Viral Video : "रिक्षा चालक जावई असणं अभिमानाची गोष्ट होती"; आरटीओनं घेतली शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RTO Video

Viral Video: "रिक्षा चालक जावई असणं अभिमानाची गोष्ट होती"; आरटीओनं घेतली शाळा

पुणे : लोकांशी संवाद साधल्यानंतर अनेकांना रिक्षा चालकांचा अनुभव काहीसा नकारात्मक असतो. यामागं बरीच कारणं असतात, याच कारणांवर नेमकेपणानं बोट ठेवत त्यांना आरसा दाखवण्याचं काम एका प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यानं (RTO) केलं आहे. याबाबत एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तुम्ही तो पाहिलात तर आरटीओ असावा तर असाच, असे उद्गार तुमच्या तोंडून सहज बाहेर पडतील. (Viral Video It was a matter of pride to be son in law of a rickshaw driver says RTO)

हेही वाचा: Amazon Layoffs : आधी वडील गमावले नंतर जॉब! अ‍ॅमेझॉनच्या एका निर्णयानं भारतीय इंजिनिअरवर कोसळला दुःखाचा डोंगर

या व्हिडिओत साधारण १५ ते २० रिक्षा चालकांशी संवाद साधताना या अधिकाऱ्यानं म्हटलं की, "रिक्षावाला जावई असणं २५ वर्षांपूर्वी अभिमानाची गोष्ट होती. माझी ३३ वर्षे नोकरी झाली आहे, रिक्षा चालकांना आधी किती मान होता हे मला चांगलं माहिती आहे. रिक्षावाला आधी साहेबाच्या समोर उभं राहू शकत नव्हता. साहेबानं जर रिक्षा चालकाच्या खांद्यावर हात ठेवला तर रिक्षावाला दुसऱ्या दिवशी शर्ट धुवत नव्हता. एवढा मान आणि सन्मान आरटीओ आणि रिक्षावाल्यांमध्ये होता. पण आज तो राहिलेला नाही.

रिक्षावाल्यांना पूर्वीसारखी व्हॅल्यू राहिली नाही

आज तुम्ही रिक्षावाला जावई करालं का? तो परमिट होल्डर असेल दोन लाख रुपयांची रिक्षा त्याच्याकडे असेल तरी तुम्ही असा जावई करायला तयार नाहीत. कारण आता रिक्षा चालकांना तशी व्हॅल्यू राहिली नाही. पण ही व्हॅल्यू कोणी घालवली? मी तर नाही घालवली. ही जर व्हॅल्यू परत मिळवायची असेल तर तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

रिक्षावाला कॉर्पोरेट होणार की नाही?

ओला-उबरवाले जी सेवा देतात लोकांना घरापर्यंत नेऊन सोडतात ते तुम्हालाही करावं लागेल. घरापर्यंत जाऊन लोकांना घेऊन यावं लागेल. एका ठिकाणी ग्रुप म्हणून थांबावं लागेल. एकटे एकटे पळत राहिलात तर हाती काहीही येणार नाही. ठराविक ठिकाणी थांबून तिथं तुमचा फोन नंबर द्या. रिक्षा स्टँडवर देखील आपला फोन नंबर ठेवा, त्यांना सांगा आम्ही तुम्हाला घरी येऊ न्यायला. रिक्षा स्टँड बाहेर असतं त्यामुळं त्यांना घरातून बाहेर येणं देखील अवघड असतं.

रिक्षा स्टँडवर एक फलक लावा त्यावर लिहा या नंबरवर कॉल केल्यास पहिल्या नंबरची रिक्षा तुम्हाला घरी पिकअप करायला येईल. हे तुम्हाला करावं लागेल. जर तुम्ही बदलला नाहीत तर हे जग तुम्हाला सोडून निघून जाईल. कारण जग पुढे चाललेलं आहे. किती दिवस रिक्षावाला हा फक्त रिक्षावाला राहणार त्याला देखील कॉर्पोरेट व्हायचंय की नाही. आपल्याला आपल्या धंद्यातलं समाधान स्वतः शोधलं पाहिजे, अशा शब्दांत या अधिकाऱ्यानं रिक्षा चालकांना आरसा दाखवला आहे.