क्रमांकांवरून लोकांचे भविष्य पाहिले जाते. प्रार्थनेनंतर तीन वेळा ढोल बडवण्याची आणि पितळेची घंटा वाजवण्याची प्रथा आहे. गंमत म्हणजे इथे प्रसाद म्हणून चॉकलेट्स दिली जातात.

चिनी नववर्षाला येथे मोठा उत्सव असतो. मंदिराला रोषणाई केली जाते, दिवे लावले जातात, फळे आणतात, केक बनवला जातो आणि चिनी नाच-गाण्यांनी सारा परिसर आनंदून जातो. मुंबईतील इतर समाजबांधवदेखील या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होतात. चायना टाऊनमध्ये राहिलेल्या चिनी कुटुंबांच्या नंतरच्या पिढ्या, हिंदू कुटुंबात विवाहित झाल्या आहेत. त्यामुळे हे मंदिर आता चीन आणि भारताच्या संस्कृतीचे संयुक्तिक प्रतीक आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

nanawareprashant@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com