#MarathaKrantiMorcha गावितांचा आरोप चुकीचा; दोन समाजांमध्ये तेढ नको

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 August 2018

धुळे - लोकसभेच्या नंदुरबार मतदारसंघाच्या खासदार डॉ. हीना गावित या आमच्या भगिनी आहेत. त्यांना निवडून आणण्यात मराठा समाजाचाही सिंहाचा वाटा आहे. लक्ष्य करून किंवा जाणीवपूर्वक कट करून माझ्यावर आंदोलकांनी हल्ला केल्याचा त्यांचा आरोप चुकीचा आहे. यातून मराठा आणि आदिवासी समाजात तेढ निर्माण होऊ नये, तसा प्रयत्न कुणी करू नये. अन्यथा तो हाणून पाडू, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या धुळे जिल्हा शाखेने आज पत्रकार परिषदेत मांडली.

आरक्षणप्रश्‍नी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हा शाखेच्या आंदोलनाचा आज 17 वा दिवस आहे. रविवारी सहकुटुंब तीन हजार आंदोलक आंदोलन करतील, असे मराठा मोर्चाने पूर्वीच जाहीर केले होते. अशात प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक ठेवली.

दरम्यान, खासदार डॉ. गावित यांनी संसदेत रोष व्यक्त केल्यावर पोलिसांनी 20 ते 25 आंदोलकांविरुद्ध वाढीव कलमान्वये "ऍट्रॉसिटी'चाही गुन्हा दाखल केला. त्यात सायंकाळनंतर तीन आंदोलकांना अटक झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKrantiMorcha maratha reservation agitation heena gavit