पावसाळ्यातही जिल्ह्यातील अनेक गावे तहानलेलीच; पाण्यासाठी भटकंतीची ग्रामस्थांवर वेळ

राजेंद्र दिघे
Monday, 5 October 2020

२६ गावांत नियमित पाणीपुरवठा दर तीन दिवसांनी व्हावा, गावात व सर्व वॉर्डांत समान जल वितरण व्हावे यासाठी गावात पाण्याची विभागणी करून व्हॉल्व्ह बसवावे, संबंधित कर्मचाऱ्यांनी नियोजनाप्रमाणे गावावर उपस्थित राहावे, अशा मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले.

नाशिक : (मालेगाव कॅम्प) गेल्या अनेक वर्षांपासून दहीवाळसह २६ गाव पाणीपुरवठा योजना विस्कळित झाली आहे. आता ऐन पावसाळ्यात या गावातील महिलांना पायपीट करून पाणी आणावे लागले. गत पंधरवड्यात धो धो पाऊस असताना पिण्यच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली होती. हे केवळ होत आहे जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेत अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे.
 
जलवाहिनीच्या तांत्रिक खोळंब्यात वीजपुरवठा अडसर 

या समस्येप्रकरणी माळमाथा परिसरातील युवकांनी उपअभियंता ए. एम. पगार यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त करत जीवन प्राधिकरण व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गिरणा डॅम ते दहीवाळ या एक्स्प्रेस जलवाहिनीत वीजपुरवठा अडसर ठरत असल्याची सबब वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढे केली. त्यामुळे संतप्त तरुणांनी पावसाळ्याच्या दिवसांत अशी वेळ असेल तर उन्हाळ्यात काय, असा संतप्त सवाल उपस्थित केला. 

अशा मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले

२६ गावांत नियमित पाणीपुरवठा दर तीन दिवसांनी व्हावा, गावात व सर्व वॉर्डांत समान जल वितरण व्हावे यासाठी गावात पाण्याची विभागणी करून व्हॉल्व्ह बसवावे, संबंधित कर्मचाऱ्यांनी नियोजनाप्रमाणे गावावर उपस्थित राहावे, अशा मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले. या शिष्टमंडळात नाळेचे माजी सरपंच दिलीप कोते, संदीप दिघे, बोधे ग्रामपंचायत सदस्य हिरालाल नरवाडे, संदीप शिंदे, सतीश रकटे, भूषण सोनवणे, किरण नरवाडे, आबा कदम, ललेश व्याळीज, गणेश शिंदे, भूषण नरवाळ आदी सहभागी होते. 

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

पाणी योजनेतील गावे - २६ 
जलसेवक - ९ 

माळमाथ्याच्या परिसरात गिरणा धरण असताना शहराला सुरळीत पाणीपुरवठा होतो. ग्रामीण भागातील जनतेस ऐन पावसाळ्यात पायपीट करावी लागते. पाणीपुरवठा व वीज वितरण यांनी परस्पर समन्वय ठेवून तीन दिवसांआड पाणीपुरवठा सुरळीत करावा. - संदीप शिंदे, शेंदुर्णी 

एक्स्प्रेस जलवाहिनीचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने गळतीसारख्या समस्या निर्माण होतात. गावांची संख्या पाहता एका जलसेवकाकडे तीन गावे आहेत. कमी दाबाऐवजी पूर्ण क्षमतेने वीज मिळावी. - ए. एम. पगार, उपअभियंता, जीवन प्राधिकरण, मालेगाव 

मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने वीज ब्रेकडाउन झाली. शेतीपंपाची मागणी वाढून लोड आला. नवीन पीन इनस्युलेटर बदली करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यापुढे नियमित वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. - योगेश सांगोरे, सहाय्यक अभियंता, वीज वितरण दहीवाळ  

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 26 villages thirsty in dahival during monsoon nashik marathi news