उद्या बजेट; आज, पेट्रोल-डिझेलच्या दर काय?

टीम ई सकाळ
Sunday, 31 January 2021

अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दिलासा मिळावा याची मागणी होत आहे. अर्थसंकल्पातून अशी अपेक्षा केली जात आहे की, पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारा कर कमी केला जाईल.

नवी दिल्ली - देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दिलासा मिळावा याची मागणी होत आहे. अर्थसंकल्पातून अशी अपेक्षा केली जात आहे की, पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारा कर कमी केला जाईल. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष याकडे लागून राहिले आहे.  मेट्रो शहरांमध्ये गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमती स्थिर आहेत.

सलग चार दिवस दरांमध्ये फारसा बदल झालेला नाही. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 86 रुपये 30 पैसे प्रति लिटर इतके होते. तर मुंबई, चेन्नई, कोलकाता या शहरांमध्ये हाच दर अनुक्रमे 92.86 रुपये, 88.82 रुपये आणि 87.69 रुपये होता. 

पेट्रोलप्रमाणे डिझेलचे दरही वाढले आहेत. त्यातही गेल्या चार दिवसात बदल झालेला नाही. दिल्लीत डिझेल 76 रुपये 48 पैसे प्रति लिटर असून मुंबईत 83 रुपये 30 पैसे दराने विक्री होत आहे. तर चेन्नईत 81 रुपये 71 पैसे आणि कोलकात्यात 80 रुपये 8 पैसे प्रति लिटर इतका दर आहे. 

हे वाचा - Budget 2021: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत बजेटमध्ये दिलासा मिळणार का?

जागतिक बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीत होणाऱ्या वाढीचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर होत असला तरी सरकारच्या निर्णय़ावरही सर्व अवलंबून आहे. सरकारने अधिक महसूल मिळवण्यासाठी या दोन्हींवरची कस्टम ड्युटी वाढवली तर तेलाच्या किंमतीवर परिणाम होईल. 

सरकारी तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग चौथ्या दिवशी स्थिर राहिले. प्रत्येक दिवशी सकाळी सहा वाजता नवीन दर लागू केले जात. पेट्रोल डिझेलटच्या दरात एक्साइज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर कर यामुळे दुपटीने वाढ होते. परदेशी चलनाच्या किंमतींसह आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑइलच्या किंमती किती असतात त्यावरही पेट्रोल डिझेलचे दर अवलंबून असतात. याच्याच आधारे पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवण्यात येतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: union budget 2021 petrol diesel price steady from last 4 days