
थत्तेकडच्या डोंगराळ भागात दोन तास पायपीट केली; पण मलबार बार्बेटचा ठावठिकाणा लागत नव्हता. आम्ही थकून झाडाच्या सावलीत थांबलो. धनेश पुढे गेला आणि क्षणातच ‘मलबार बार्बेट’ असं ओरडतच धावत आला. आम्हीही त्याच्या मागे पळू लागलो. अगदी जवळच एका मोठ्या झाडाच्या खोडाकडे तो इशारा करू लागला. इतक्यात त्या झाडाच्या ढोलीतून मलबारी तांबट बाहेर पडला अन् उडूनही गेला...
शहराच्या ज्या भागात गर्द वनराई असते, तिथे किंवा शहराबाहेरच्या वनराईत येणारा ‘पुक पुक पुक पुक पुक पुक पुक’ हा एक परिचित आवाज... तांब्याच्या भांड्यावर ठोके दिल्यासारखा हा आवाज करणाऱ्यास तांबट म्हणतात. सतत येत असणाऱ्या आवाजामुळे ‘पुकपुक्या’ही संबोधतात. या पक्ष्याच्या चोचीखाली धाग्यांसारखी काळी पिसे असतात, जणू दाढीच! म्हणून इंग्रजीत त्याचे नाव बार्बेट. भारतात याचे ११ भाऊबंद अर्थात प्रजाती आहेत. सर्वच बार्बेट सुंदर असतातच, त्यातही मलबारी तांबट हा अतिआकर्षक.
भारताच्या मलबार प्रांतात म्हणजेच पश्चिम किनाऱ्यावर, दक्षिण गोवा ते कर्नाटक व केरळच्या पश्चिम किनारी प्रदेशात हा आढळतो. थत्तेकड परिसरात २०१७ व जानेवारी २०१९ ला त्याला चित्रित करण्यासाठी गेलो; पण हुलकावणी दिली. एप्रिल २०१९ ला पुन्हा शोधमोहीम केली.
मलबारी तांबट आकाराने आपल्याकडे दिसणाऱ्या तांबटाइतकाच. आवाजही तसाच, पण सतत येत राहातो आणि त्याचा आवाज किंचित गंभीर असतो. आपल्याकडील तांबटाचा आवाज किंचित तीक्ष्ण असतो. मलबारी तांबटाचे गाल, गळ्याचा व छातीचा भाग किरमिजी रंगाचा असतो. पोटाकडचा भाग हिरवट. हे महाशय आर्द्र सदाहरित वनराईत आढळतात. थत्तेकडमधील शोधमोहिमेच्या तिसऱ्या दिवशी रात्री आमचा मार्गदर्शक धनेशने सांगितले, उद्या सकाळी जरा लवकरच बाहेर पडू व इच्छित मलबारी तांबटचे छायाचित्रण करू. लवकर झोपा. आम्ही मात्र त्या मलबारी तांबटबद्दल चर्चा करत बसलो. उठायला उशीर होईल, या भीतीने शांत झोप न लागता मध्येमध्ये जागत होतो. सकाळी साडेपाचलाच धनेश हजर झाला. नाश्ता बांधून घेतला. जीपमध्ये बसलो.
थत्तेकडच्या उत्तरेकडील किंचित गर्द असलेली वनराई गाठली. इथून पटपट निघा, हत्तींचा कळप असतो, असे सांगितल्यामुळे आम्हीही घाई केली. तिथून पुढे डोंगराळ भागात प्रवेश केला. पुढे दोन तास निव्वळ पायपीट. कॅमेरा, ट्रायपॉड, पाण्याची बाटली सांभाळून उंच सखल भागात चालताना दम लागत होता. उन्हे वर येऊ लागली होती. हवेतील आर्द्रतेमुळे घामाच्या धारा लागल्या होत्या; पण त्या तांबटाचा ठावठिकाणा लागत नव्हता. आवाजही येत नव्हता. आत्ता दिसला तर बरे होईल, नाही तर दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने हेच करावे लागेल, या विचारानेच आम्ही अधिक थकलो.
साधारणतः नऊ वाजता टापू गाठल्यावर येथे नाश्ता करू, असे धनेश म्हणाला. आम्ही लगेच कॅमेरा-लेन्स-ट्रायपॉड बाजूला ठेवून झाडाच्या सावलीत बसलो. तुम्ही नाश्ता करा, मी चक्कर मारून येतो, असे म्हणत धनेश उठून चालू लागला... आणि अवघ्या पाच मिनिटांत ‘मलबार बार्बेट’ असे ओरडतच धावत आला. आम्हीही नाश्ता विसरलो व त्याच्या मागे पळू लागलो. अगदी जवळच उतारावर एका मोठ्या झाडाच्या खोडाकडे तो इशारा करू लागला. आम्हाला मात्र काहीच दिसत नव्हते. थांबा म्हणाला, इतक्यात सहजपणे न दिसणाऱ्या त्या झाडाच्या खोडावरच्या उंच ठिकाणी असलेल्या ढोलीतून मलबारी तांबट बाहेर पडला व उडाला... गेला, आता काय? ती ढोल म्हणजे त्याचे घरटे होते. हे तांबट असेच झाडाच्या खोडात चोचीने खणून ढोल करतात व त्यात घरटे बांधतात.
त्यात त्याचे पिल्लू आहे. त्यामुळे तो लवकरच परत येईल. धनेशने त्याचा अनुभव शेअर केला. लगेच तसेच झाले. ‘आंधळा मागतो एक डोळा आणि...’ आम्हाला नुसता मलबारी तांबटच नाही, तर नर, मादी व पिल्लूही पाहायला मिळाले. पुढे दोन तास नर-मादी विविध प्रकारची रानफळे चोचीत घेऊन घरट्याकडे येत राहिले. पिल्लू डोके काढून त्यांच्या माय-बापाने आणलेला खाऊ मटकावू लागले. कधी कधी तर दोन-तीन फळे चोचीत भरून नर-मादी घेऊन येत होते. मनसोक्त छायाचित्रण व निरीक्षण झाले होते... पोटात कावळे ओरडू लागले व उन्हेही कडक झाली. आम्ही भानावर आलो. समाधानाने धनेशला थँक यू म्हणतच तिथून निघालो. छायाचित्रणाचे पूर्ण समाधान घेऊनच.
- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार
sudhir_gaikwad03@yahoo.co.in
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.