महत्वाची बातमी : नव्याने सुरू होणार इंग्रजी अन्‌ सेमी इंग्रजी शाळा.. वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

कोरोनाची धोकादायक संसर्गाची स्थिती, आदिवासी मुलांची आरोग्याची समस्या, वसतिगृहातील रहिवास व वसतिगृहातील शौचालय आणि स्नानगृहे याचा एकत्रित वापर, वसतिगृहातील अपुरी जागा, शाळेमधील अपुऱ्या वर्गखोल्या या सर्वांचा विचार करून आदिवासी विकास विभागाला वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना शिक्षण देण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करावा लागणार आहे

नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून नव्याने 52 इंग्रजी व सेमी इंग्रजी शाळा सुरू करण्यात येत आहेत. या शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. याशिवाय इंग्रजी माध्यमातून आश्रमशाळांमध्ये शिक्षण उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री ऍड. के. सी. पाडवी यांनी दिली. 

नामांकित शाळांना तात्पुरती स्थगिती, 50 हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहणार 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आर्थिक काटकसरीच्या धोरणामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील प्रवेशास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आदिवासी विभागाच्या इतर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात येईल. 50 हजार विद्यार्थ्यांचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरू राहील, असे सांगून ऍड. पाडवी म्हणाले, की येत्या दोन-तीन महिन्यांत कोरोनाची परिस्थिती सुधारून शाळांचे कामकाज नियमित सुरू झाल्यावर नामांकित शाळांमध्ये पुन्हा आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. तसेच विभागाच्या एकूण अर्थसंकल्पित तरतुदीच्या 71 टक्के खर्च शिक्षणावर केला जातो. 

हेही वाचा > मरणानंतरही मिळेना मोक्ष... हजारो अस्थीकलश झाडालाच लटकलेल्या अवस्थेत ..कारण वाचून व्हाल थक्क 

यंदा दोन हजार 640 विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेश 
एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल राज्यात 25 आहेत. दुसरी ते बारावीपर्यंत एकूण पाच हजार 357 मुले शिक्षण घेत आहेत. यंदा पहिलीत 750 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. विभागाच्या जुन्या इंग्रजी माध्यमाच्या 11 आश्रमशाळांमधून दुसरी ते बारावीपर्यंत एकूण तीन हजार 906 मुले शिक्षण घेत असून, यंदा पहिलीत 330 मुलांना प्रवेश दिला जाईल. यंदा 52 आश्रमशाळांमध्ये इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरू करत असून, पहिलीत एक हजार 560 मुलांना प्रवेश दिला जाईल. याखेरीज 2020-21 मध्ये नामांकित शाळांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्वीप्रमाणे सुरू राहील.

नामांकित शाळेमध्ये दाखल विद्यार्थ्यांची संख्या अशी ः दुसरी- तीन हजार 589, तिसरी- तीन हजार 116, चौथी- सहा हजार 857, पाचवी- सात हजार 881, सहावी- नऊ हजार 123, सातवी- तीन हजार 123, आठवी- तीन हजार 247, नववी- आठ हजार 493, दहावी- सहा हजार 720, अकरावी- एक हजार 382, बारावी- 194. अशा 50 हजार 269 विद्यार्थ्यांचे शिक्षण नामांकित शाळांमध्ये पूर्वीप्रमाणेच चालू राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

हेही वाचा > आजी-आजोबांची भेट.. अवघड वळणाचा घाट.. जणू वाट बघत होता तिघांचा काळ

विविध पर्याय वापरण्याचे प्रयत्न 
कोरोनाची धोकादायक संसर्गाची स्थिती, आदिवासी मुलांची आरोग्याची समस्या, वसतिगृहातील रहिवास व वसतिगृहातील शौचालय आणि स्नानगृहे याचा एकत्रित वापर, वसतिगृहातील अपुरी जागा, शाळेमधील अपुऱ्या वर्गखोल्या या सर्वांचा विचार करून आदिवासी विकास विभागाला वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना शिक्षण देण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करावा लागणार आहे. शिक्षण विभागाच्या मदतीने दुरुस्थ शिक्षण, मुक्त शालेय शिक्षण, शिक्षकांच्या घरभेटी, कार्यपुस्तिका यांसारख्या अन्य पर्यायांचा वापर करावा लागणार आहे. सरकारने पहिली ते बारावीपर्यंतची सर्व पुस्तके पीडीएफ स्वरूपात http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत. ही पुस्तके पाहिजे तेव्हा डाउनलोड करता येतात. अशा विविध पर्यायांचा वापर पुढील काळात करणे आवश्‍यक ठरणार आहे. त्यासाठी विभागाची तयारी सुरू आहे, असेही ऍड. पाडवी यांनी स्पष्ट केले.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 52 new English and Semi English schools will be started in the state nashik marathi news