
Viral Video: माणुसकी अजून जिवंत आहे! रणरणतं उन अन् चिमणी; एक मोलाचा संदेश
सध्या जगातील माणुसकी हरवली आहे असं सर्रास बोललं जातं. संकटकाळात एखाद्याला मदत करावी किंवा एखाद्याला आपल्या ताटातले अन्न खायला दिले पाहिजे असं आपल्याला लहानपणापासून शिकवण्यात आलं आहे.
पण आपण कितीवेळा अशी मदत करतो? सध्या एका सायकल रायडरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो रस्त्यावरील एका चिमणीला पाणी देताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक सायकल रायडर रस्त्यावर बसलेल्या जखमी चिमणीला पाण्याच्या बाटलीच्या झाकणात पाणी पाजताना दिसत आहे. तर पाणी पिल्यानंतर चिमणीच्या अंगात त्राण आल्याचं दिसत आहे. "सध्या तापमान वाढत असून जंगलातील पक्ष्यांना पाणी वेळेवर मिळत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने मुक्या प्राण्यांना मदत केली पाहिजे" असा संदेश देऊन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.