दो हंसो का जोडा | Swans birds update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swans birds

दो हंसो का जोडा

- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

दिवस उजाडताच आम्हीही त्यांना कॅमेऱ्यात टिपण्यास सज्ज झालो. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नांनंतर एका उंचवट्यावर नर आणि मादी एकत्रित दिसले. मागे आकाश आणि सभोवती हिरवेगार गवत. कॅमेऱ्यातील छायाचित्र पाहून समाधान झाल्यावरच आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.

वन्यजीव छायाचित्राणाला बाहेर पडताना दुर्मिळ प्राणी-पक्षी कॅमेऱ्यात कैद करण्यात जो आनंद मिळतो, तितकाच आनंद कधी-कधी फारसा दुर्मिळ नसलेला पक्षी टिपण्यातही मिळतो; मात्र त्याचे छायाचित्र अप्रतिम मिळाले तरच... बरेचदा असेही छायाचित्रण करण्यासाठी आम्ही बाहेर पडतो. असेच काही वर्षांपूर्वी टिपलेले एक छायाचित्र आजही लक्षात आहे.

बार हेडेड गुझ (राजहंस) हा फिक्कट राखाडी रंगाचा, २८ ते ३१ इंच लांबीचा हा अत्यंत देखणा, राजेशाही पक्षी. त्याची चोच व पाय पिवळ्या रंगाचे. विशेष ओळख म्हणजे डोक्याच्या मागील बाजूपासून मानेपर्यंत काळ्या रंगाचे पट्टे असतात. जगातील सर्वाधिक उंच उडणाऱ्या पक्ष्यांपैकी हा एक. ढगांच्या वरून, हिमालय पर्वतरांगांवरून एका दमात उडणारा हा पक्षी आहे. तिबेट, मंगोलिया, रशियामधून आपल्याकडे येताना हा हिमालय पर्वतरांग अवघ्या सहा ते सात तासांत पार करतो. हवेमध्ये आपण जितके वर जातो, तसा प्राणवायू विरळ होत जातो. अशा स्थितीत हा राजहंस सात-आठ तास सलग उडणे, हे जणू निसर्गाचे एक आश्चर्य म्हणावे लागेल. आपल्याकडे हिवाळ्यात आसाम ते तमिळनाडू या पट्ट्यात आढळतो. आपल्याकडे हिंदू साहित्य/पुराणात राजहंसाचे सुंदर वर्णन वाचायला मिळते. चांगले व वाईट पदार्थांपैकी चांगले वेचण्याची क्षमता असलेला, तसेच दूध व पाण्याच्या मिश्रणातून अलगदपणे दूध टिपण्याची दैवी देणगी असलेला पक्षी, असे राजहंसाचे वर्णन वाचायला मिळते.

सन २०१४ मध्ये काझीरंगा येथे एकशिंगी गेंडे पाहायला गेलो असता, तेव्हा पहिल्यांदा राजहंसाचे दर्शन झाले. दहा-बारा पक्ष्यांचा थवा होता. बराच वेळ निरीक्षण करता आले; मात्र छायाचित्रे फार काही छान मिळाली नाहीत, चांगले बॅकग्राऊंड न मिळाल्याने समाधान झाले नव्हते. त्यानंतर पुढच्याच वर्षी राजस्थानातील भरतपूर येथील पक्षी अभयारण्यात छायाचित्रणाकरिता गेलो असताना पुन्हा हे बार हेडेड गुझ दिसले. त्या वेळी ते खूप जवळून पाहता आले. चांगल्या छायाचित्रणाची संधी आहे, असे वाटल्याने जवळपास दीड तास तिथेच थांबलो; परंतु इतर बदकांच्या थव्यामध्ये असल्याने ही संधीदेखील वाया गेली.

आमच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अधिक प्रयत्न करता आले नाहीत. पुन्हा भारतपूरला जाण्याचा निश्चय केला; पण तो योग तीन वर्षांनी आला. त्या वेळी सोबत १२ लोकांचा गट होता. तेव्हा राजहंसदेखील दिसले, अगदी जवळून. इतके जवळ होते की ५०० एमएमच्या लेन्समध्ये जेमतेम मावले, त्यामुळे हे छायाचित्रणदेखील आवडले नाही. सोबत अनेक जण असल्यामुळे अधिक वेळ थांबता आले नाही.

भिगवणला पक्ष्यांचे छायाचित्रण सुंदर होते, कारण येथील टिपलेल्या छायाचित्रांना हिरव्यागार शेतांची पार्श्वभूमी असते. त्यामुळे सुंदर फ्रेमिंग करता येते. हे राजहंस जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात भिगवणला येतात. त्यामुळे लगेचच मित्रवर्य डॉ. अतुल देशपांडे यांच्यासोबत भिगवणला जायचा बेत ठरवला. अनेक वर्षे एकत्रित छायाचित्रणासाठी फिरत असल्यामुळे एकमेकांच्या आवडी व सवयी माहीत होत्या.

ठाण्याहून रात्री निघून पहाटे भिगवण गाठले. चहापान करून बोटीत बसलो. दिवस उजाडताच पक्ष्यांची दैनंदिनी सुरू झाली, तसे आम्हीही त्यांना आमच्या कॅमेऱ्यात टिपण्यास सज्ज झालो. थोड्याच वेळात राजहंसाचे तीन ते चार थवे दिसले. या वेळी छायाचित्रणासाठी आम्ही दोघेच असल्याने आणि वेळेचेही बंधन नसल्याने मनासारखे छायाचित्र मिळेपर्यंत पिच्छा सोडायचा नाही, असे ठरवले. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नानंतर एका उंचवट्यावर नर आणि मादी एकत्रित दिसले. बोटीत आडवे झोपून लो अँगलची फ्रेम टिपण्याचा प्रयत्न केला. मागे आकाश आणि सभोवती हिरवेगार गवत. कॅमेऱ्यातील छायाचित्र पाहून समाधान झाल्यावरच आम्ही तिथून पुढे इतर पक्ष्यांच्या निरीक्षणास निघालो. मनासारखी फ्रेम मिळाल्याचा आनंदही काही औरच असतो, नाही का?

nanawareprashant@gmail.com

loading image
go to top