साखर कारखान्यांच्या सॅनिटायझर निर्मितीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ 

hand sanitizer
hand sanitizer

सोलापूर : कोरोनाचे संकट रोखण्यासाठी मास्क आणि हॅंड सॅनिटायझर महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये महाराष्ट्राला कोरोनाचे संकट नवीन असताना बाजारात सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. सॅनिटायझरची गरज पूर्ण करण्यासाठी राज्यातील साखर कारखानदारीने पुढाकार घेत त्यांच्याकडील आसवानी प्रकल्पांमधून सॅनिटायझर निर्मितीला सुरवात केली. मार्चनंतर महाराष्ट्रातील कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना साखर कारखान्यांमध्ये तयार झालेल्या सॅनिटायझरमुळे नंतरच्या काळात सॅनिटायझरचा तुटवडा भासला नाही. कारखान्यांनी केलेली मोलाची मदत अविस्मरणीय ठरली आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी व डिस्टिलरी प्रकल्पांनी सुरू केलेल्या सॅनिटायझर निर्मितीला आता 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अरुण उन्हाळे यांनी या मुदतवाढीचे पत्र राज्यातील सर्व सहआयुक्तांना  दिले आहे. त्यामुळे साखर कारखाने आणि डिस्टिलरींमधून होणारी सॅनिटायझरची निर्मिती येत्या काळातही सुरू राहणार आहे. साखर कारखाने व डिस्टिलरींमधून सॅनिटायझर निर्मिती सुरू होण्यापूर्वी बाजारात मिळणाऱ्या सॅनिटायझरच्या किमती भरमसाट वाढल्या होत्या. कारखाने आणि डिस्टिलरींमधून सॅनिटायझरचे उत्पादन सुरू झाल्याने बाजारामध्ये सॅनिटायझरचे दर स्थिर झाले. ग्रामीण भागातही सहजपणे सॅनिटायझर उपलब्ध होऊ लागल्याने शहरापासून ते वाड्यावस्त्यांपर्यंत सॅनिटायझर सहज पोचले. 

कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वाचे असणारे सॅनिटायझर सहजपणे व माफक दरात उपलब्ध करून देण्यामध्ये साखर कारखानदारी आणि डिस्टिलरी यांचा मोलाचा वाटा आहे. सॅनिटायझर निर्मितीसाठी कारखानदारांनी पुढाकार घेतल्यानंतर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने खास बाब म्हणून या साखर कारखानदारांना व डिस्टिलरी चालकांना कमी वेळेत तत्काळ परवाने उपलब्ध करून दिले होते. 

विभागनिहाय राज्यात सॅनिटायझर निर्मितीला देण्यात आलेली परवानगी
ठाणे : 7 
नाशिक : 18 
पुणे : 61 
औरंगाबाद : 20 
नागपूर : 3 
अमरावती : 1 
एकूण : 110 

सोलापूर जिल्ह्यात या कारखान्यांना परवानगी 
ब्रिमासागर महाराष्ट्र डिस्टिलरी लिमिटेड, श्रीपूर (ता. माळशिरस), विष्णू-लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह ग्रेप डिस्टिलरी एमआयडीसी अक्कलकोट रोड, विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हैसगाव (ता. माढा), फॅबटेक शुगर प्रायव्हेट लि. नंदूर बालाजीनगर (ता. मंगळवेढा), जकराया शुगर लि. वटवटे (ता. मोहोळ), युटोपियन शुगर लि. कचरेवाडी (ता. मंगळवेढा), खंडोबा डिस्टिलरी प्रायव्हेट लि. टेंभुर्णी (ता. माढा), लोकमंगल ऍग्रो इंडस्ट्रीज लि. सुभाषनगर (ता. उत्तर सोलापूर), विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. पिंपळनेर (ता. माढा), पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूर (ता. माळशिरस), सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखाना कुमठे सोलापूर, या आसवानी प्रकल्पांना सॅनिटायझर निर्मितीची परवानगी देण्यात आलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com