भाजप सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केली :  करण गायकर

रोशन खैरनार
Thursday, 22 November 2018

सटाणा : मराठा क्रांती मोर्चाने संयमी, शिस्तबद्ध व शांततापूर्ण मार्गाच्या आंदोलनातून आरक्षणासाठी पाठपुरावा केला. प्रत्येक मागणीबाबत तांत्रिक व कायदेशीर बाजू मांडली. मात्र भाजप सरकारने फक्त फसव्या घोषणा व कागदी घोडे नाचवत संपूर्ण मराठा समाजाची दिशाभूल केली आहे.

सटाणा : ''मराठा क्रांती मोर्चाने संयमी, शिस्तबद्ध व शांततापूर्ण मार्गाच्या आंदोलनातून आरक्षणासाठी पाठपुरावा केला. प्रत्येक मागणीबाबत तांत्रिक व कायदेशीर बाजू मांडली. मात्र भाजप सरकारने फक्त फसव्या घोषणा व कागदी घोडे नाचवत संपूर्ण मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. सरकारवरील दबाव वाढवून समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे आयोजित ‘मराठा संवाद’ यात्रेत लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा,'' असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या कोअर कमिटीचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी आज (ता.२२) येथे केले.

२६ नोव्हेंबरला मराठा क्रांती मोर्चातर्फे विधानभवनावर धडक दिली जाणार आहे. यानिमित्त मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसह मराठा समाजात जनजागृती करण्यासाठी राज्यभरातून काढण्यात आलेल्या ‘मराठा संवाद’ यात्रेचे आज सकाळी अकरा वाजता सटाणा शहरात आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शहरवासीयांकडून यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी गायकर बोलत होते. पालिकेचे गटनेते काकाजी सोनवणे, दिनकर सोनवणे, राष्ट्रवादी कोंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, मनसेचे शहराध्यक्ष पंकज सोनवणे, किशोर कदम, पालिकेचे पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, अरविंद सोनवणे, मोर्चाचे राज्य समन्वयक तुषार जगताप, गणेश कदम, अमित जाधव, शरद तुंगार आदी उपस्थित होते. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

गायकर म्हणाले, ''गेल्या दोन वर्षांपासून भाजप सरकारने मराठा समाजास सातत्याने फसविले आहे. काही चांगले निर्णय घेतल्याचा कांगावा भाजप शासन करत असले तरी प्रत्यक्ष मराठा समाजास त्याचा अपेक्षित लाभ मिळालेला नाही. आरक्षण प्रश्नासाठी पेटलेल्या आंदोलनात ४० पेक्षा अधिक तरुणांचे जीव गेले आहेत. १५ हजाराहुन अधिक मराठा आंदोलकांवर खुनाचा प्रयत्न, दंगल, असे गंभीर खोटेनाटे गुन्हे दाखल करून अनेकांना तुरुंगात डांबले. शांत, शिस्तबद्ध पद्धतीने लाखोंच्या संख्येने रस्त्यावर मुकमोर्चा काढणार्‍या मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन भाजप सरकारने तोडा- फोडा - झोडा या कूटनीतीचा अवलंब करीत मोडीत काढण्याचा केलेला प्रयत्न मराठा बांधव कधीही विसरणार नाहीत.

मराठा आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणे, आंदोलनात जीव गमावलेल्या समाजातील अनेक तरुणांच्या कुटुंबाला कोणत्या स्वरूपात आधार देणार याबाबत राजी शासनाने अद्यापही भूमिका स्पष्ट केलेली नाही. मराठा क्रांती मोर्चाची एकजूट फोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. सरकार कोणाला पैसे देऊन मराठा पक्ष स्थापन करायला लावत आहेत तर कोणाला निवडणुका लढण्याचं गाजर देऊन वेगळं करुन आंदोलनातील एकजूट तोडण्याचं काम चालू आहेत. म्हणून या संवाद यात्रेच्या माध्यमातून पुन्हा एकदा समाजाची जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर ‘मराठा संवाद यात्रा’ काढण्यात आली आहे. सरकारवर दबाव वाढविण्यासाठी सर्वांनी यात्रेत सहभागी होऊन येत्या २६ नोव्हेंबरला विधानभवनाला धडक देण्याकरीता सज्ज व्हा, '' असे आवाहनही गायकर यांनी केले. 

शैलेश सूर्यवंशी, पंकज सोनवणे, जयप्रकाश सोनवणे, किशोर कदम आदींची भाषणे झाली. यावेळी पांडुरंग सोनवणे, साहेबराव सोनवणे, सचिन सोनवणे, किरण पाटील, विकी सोनवणे, जगदीश मुंडावरे, मिलिंद शेवाळे, भूषण सोनवणे, प्रवीण अहिरे, दादू सोनवणे, केशव सोनवणे आदींसह मराठा समाजबांधव उपस्थित होते. शैलेश सूर्यवंशी यांनी आभार मानले टीआर किशोर कदम यांनी आभार मानले. 

''मराठा समाजाला विनाविलंब आरक्षण द्यावे, कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशी द्यावी, अट्रोसिटी कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी कायद्यात दुरूस्ती करून खोटे गुन्हे दाखल करणार्‍यांना शिक्षेची तरतूद करावी, मराठा व शेतकरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, मराठा वसतिगृहांचा प्रलंबित प्रश्‍न, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, ईबीसी सवलतीमधील सावळागोंधळ, मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गंभीर गुन्हे मागे घेण्यासाठी ‘मराठा संवाद’ यात्रेद्वारे सरकारवर दबाव वाढवणार आहोत. ''    
 - करण गायकर, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP government misled the Maratha community Said Karan Gayakar