Sahyadri Forest
Sahyadri Forestesakal

जंगल भटकंतीचा आनंद अन् थरारही..; भेकराचं भुंकणं, बिबट्याची साद, वानरांचं खेकसणं आणि बरंच काही..

काही प्रसंग थरारक भीतीदायक आणि खऱ्या अर्थाने जंगलाचे दुसरे रूप आपल्यासमोर आणणारे असतात.
Summary

डोंगरांच्या कुशीत उगम पावणाऱ्या नद्या, नाले, ओढे पावसाच्या पाण्याने दुथडी भरुन वाहतात, इथल्या वनस्पती जीवनाला सहारा देतात.

- प्रतीक मोरे, देवरूख (Email ID: moreprateik@gmail.com)

खरंतर जंगलांची (Forest) भटकंती म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीला बाजूला सारून निसर्गाच्या कुशीत अलगद विसावावे आणि सर्व ताणतणाव, चिंता विसरून निसर्गदेवतेची मुक्तहस्ते होणारी उधळण नजरेने टिपून घेण्याचे साधन. निसर्ग जरी पदोपदी भेटत असला तरी जंगल अनुभवण्यासाठी मात्र थोडी वाट वाकडी करावी लागतेच. आमच्या सुदैवाने सह्याद्रीची भली मोठी रांग अगदी १०-१५ किमीच्या अंतरावर असल्यामुळे कधीही उठून सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर भ्रमंती शक्य होते.

पक्षीनिरीक्षण करण्यासाठी रानोमाळ फिरता फिरता या जंगलवाचनाची आवड आम्हाला दोघांना केव्हा लागली हे कळलंच नाही. धुळीत उमटलेली प्राण्यांची पावले, बिबट्याच्या (Leopard) कातळावर टाकलेल्या विष्ठा, रानडूकरानी खाण्यासाठी उपटलेली मूळे, त्यांच्या लोळणी, सांबरांच्या शिंगाने खरवडलेल्या साली ते अगदी वनचरानी दबक्या पावलांनी पदोपदी चालून उमटवलेल्या रानवाटा शोधण्याच्या आमच्या छंदाला ट्रॅप कॅमेराच्या वापराने नवीन उद्दिष्ट दिले.

Sahyadri Forest
Konkan News : वाशिष्ठी खोऱ्यातील ज्ञानयुक्त सफर

सह्याद्री परिसरातली जंगलंसुद्धा लहरी इथल्या पावसासारखी. शिखरावरील घनदाट सदाहरित पासून पायथ्याच्या पानझडी पर्यंतची प्रचंड विविधता ल्यालेली. डोंगरांच्या कुशीत उगम पावणाऱ्या नद्या, नाले, ओढे पावसाच्या पाण्याने दुथडी भरुन वाहतात, इथल्या वनस्पती जीवनाला सहारा देतात. परंतु पावसाचे चार महिने संपले की मग मात्र हळूहळू हेच डोंगर उतार पाण्याचं दुर्भिक्ष्य होण्यास कारणीभूत ठरतात. मग मात्र साचून राहिलेले डोह, बारमाही वाहणारे ठराविक झरे, आणि दाट सावलीच्या जंगलातल्या ठराविक पाणवठे इथपर्यंत पाणीसाठा मर्यादित होतो. बरंचस प्राणीजीवन ही ह्या पाणवठ्याच्या अवतीभोवती केंद्रित होते.

यामुळेच आमची भ्रमंती ही अनेकवेळा असे जंगलातले पाणवठे शोधणे आणि तिथे प्राणीजीवनाच्या खुणा शोधण्यात बदलून जाते. एखादी जागा शोधावी तिथे आपल्या मानवी अस्तित्वाच्या खुणा न उमटवता ट्रॅप कॅमेरा लावावा आणि गपचुप निघून यावे नंतर काही दिवसांनी जाऊन ते चेक करावे हे सध्या आमचं ठरलेलं रूटीन. हे करत असताना अनेक अनुभव येतात. कधी कधी तर कॅमेरा चेक करत असताना अगदी थोड्याच वेळापूर्वी इथे एखादा गवा पाणी पीत होता आणि आपली चाहूल लागून निघून गेला हे कळतं तर कधी एखाद भेकर आपली चाहूल न लागल्याने अगदी समोरून दर्शन देतं.

Sahyadri Forest
कोकणात सायकलस्वार पर्यटक; टी शर्ट्स, ट्रॅक पॅन्टस, जॅकेट्सनी सायकलिंगला आणला ग्लॅमरस लूक

पण बहुतेक वेळा मात्र जंगल दिसण्यापेक्षा ऐकूच जास्त येतं. भेकराच भुंकणे बिबट्याची साद, वानरांच खेकसणे, प्राण्यांची चाहूल लागताच केकाट्यांची ओरड, चान्यांची टिवटिव, कदाचित शेकरूची साद असे अनेक प्रसंग वेळोवेळी येतात. हे सगळेच अनुभव रोमांचित करणारे, भ्रमंतीची आस वाढवणारे सुखांत असणारे मन प्रफुल्लित करणारे. परंतु काही प्रसंग थरारक भीतीदायक आणि खऱ्या अर्थाने जंगलाचे दुसरे रूप आपल्यासमोर आणणारे असतात.

Sahyadri Forest
Black Panther : कोकणात काळ्या बिबट्याचा मुक्त वावर; राजापूर, गुहागरात आढळला 'ब्लॅक पँथर'

नेहमी प्रमाणे आम्ही एका देवराई मध्ये फेरफटका मारावा, पक्षी पहावे, काही खुणा मिळाल्यास ट्रॅप कॅमेरा लावावा म्हणून फिरायला गेलो होतो. तशी दुपार होत आली होती. सुर्य अजून पूर्ण डोक्यावर आला नव्हता. ही देवराई तशी उंचीवर असली तरी दोन्ही बाजूने उंच पर्वत रांगेने वेढलेली आहे त्यामुळे सुर्यकिरणे तशी इथे उशिराच पोहोचतात. आमची गाडी पोहोचता मलबार ग्रे हॉर्नबिलच्या शिळा सर्व बाजूने ऐकू येत होत्या. जंगलांमध्ये सुरमाड फळांनी लगडण्याचा हा सिझन असल्यामुळे ठिकठिकाणी ही फळे खाण्यासाठी हॉर्नबिलची गर्दी झाली होती. गाडी लावून पायवाटेने बाजूच्या झाडीत शिरल्यावर अचानक मोठा आवाज करून सावलीत झोपलेला डुक्कर वेगाने समोरून दिसेनासा झाला.

अचानक अगदी पुढ्यातून पळल्यामुळे आमची मात्र चांगलीच धकधक झाली. आता दुसऱ्या बाजूचा ओहोळ जो नदीला उतरत असावा आणि कुठं तरी एखादा डोह साठवून असावा की काय हे पाहण्यासाठी आम्ही तिकडे चालायला सुरुवात केली. नुकतीच जंगलतोड झाल्यामुळे ही नव्याने तयार झालेली वाट होती. सांबराच्या पाऊलखुणा धुळीत उमटलेल्या असल्या तरी त्यांचा काळ वेळ ठरवणे खूप अवघड होते. तो ओहोळ पूर्ण उतरून झाल्यावर नदीत उतरलो आणि गव्यांच्या कळपाच्या अस्तित्वाच्या खुणा आता पदोपदी दिसू लागल्या.

Sahyadri Forest
Konkan News : पावसाळ्यात 'तिवडी गाव' नव्या नवरीसारखं सजतं; काय आहे गावाची खासियत?

पाणवठ्यावर आल्यावर यांचे मातीत खोलवर उठणारे खुर आणि मोठे गोल शेण सहज लक्ष्य वेधून घेतं. अशीच एक जागा बघून इथे ट्रॅप कॅमेरा लावला आणि देवळाकडे जाणारी वाट पुन्हा चढू लागलो. खरंतर ही वाट पायऱ्यांची सरळ उभी चढणीची दमछाक करणारी आणि दोन्ही बाजूने दाट झाडी झुडुपानी वेढलेली. पावसानंतर रानमोडी आणि इतर झुडुपे इतकी दाट वाढतात की अगदी पुढ्यात कोणी येऊन उभा राहिला तरी दिसणार नाही. त्यातून काय थरार अनुभवता येतो तो पुढील भागात.

(लेखक निसर्ग अभ्यासक आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com