esakal | ‘या’ योजनेतून स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण घेतल्यास मिळतात महिन्याला तीन हजार रुपये अन्‌...
sakal

बोलून बातमी शोधा

2Competitive_20Exam_20Student

राज्यात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला. तेव्हापासून शाळा, महाविद्यालये, उद्योग, धंदे बंद पडले. गेल्या महिन्यात लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणली, त्यामुळे अनेक उद्योग सुरु झाले. मात्र, शैक्षणिक वर्ष कधी सुरु होणार हे अनिश्‍चित आहे.

‘या’ योजनेतून स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण घेतल्यास मिळतात महिन्याला तीन हजार रुपये अन्‌...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यामार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एमपीएससी परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. मात्र यासाठी अर्ज कसा करायचा, कोणासाठी हा उपक्रम आहे, असा अनेकांना प्रश्‍न पडला असेल. याचीच सर्व माहिती जाणून घ्या..

राज्यात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला. तेव्हापासून शाळा, महाविद्यालये, उद्योग, धंदे बंद पडले. गेल्या महिन्यात लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणली, त्यामुळे अनेक उद्योग सुरु झाले. मात्र, शैक्षणिक वर्ष कधी सुरु होणार हे अनिश्‍चित आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यावरही याचा परिणाम झाला आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी बाहेर जिल्ह्यात जातात. मात्र, सध्या तेही घरात बसून आहेत. मात्र आता विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनामुळे अनेक एमपीएससी इच्छुक विद्यार्थी ऑनलाइन कोचिंग क्लास करण्याबाबत मागणी करत होते. त्यानंतर मुंडे यांनी बार्टीला याबाबत ऑनलाइन क्लासेस सुरू करावे, अशा सूचना दिल्या. त्या अनुषंगाने ‘बार्टी’ने स्वत: पुढाकार घेऊन ऑनलाइन एमपीएससी क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज ‘बार्टी’च्या http://www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड वरील ‘एमपीएससी परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश अर्ज’ या लिंकवर क्लिक  करावे. ऑनलाईन कोचिंगचे बार्टीचे फेसबुक पेज व यूट्यूब चॅनल वरून लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे.

असे करा अर्ज

- http://www.barti.in/department_desc.php?id=VkZod2NsQlJQVDA9 या लिंकवर क्लिक केल्यानंतर अर्ज करण्यासाठी नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये नाव, अडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्म तारीख, मोबाईल नंबर, ई- मेल आयडी, कोर्सचा प्रकार, एसएससी सर्टिफिकेट याशिवाय पत्ता याची याची माहिती भरावी.

कोण करु शकते अर्ज...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेचा एससीमधील इच्छुक उमेदवारांना अभ्यास करता यावा म्हणून बार्टीकडून कोचिंग क्लासेस घेतले जातात. बार्टीने स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी होणाऱ्या पूर्व-मुख्य व इतर परीक्षांसाठी ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. यामध्ये ५० विद्यार्थ्यांची एक बॅच असते. 

या दिल्या जातात सुविधा

बार्टीकडून इच्छुक उमेदवारांची निवड झाल्यानंतर फी भरली जाते. याबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा स्टायपेंड (प्रशिक्षण सुरु असताना खर्च निघावा म्हणून पैसे) दिले जाते. या स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके व एमपीएससी परीक्षेशी संबंधित इतर वाचन साहित्य उमेदवारांना पुरविले जाते.

रमेश कांबळे यांनी बार्टीमध्ये प्रशिक्षण घेतले आहे.  ते म्हणाले, अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षेचे प्रशिक्षण दिले जाते. तीन महिन्याचे हे प्रशिक्षण असते. यामध्ये मागवलेल्या अर्जांतून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. मी गेल्या वर्षी क्लास पूर्ण केले, परंतु आमचे स्टायपेंड मिळाले नाही. आता ऑनलाइन क्लास संदर्भात मोबाईलवर मेसेज आला आहे. काही उमेदवारांना एक महिन्याचे तर काहींना दोन महिन्याचे पैसे भेटले. तर काही विद्यार्थ्यांना एकाही महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. एका महिन्याला एकाला तीन हजार रुपये मिळतात.