Konkan News
Konkan Newsesakal

Konkan News : वाशिष्ठी खोऱ्यातील ज्ञानयुक्त सफर

इथल्या म्हशीचे दूध अतिशय औषधी आहे. कारण, अतिशय दुर्मिळ जंगली वनस्पती त्या खात असतात.
Summary

वाटेत माणसाने केलेले आक्रमण म्हणजे एक विनापरवानगीचे फुटलेले धरण दिसते आणि तेथूनच पुढे एक पंचतारांकित स्थगिती आलेले हॉटेल दिसते.

-पराग वडके, चिपळूण parag.vadake@gmail.com

आपण चालत सहज रविवार म्हणून अनोख्या ठिकाणी जात असतो आणि अचानक समोर खांद्यावर एक नुकतेच जन्मलेले म्हशीचे (Buffalo) रेडकू डोक्यावर घेऊन चालत असलेला एक माणूस दिसतो आणि आपण गंमत म्हणून थांबतो आणि नुसत्या चौकश्‍‍या करायला सुरुवात करतो. तर हा सद्‌गृहस्थ, भैरवगड सातारा ते भाट्ये टॉप, कुंभार्ली पट्टा जवळ जवळ १४ किलोमीटर तरी चालत चाललेला असतो आणि आपण खाडकन कानाखाली वाजवल्यासारखे भानावर येतो. गंमत संपते आणि संघर्ष दिसू लागतो.

Konkan News
'लग्न मांडवातल्या हाय हॅलोमध्ये विराजमान होण्याचा मान मिळालेला दुसरा प्राणी म्हणजे बिबट्या!'

आजच म्हैस व्यायली आहे. रेडकू...रहिवासी ठिकाणी न्यायचे आहे. रहिवासी ठिकाण दुर्गम..डीप फॉरेस्टमध्ये....दिवसातला निम्मा वेळ धुके....सोबत अस्वलं, गवे, बिबट्या (Leopard), रानकुत्रे यांचा वावर. मानेवर लहान म्हशीचे बाळ. झपझप...पावले टाकत...निवासाला पोहोचायचे. भाट्ये वस्ती अतिशय दुर्मिळ जागा. तेथील काही नागरिक तर भारताचे रहिवासी आहेत, याचा कुठलाच पुरावा त्यांच्याकडे नाही.

आपण आज पिझ्झा कुठला मागायचा यावर घरात वाद घालतो. मग एक दोन हजाराची ऑर्डर सुटते आणि इथे चलन नसते हातात तर वस्तू हीच देवाणघेवाण. हातात साधी वॉटरबॅग असेल तर अडचण वाटते आपल्याला...इथे आठ-दहा किलोचे वासरू खांद्यावर घेऊन जंगलातला प्रवास किती संघर्षमय असतो...काहीजणांचा! त्या शॉकमधून बाहेर येईपर्यंत एक वृद्ध स्त्री दिसते. डोक्यावर दुधाची (Milk) चरवी आणि तोंडाला एक पांढरा फडका बांधलेला. आधी एक कानाखाली वाजवलेली पुरलेली नसते म्हणून पुन्हा तोंड उघडून त्या मावशीला थांबवतो.

मावशीची माहिती काढतो तर मावशी जंगलातील एका गावातून रोज जाऊन-येऊन १४ किमी चालत डेअरीमध्ये दूध टाकायला जात असते. तोंडाचा फडका हा कर्करोग (Cancer) झाला असल्याने मोठी जखम उघडी असते म्हणून बांधलेला असतो. आता मात्र पूर्ण पाताळात गेलो असतो आणि अशा संघर्ष असलेल्या भाटे गावात जायला उत्सुक असतो. सोबत आपण सोनल प्रभुलकर आणि सदफ कडवेकर. हे दोघे गेली १४ वर्षे जंगल वाचवायला आपले घरदार सोडून जंगलातच राहिलेले.

Konkan News
Konkan News : चिपळूणचा शामू धनगर 'असा' बनला सह्याद्रीचा ढाण्या वाघ!

लाखो वर्ष ज्या भागावर नैसर्गिक जंगल जोपासले गेले व आजही जो प्रदेश दुर्लक्षित आहे आणि म्हणून समृद्ध आहे. वाशिष्ठीचा उगम जिथे होतो तो परिसर. वाशिष्ठीचे खोरे २२०० चौ. किमी परिसर व्यापते तसेच कोयना अवजलामुळे ही नदी बारमाही वाहते. पेंडसे समितीचा अहवाल म्हणतो, हे अवजल वापरले तर कोकणातील १ लाख ७४ हजार चौ. किमी परिसर ओलिताखाली येईल. या वाशिष्ठीच्या उगमाला भाट्ये परिसर वसलेला आहे. आपल्याला बफर झोनपर्यंत जाता येते. जातानाच आपल्याला वाघाची विष्ठा वगैरे दिसू लागते आणि सदाफ व सोनल धडाधड आपला निसर्गकोष रिता करू लागतात.

सुरुवातीचा मजेतील प्रवास एका खतरनाक प्रवासात बदलणार आहे, याची पुसटशी कल्पनासुद्धा नसते. वाटेत केमसे गुहा लागते. ही गुहा लाखो वर्षापूर्वीची आहे आणि चांगली आठ ते दहा हजार स्क्वेअर फूट आहे. त्यात अनोखा प्रकार पाहायला मिळतो. तो म्हणजे या गुहेला मध्ये एक भोक आहे आणि त्यातून सूर्यप्रकाश येतो. आतमध्ये एक झाड मस्त बाहेर डोकावत असते. ही गुहा अनेक प्राचीन वैशिष्ट्ये जपून असावी कारण, तिथला एक बेडूकसुद्धा कदाचित विश्वातील मोजक्या बेडकाच्या जातीतील असावा, असा अंदाज सोनल सांगून जाते. दुर्मिळ पालीसुद्धा पाहायला मिळतात. वाटेत माणसाने केलेले आक्रमण म्हणजे एक विनापरवानगीचे फुटलेले धरण दिसते आणि तेथूनच पुढे एक पंचतारांकित स्थगिती आलेले हॉटेल दिसते.

Konkan News
कोकणात सायकलस्वार पर्यटक; टी शर्ट्स, ट्रॅक पॅन्टस, जॅकेट्सनी सायकलिंगला आणला ग्लॅमरस लूक

अनोखा प्राचीन निसर्ग पाहत पुढे जातो. वाटेत कास पठारासारखे पठार लागते आणि सीझन असेल तर फुललेली अनोखी रंगीत फुले. फुलांनी रंगीबेरंगी आपण झालेलो असतो आणि अचानक इंग्रजी हॉरर शो सुरू होतो. अचानक पुढचा माणूस ओरडतो, अरे तुझ्या मानेवर रक्त आले आहे बघ. मानेजवळ हात नेत असतानाच ओलसर प्रवेश अनुभवत असताना आपणच समोरच्याला ओरडू लागतो आणि सांगतो की तुझ्या हातावर बघ रक्ताची धार. अक्षरशः सगळे रक्ताळले ते सुद्धा जिथे जिथे उघडे अंग आहे तेथून रक्त ओघळत असलेले. सगळे थांबतात आणि काय प्रकार आहे पाहू लागतात तर या भाटे गावच्या सीमा निसर्गाने लाखो वर्षांपूर्वी अभेद्य अशा केलेल्या आहेत. त्या म्हणजे समृद्ध जळवा अशा एकरात वाटेवर पसरवून. अनोख्या लांबलचक जळवा आपल्या नकळत आपले रक्त शोषत असतात. अर्धे लोक तर परत जातात कारण, अशी तटबंदी पहिल्यांदाच पाहिलेली असते.

कसेबसे उरलेली फौज आणि लीडर सदाफ व सोनल तिथे पोहचतो. ज्या प्रभागांत एवढ्या मोठ्या प्रमाणात जळवा असतात तो जगातील दुर्मिळ असाच प्रभाग आहे. शेवटी अतिशय दुर्मिळ वाटेतून एका अशा वाडीत पोहचतो की, जेमतेम चार घरे, पावसात संपर्क तुटलेली आणि पूर्ण ढगांचे साम्राज्य, जेमतेम एक फुटबॉलचे ग्राउंड भरेल एवढीच मोकळी जागा. बाकी दाट-घनदाट आणि त्याच्या पुढचा काही शब्द असेल त्याला लाजवेल असे जंगल. तिथे उभे राहातच एवढेच वाटते, काही क्षण समुद्रातील एक लाट थोडी मागे जाते आणि मोकळी जमीन दिसते; पण मागे अथांग समुद्र तसा हा हिरवा समुद्र आत शिरायलासुद्धा भीती वाटते. हे जंगल प्रचंड पुरातन आहे व माणसाचा वावर जवळ जवळ नाही अशा स्वरूपात आहे. असे म्हणतात की, पूर्वी माणूस आजारी पडला की, शेवटचा प्रयत्न म्हणून त्या आजारी माणसाला या भाटे गावात आणून सोडत आणि बऱ्याचदा तो माणूस आश्चर्यकारकरित्या वाचत असे.

Konkan News
Mental Health : ..तर बाळाच्या मेंदूची वाढ खुंटून मतिमंदत्व येऊ शकतं; यासाठी कशी काळजी घ्याल?

कारण, या जंगलातून चालताना झाडांचा जो वास येतो तो नकळत आपण सर्दी झाल्यावर जसे गरम पाण्यात काही काही टाकून हुंगत बसतो तशा व्हेपर्स घेत घेत आपण जात असतो. असे म्हणतात इथल्या म्हशीचे दूध अतिशय औषधी आहे. कारण, अतिशय दुर्मिळ जंगली वनस्पती त्या खात असतात. ज्युरासिक पार्कचा काळ प्रत्यक्ष जगायचा असेल तर या जंगलात जरूर एकदा भेट द्या. अर्थात, फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी आवश्यक असते. या जंगलात निसर्ग संवर्धन व बिबट्या संवर्धन करणारे राणी प्रभुलकर व सदफ कडवेकर याच्यांशी संपर्क करा. बिबटे वाचवणे, जंगलातील वणवे विझवणे इत्यादी चळवळ त्यांनी उभी केली आहे.

(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com