श्रावण विशेष : सोमेश्‍वर, संगमेश्‍वर अन्‌ रामलिंगेश्‍वर दर्शनाची पर्वणी!

श्रावण विशेष : सोमेश्‍वर, संगमेश्‍वर अन्‌ रामलिंगेश्‍वर दर्शनाची पर्वणी!
श्रावण विशेष : सोमेश्‍वर, संगमेश्‍वर अन्‌ रामलिंगेश्‍वर दर्शनाची पर्वणी!
श्रावण विशेष : सोमेश्‍वर, संगमेश्‍वर अन्‌ रामलिंगेश्‍वर दर्शनाची पर्वणी!Canva
Summary

दक्षिण सोलापूर तालुक्‍यात भीमा अन्‌ सीना या नद्यांना कवेत घेत निसर्ग वनराईने गर्द बरसात केली आहे.

दक्षिण सोलापूर : गेल्या एक हजार वर्षाचा संपन्न ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक व अद्वैती वारसा सांगणारे दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील (South Solapur Taluka) भीमा- सीना नदीच्या (Bhima-Seena Rivers) संगमावरील हत्तरसंग कुडलचे (Hattarsangkudal) संगमेश्वर (Sangmeshwar), सर्वधर्मीयांसह राजकीय प्रचारासाठी आशीर्वाद ठरलेले हत्तूरचे (Hattur) सोमेश्वर (Someshwar), काशी विश्वनाथाची (Kashi Vishwnath) प्रचिती देणारे कासेगावचे (Kasegaon) हेमाडपंती शंभू महादेव (Shambhu Mahadeo) अन्‌ प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थ येथील रामेश्वर मंदिराचे (Rameshwar Temple) दर्शन भाविकांसह पर्यटकांसाठी श्रावणात मोठी पर्वणीच ठरते.

श्रावण विशेष : सोमेश्‍वर, संगमेश्‍वर अन्‌ रामलिंगेश्‍वर दर्शनाची पर्वणी!
श्रावण विशेष : भाविकांचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र नीलकंठेश्वर मंदिर

दक्षिण सोलापूर तालुक्‍यात भीमा अन्‌ सीना या नद्यांना कवेत घेत निसर्ग वनराईने गर्द बरसात केली आहे. अशा या तालुक्‍यात हत्तरसंगकुडलचे हरिहरेश्वर अन्‌ संगमेश्वर मंदिर, तीर्थचे रामलिंगेश्वर मंदिर, कासेगावचे शंभू महादेव मंदिर, तांदूळवाडी व धोत्रीचे नागनाथ मंदिर, हत्तूरचे सोमेश्वर मंदिर भाविकांना साद घालत आहेत. हत्तरसंगकुडल येथील हरिहरेश्‍वर आणि श्री संगमेश्‍वर मंदिर चालुक्‍यकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. शके 940 मधील "वाचिता विजयी होआवे' हा मराठीतील पहिला शिलालेख इथेच मिळाल्याचा दावा तज्ज्ञांचा आहे. तीर्थक्षेत्र, पर्यटन यासह ऐतिहासिक, सांस्कृतिक व अद्वैत तत्त्वज्ञानाचे अभ्यास केंद्र अशी ओळख या स्थळाची आहे. महाराष्ट्र - कर्नाटकाच्या सीमेवरील सीना-भीमा या दोन नद्यांचा संगम, निसर्गरम्य वातावरण, पुरातन कलेचा आविष्कार, पुरातन संगमेश्‍वर व हरिहरेश्‍वराचे पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील हे "ओऍसिस' आहे. सोलापूर- विजयपूर महामार्गालगत सोलापूर शहरापासून जवळच असलेले हत्तूर येथील सोमेश्वरही जागृत देवस्थान म्हणून प्रख्यात आहे. तालुक्‍यातील सर्वच निवडणुकांतील प्रचाराचा नारळ याच देवस्थानाला साकडे घालून फोडला जातो. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांसह सर्व धर्मीयांचे हे श्रद्धास्थान आहे.

सोलापूर- तुळजापूर रोडवर उळेगावापासून तीन किलोमीटरवर असलेल्या कासेगाव येथे काशी विश्वनाथाची साक्ष देणारे शंभू महादेव मंदिर आहे. सुमारे तेराव्या शतकात बांधलेले हे हेमाडपंती मंदिर वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. येथील मंदिरातील पितळी नंदीसह गणपती व बळी या परिवार देवतांची मंदिरेही विशेष आहेत. गंगेवाडीवरून गंगा नदी व कासेगावचे हे काशी विश्वनाथ अशी आख्यायिका जोडून उत्तर भारतातील काशी विश्वनाथ मंदिराशी संदर्भ जोडला जातो. प्रभू श्रीरामाने रावणाच्या पतनानंतर लंकेहून अयोध्याला जाताना तीर्थ येथे वास्तव्य केल्याची आख्यायिका सांगितली जाते. येथे प्रभू श्रीरामाने स्वहस्ते स्थापन केलेले शिवलिंग आहे. तेच रामलिंगेश्वर मंदिर होय. या मंदिराशेजारी रामकुंड असून तेथील पाणी प्राशन केल्याने व्यथा व चिंतामुक्त होता येते, अशी आख्यायिका आहे. तालुक्‍यातील या परिसराचा विकास झाल्यास सर्वांनाच त्याचा फायदा होणार आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार स्थानिक उत्पादनांकडे वळण्याचा कल वाढला आहे. या परिसरात शेती उत्पादनासह घरोघरी बनवले जाणारे विशिष्ट खाद्यपदार्थही पर्यटकांना नक्कीच आकर्षित करतील. तालुक्‍यात हुग्गी (गव्हाची खीर) वांग्याची भाजी या मेनूला गावोगावी विशेष पसंती आहे. त्यामुळे स्थानिकांनी याबाबतीत पुढाकार घेतल्यास शेतीसह एक चांगले उत्पन्न मिळवण्याची त्यांना संधी मिळणार आहे. अनेक युवक यामध्ये स्वयंपूर्ण होऊन रोजगारात गुंतले जातील. धार्मिकता व निसर्गाने नटलेला परिसर, इतिहासाच्या अभ्यासासाठी विपुल खजिना असलेला तालुका पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

श्रावण विशेष : सोमेश्‍वर, संगमेश्‍वर अन्‌ रामलिंगेश्‍वर दर्शनाची पर्वणी!
पाहा, प्रत्येकाला सुखावणारी अक्कलकोटची धार्मिक व निसर्ग पर्यटनस्थळे

हत्तरसंगकुडल येथे कल्याणीचे चालुक्‍य व दक्षिणेतीलच होवसळ राजाने उभारलेली मंदिरे, नयन मनोहरी कलात्मक शिल्प व मूर्ती पर्यटकांना आकर्षित करतात. श्री संगमेश्‍वर, हरिहरेश्‍वराच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे मंदिराचा अभ्यास धार्मिक व ऐतिहासिक अंगांनी करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. भारतात सर्वत्र द्वैत पंथियांचा कट्टरवाद असतानाच्या काळात अद्वैत तत्त्वज्ञानाचा पुरस्कार मांडणारे मंदिर येथे होते, हे उत्खननातून सापडलेल्या हरिहराच्या मंदिरामुळे कळले. उत्खननावेळी शिवलिंग व श्रीकृष्णाची एकत्र दुर्मिळ मूर्ती येथे मिळाली. श्रीकृष्णाच्या मिळालेल्या एका सुबक व देखण्या मूर्तीची इस्कॉन (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्सियसनेस) या आंतरराष्ट्रीय संस्थेने मागणी केली आहे. 360 शिवमूर्ती असलेले अखंड दगडातील जगातील एकमेव शिल्प येथे आहे. तेच बहुमुखी शिवलिंग होय. शिवपिंडीवर असलेल्या 359 शिवमूर्ती येथे पाहायला मिळतात. 359 शिवमूर्ती आणि एक शिवपिंड अशा भगवान शंकराच्या 360 मूर्ती एकत्र जगात एकमेव या ठिकाणी आहेत. सजीवांची उत्पत्ती, स्थिती व लय हा क्रम पंच महाभूतांच्या आधारे होत असतो. म्हणून मानवाचा पहिला देव हा पंचमहाभूत असतो, हे दर्शविणारे पंचमुखी शिवलिंगही येथेच आहे.

येथील संगमेश्‍वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, पाडव्याला व सूर्याचे उत्तरायण- दक्षिणायन होताना पूर्व दिशेच्या बरोबर मध्यास सूर्य आला असताना उगवत्या सूर्याची पहिली किरणे मंदिराचे पाच दरवाजे ओलांडून गाभाऱ्यातील थेट शिवलिंगावर पडतात. भीमा व सीना नदीच्या संगमावर वसलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरात महात्मा बसवेश्‍वरांसह अनेक संत महात्म्यांनी तप केल्याचे सांगितले जाते. चालुक्‍य राजवटीतील प्रमुख मंदिर असल्याने श्री सिद्धरामेश्‍वर, अक्कमहादेवी, चन्नमल्लिकार्जुन व मराठी भाषिक संतांनीही या तीर्थक्षेत्रास भेट दिली आहे. शके 940 मध्ये ""वाचीता विजयी होआवे'' अशी मराठीत अक्षरे लिहिलेला पहिला शिलालेख श्री हरिहरेश्‍वर मंदिराच्या दगडावर कोरलेला सापडला आहे. श्रवणबेळगोळ येथे सापडलेला शिलालेख पहिला मानला जात होता मात्र हा त्यापूर्वीचा असल्याने येथील महत्त्व विशेष आहे. या लेखाच्या सापडण्याने सध्या कन्नड भाषेचा प्रभाव असलेल्या या परिसरात त्याकाळी मराठी भाषा संपन्न असल्याचे दिसते. या लेखाला एक हजार वर्षांचा वारसा असल्याने येथे मराठी साहित्यिकांची मांदियाळी जमवून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्यासाठीही प्रयत्न होत आहेत. धार्मिक एकतेचे प्रतीक असलेले शैव-वैष्णव पंथियाच्या एकत्रित (हरिहरेश्‍वर) मंदिरात कलापूर्ण मूर्ती आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये वास्तुशास्त्रास अनन्यसाधारण महत्त्व आहे. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार पूर्व आणि उत्तर या दोन शुभ दिशांकडून येऊन मिळालेल्या सीना आणि भीमा या दोन नद्यांचा पवित्र संगम येथे झाल्याने या स्थानास अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रावण महिन्यात रुद्राभिषेक, प्रवचन, लक्ष दीपोत्सव, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम मंदिरात होतात.

बातमीदार : श्‍याम जोशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com