मकरसंक्रांती : धार्मिक कृत्य-दानाचा पुण्य काळ!

पं.नरेंद्र धारणे (धर्म अभ्यासक)
Monday, 11 January 2021

संक्रांत ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडील लोकांना सुख प्राप्त होते व ज्या दिशेकडे जाते व पाहते त्या दिशेकडे लोकांना दुःख व पिडा अशी फले प्राप्त होतात. संक्रांति पर्वकाळात स्नान, दान-धर्म आदी पुण्य कृत्य केले असता त्याचे फल शतगुणित होते. या पर्वकाळात जी दाने दिली ती भगवान सूर्यनारायणाला प्राप्त होतात व जन्मोजन्मी आपल्याला सुख प्राप्त होते .

शके १९४२ शर्वरी नाम संवत्सर, उत्तरायण, हेमंतऋतू,पौष शुक्ल प्रतिपदा गुरुवारी श्रवण नक्षत्रावर वज्र योगावर बव करणावर सकाळी ८:१४ मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.संक्रांतीचा पुण्यकाल गुरुवारी १४ जानेवारी २०२१ सकाळी ८:३४ पासून दुपारी ४:१४  वाजेपर्यंत आहे. या पुण्य काळामध्ये धार्मिक कृत्य दान धर्म इत्यादी करावीत . 

जन्मोजन्मी सुख प्रदान करणारी संक्राती
बव करणावर संक्रांत होत असल्याने या संक्रांतीचे वाहन सिंह असून उपवाहन हत्ती आहे. या संक्रांतीने पांढरे वस्त्र परिधाण केले आहे. हातात भृशुंडी घेतलेली आहे. कस्तुरीचा टिळा लावला आहे. वयाने बाल असून बसलेली आहे. वासाकरीता चाफा घेतलेला आहे. अन्न भक्षण करीत आहे. व प्रवाळ अलंकार धारण केले आहे. संक्रांति जातीने देव आहे. तिचे वार नाव नंदा आहे. तर नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त ३० आहेत. ही संक्रांत पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहे व आग्नेय दिशेस पाहत आहे . संक्रांत ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडील लोकांना सुख प्राप्त होते व ज्या दिशेकडे जाते व पाहते त्या दिशेकडे लोकांना दुःख व पिडा अशी फले प्राप्त होतात. संक्रांति पर्वकाळात स्नान, दान-धर्म आदी पुण्य कृत्य केले असता त्याचे फल शतगुणित होते. या पर्वकाळात जी दाने दिली ती भगवान सूर्यनारायणाला प्राप्त होतात व जन्मोजन्मी आपल्याला सुख प्राप्त होते .

संक्रातीपर्व काळात करावयाची दाने

नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, वस्त्र, तीळ, गुळ, गाय, सोने, भूमी, सुगडे, हळद-कुंकू भरून वाट्या, नारळ इत्यादी सत्पात्र व्यक्तीला दान द्यावे .

या दिवसाचे कर्तव्य :

तिल मिश्रित उदकाने स्नान, तिळाचे उटणे,अंगात लावणे, तिल होम, तिलतर्पण, तिलभक्षण व तिलदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो .

दान संकल्प

देशकाल कथन करून मम आत्मन: सकल पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्री सवितृ प्रीतिद्वारा सकलपापक्षयपूर्वकं स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धि धनधान्यसमृद्धी दीर्घायु: महेश्वर्य  मंगलाभ्युदय सुखसंपदादि कल्पोक्तफल सिद्धये अस्मिन् मकर संक्रमण पुण्य काले ब्राह्मणाय ( अमुक ) दानं करिष्ये असा संकल्प करून दान वस्तूचे व ब्राह्मणांचे पूजन करून दान द्यावे व दक्षिणा द्यावी .
दरवर्षी मकर संक्रांति संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात व लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो त्यामुळे त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये .

( संदर्भ :- दाते पंचांग )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about makar sankranti festival nashik marathi news