
मधल्या काळात हीच विक्री दहा लाख कोंबड्यांपर्यंत घसरली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फार्ममध्ये २० लाख कोंबड्या शिल्लक राहिल्या होत्या. ग्राहकांमधील भीतीचे वातावरण निवळू लागले तसे कोंबड्यांची मागणी वाढल्याने शिल्लक कोंबड्यांमधील ९० टक्के कोंबड्यांची विक्री झाली आहे.
नाशिक : बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या पसंतीअभावी ब्रॉयलर कोंबड्यांचा भाव किलोला ९० रुपयांवरून ५५ रुपयांपर्यंत कोसळला. शनिवार (ता. १६) आणि रविवारी (ता. १७) ‘वीकेंड’ला कोंबड्यांची मागणी वाढल्याने किलोचा भाव ६५ रुपयांपर्यंत पोचला आहे. प्रत्यक्षात मात्र राज्यातील ५० हजार कोंबड्या उत्पादकांना गेल्या आठवड्यात उत्पादन खर्चापेक्षा सरासरी १५ रुपये किलो अशा कमी भावाने कोंबड्या विकाव्या लागल्याने १८० कोटींचा फटका बसला.
कोंबड्यांच्या मागणीतील घसरण ७० टक्क्यांपर्यंत
राज्यात महिन्याला चार कोटी ब्रॉयलर कोंबड्यांचे उत्पादन होते. दिवसाला सर्वसाधारणपणे १३ लाख कोंबड्यांची विक्री होती. मधल्या काळात हीच विक्री दहा लाख कोंबड्यांपर्यंत घसरली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फार्ममध्ये २० लाख कोंबड्या शिल्लक राहिल्या होत्या. ग्राहकांमधील भीतीचे वातावरण निवळू लागले तसे कोंबड्यांची मागणी वाढल्याने शिल्लक कोंबड्यांमधील ९० टक्के कोंबड्यांची विक्री झाली आहे. मुंबई, विदर्भ, गुजरात, मध्य प्रदेशच्या ग्राहकांनी त्यासाठी हातभार लावला आहे. राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या भोजनावळींमध्ये चिकनला स्थान मिळाल्याने कोंबड्यांच्या मागणीतील घसरण ७० टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिली आहे. निवडणुका नसत्या, तर आणखी खप घसरून मातीमोल कोंबड्यांची विक्री करण्याची वेळ उत्पादकांवर आली असती, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हॉटेल अन् किरकोळ विक्रीत वाढ
हॉटेलमधील मांसाहारासाठी ब्रॉयलर कोंबड्यांच्या चिकनची मागणी वाढत असतानाच किरकोळ विक्रीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी संपली असताना कोंबड्यांचा खप ८० ते ९० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता वाढली आहे. अशातच, ‘वीकेंड’ला चिकनवर ताव मारला गेल्याने देशभरामध्ये किलोचा भाव १२ ते १३ रुपयांनी वाढण्यास मदत झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उत्पादन खर्चाएवढे पैसे शेतकऱ्यांना कोंबड्यांच्या विक्रीतून मिळण्याची शक्यता बळावली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात पसरलेल्या अफवेमुळे कोंबड्या उत्पादकांचा व्यवसाय रसातळाला गेला होता. दहा, पंधरा रुपये किलो या भावाने कोंबड्या विकाव्या लागल्या होत्या. मात्र ग्राहकांमधील भीती हळूहळू निवळू लागली, तसे मागणी आणि भावही वाढला होता. या पडझडीच्या अनुषंगाने पिल्लांचे उत्पादन घटले होते. परिणामी, एकीकडे मागणी वाढत असताना महागडी पिल्ले कोंबड्यांच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना विकत घ्यावी लागली. शिवाय खाद्याचा भाव सोयाबीनच्या भाववाढीने वाढला होता. त्यामुळे एक किलो कोंबडी उत्पादनाचा खर्च दहा रुपयांनी वाढून ७५ रुपयांपर्यंत पोचला होता.
हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश
भाव स्थिरावण्याबरोबर वाढण्याची चिन्हे
‘वीकेंड’ला शिल्लक कोंबड्यांचा खप झालेला असताना ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. परिणामी, आठवडाभरात कोंबड्यांचा भाव स्थिरावण्याबरोबर वाढण्याची चिन्हे असल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. बर्ड फ्लूच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाप्रमाणे आताही उत्पादकांनी पिल्ले टाकण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. स्वाभाविकपणे मागणीच्या तुलनेत कमी कोंबड्या उत्पादित होणार असल्याने चार पैसे उत्पादकांना मिळण्याची शक्यता अधिक आहे.
हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच