पेन्सिलच्या शिशावर साकारला दगडूशेठ गणपती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 August 2017

नाशिकच्या अभियंत्याची कमाल; गिनिज बुकमध्ये नोंदीसाठी प्रयत्न

नाशिकच्या अभियंत्याची कमाल; गिनिज बुकमध्ये नोंदीसाठी प्रयत्न
नाशिक - बुद्धीची देवता अन्‌ सकल मंगलाचा निर्माता विघ्नहर्ता श्रीगणेशाचे रूपे अनंत आहेत. कलावंत शिल्पाला सुंदर आकार देऊन ती सजीव बनविण्याचा प्रयत्न करतो. नाशिकमधील युवा अभियंता जीवन जाधवने पेन्सिलच्या टोकावरील शिशावर पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती साकारण्याची कमाल केली आहे.

अतिसूक्ष्म आकाराची ही मूर्ती साकारण्यासाठी जीवनला बारा तास लागले. एक सेंटिमीटरच्या मूर्तीची रुंदी पाच सेंटिमीटर आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी भिंगाचा वापर करावा लागतो हे विशेष. "सर्जरी ब्लेड'च्या साहाय्याने त्याने ही मूर्ती तयार केली आहे. मूर्तीवरील नक्षीकामदेखील अप्रतिम आहे. अखंड शिशामध्ये त्याने ती कोरली आहे. अशी सूक्ष्म गणेशमूर्ती जगात एकमेव असण्याच्या शक्‍यतेने जीवनने मूर्तीची "गिनिज बुकमध्ये नोंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

जीवनने शिल्पकलेचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. जिद्द आणि नवीन काही तरी निर्माण करण्याच्या प्रखर इच्छेतून त्याने ही मूर्ती साकारली आहे. भविष्यात पेन्सिलच्या शिशावर अनेक कलाकृती साकारून त्याचे प्रदर्शन भरविण्याची इच्छा त्याची आहे.

मी लहानपणापासून अनेक चित्रे काढली आहेत. पेन्सिलच्या टोकावर मूर्ती साकारण्यासाठी मी प्रयत्न केला आणि मला यश आले आहे. गेल्या वर्षभरात मी शेकडो मूर्ती शिशावर बनविल्या आहेत; पण पुण्याची दगडूशेठ हलवाईच्या मूर्तीची प्रतिकृती ही जगातील सर्वांत लहान मूर्ती असावी, असे मला वाटते.
- जीवन जाधव, अभियंता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news dagdusheth ganpati making on pencil