'स्त्रीनेच स्त्रीला सन्मान देण्याची गरज'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 September 2017

नाशिक - स्त्री सर्वार्थाने सक्षम व्हावी यासाठी कायदे करण्यात आले असले, तरी अद्यापही स्त्रीला सर्वाधिक त्रास होतो तो स्त्रीकडूनच. त्यामुळे स्त्रीनेच स्त्रीला सन्मानाची वागणूक देण्याची गरज असल्याचा सूर आजच्या ‘आदिशक्ती : जागर स्त्रीशक्तीचा’ या महिला सुरक्षा विभागातर्फे आयोजित व्याख्यानमालेतून निघाला. 

नाशिक - स्त्री सर्वार्थाने सक्षम व्हावी यासाठी कायदे करण्यात आले असले, तरी अद्यापही स्त्रीला सर्वाधिक त्रास होतो तो स्त्रीकडूनच. त्यामुळे स्त्रीनेच स्त्रीला सन्मानाची वागणूक देण्याची गरज असल्याचा सूर आजच्या ‘आदिशक्ती : जागर स्त्रीशक्तीचा’ या महिला सुरक्षा विभागातर्फे आयोजित व्याख्यानमालेतून निघाला. 

सातपूर येथील मौले सभागृहात झालेल्या आजच्या व्याख्यानमालेत डॉ. आशालता देवळीकर, ॲड. अंजली पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले. या वेळी आमदार सीमा हिरे, पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, उपायुक्त माधुरी कांगणे, सहाय्यक आयुक्त सचिन गोरे, महिला सुरक्षा विभागाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक भावना महाजन आदी उपस्थित होते. आमदार सीमा हिरे यांनी पोलिस आयुक्तालयातर्फे नवरात्रोत्सवानिमित्ताने आयोजित करण्यात आलेले व्याख्यानमालेचे कौतुक करून यामुळे महिलांमध्ये आपल्या हक्कांविषयीची जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

डॉ. आशालता देवळीकर यांनी ‘महिलांचे आरोग्य’ याविषयी मार्गदर्शन करताना, महिलांकडून स्वत:च्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. परिणामी एका ठराविक वयानंतर त्यांना अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. महिलांनी आपल्या आरोग्याची निगा राखली, तर त्यांची अनेक समस्यांतून सुटका होऊ शकते, असे सांगून, आहाराचे पथ्य आणि कामाच्या सवयी यात नियोजन केल्यास आरोग्याच्या समस्या उद्‌भवण्याची शक्‍यता कमी होते. 

ॲड. अंजली पाटील यांनी, महिलांविषयीच्या कायद्याची माहिती देत, स्त्रियांना सर्वाधिक त्रास हा स्त्रीकडूनच होतो ही बाब दुर्दैवी असल्याचे सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, की अल्पवयीन मुलींचे होणारे शोषण चिंतेची बाब असून, त्या संदर्भात शासनाचे अत्यंत कठोर असे कायदे आहेत. त्यामुळे शोषण होत असेल तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे. महाविद्यालय, शासकीय कार्यालयांमध्ये विशाखा समिती स्थापन केलेली असते, त्याकडे होणाऱ्या अन्यायाची माहिती देता येते. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षिततेसाठीही कायदे असून, त्याद्वारे संरक्षण देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र तरीही महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटना घडतच असतात. महिलांनी एकोपा साधल्यास अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी घट होईल.

प्रारंभी परिमंडल दोनचे उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष महिला सुरक्षा विभाग असून, या विभागात संपर्क साधून आपल्या समस्या मांडू शकता. तसेच कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण होत असल्यास त्या संदर्भात तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news women