मरणानंतरही मिळेना मोक्ष... हजारो अस्थीकलश झाडालाच लटकलेल्या अवस्थेत ..कारण वाचून व्हाल थक्क

घनश्याम अहिरे : सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या नाशिकला जाण्याच्या गैरसोयीमुळे सध्या झाडावर टांगलेल्या प्रिय व्यक्तींच्या अस्थींना विसर्जनातुन मुक्ती देण्यासाठी नातलग कासावीस झाले आहेत. विधिवत अस्थी विसर्जन संस्कार होईल का अन अस्थीकलशाचे मुख उघडेल का या भावनिक प्रश्नांमुळे सुतकी घरांतील दुःख हिंदोळे घेत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

नाशिक / दाभाडी : गेल्या अडीच महिन्यापासून उत्तर महाराष्ट्रातील गावागावांत मयतांचे अंत्यसंस्कार तर उरकले मात्र या मृतात्म्यांच्या 'अस्थीकलश' विसर्जनाविना झाडालाच लटकलेल्या अवस्थेत आहेत. दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या नाशिकला जाण्याच्या गैरसोयीमुळे सध्या झाडावर टांगलेल्या प्रिय व्यक्तींच्या अस्थींना विसर्जनातुन मुक्ती देण्यासाठी नातलग कासावीस झाले आहेत. विधिवत अस्थी विसर्जन संस्कार होईल का अन अस्थीकलशाचे मुख उघडेल का या भावनिक प्रश्नांमुळे सुतकी घरांतील दुःख हिंदोळे घेत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

सुतकी घरांतील दुःख हिंदोळे घेतयं
मयत व्यक्तीच्या अंत्यसंस्कार झाल्यावर अस्थी विसर्जन हा हिंदु धर्म परंपरेत मान्यता असलेला संस्कार.. ग्रामीण भागात मयतीच्या तिसऱ्या दिवशी आवश्यक अस्थींचे कलशात संकलन करून लाल फडक्याने हा कलशाचे मुख बांधले जाते. पंचक्रीया, दशक्रिया अथवा तेराव्या दिवशी दक्षिण काशी असलेल्या नाशिकच्या पवित्र नदीत अर्थात 'गंगे'त विधिवत विसर्जन करण्यात येतात. मात्र मार्च महिन्याच्या मध्यापासून मयत झालेल्या व्यक्तींचे अस्थीकलश विसर्जनाला लॉकडाऊनने खोडा घातला आहे. पहिल्या लॉकडाऊन संपला की नाशिक जाऊ अन् अस्थी विसर्जन करू असे मनसुबे व्यक्त करत नातलगांनी या अस्थींचे कलश घराजवळ अथवा शेतमळ्यात झाडांवर बांधून ठेवलेत.

अस्थी विसर्जनातून मुक्ती देण्यासाठी वेगवेगळे पर्याय

उत्तर महाराष्ट्रात असे हजारो अस्थी कलश गावागावांत झाडाला टांगलेले बघायला मिळत आहेत. सगळे सोपस्कार आटोपले मात्र स्वतःचे वाहन नाही, लॉकडाऊनचे नियमांमुळे कुणाला सोबत घ्यावे अन कुणाला टाळावे या प्रश्नांनी या कुटूंबांना त्रस्त केले आहे. ज्या परिवारांकडे स्वतःचे वाहन नाही त्यांनी विसर्जनाचे आडाखे बांधणेच सोडून दिले आहे. बस सुरू होतील तेंव्हाच अस्थीकलश झाडावरून उतरतील अशी भावना या परिवारात व्यक्त होत आहे. इच्छा असूनही मयत झालेल्या आपल्या प्रिय नातलगांस अस्थी विसर्जनातून मुक्ती देण्यासाठी घराघरात वेगवेगळे पर्याय चर्चिले जात आहेत. 
मार्चपासून सुरू झालेली लॉकडाऊनची आता थेट पाचवी आवृत्ती अवतरल्याने झाडावर लटकलेल्या अस्थींचा मुक्काम दिवसागणिक वाढतो आहे. अस्थींचा मुक्काम अजून किती दिवस राहील? या प्रश्नाने निरुत्तर झालेले कुटुंब सदस्य मुक्या गहिवरानेच आपल्या हतबल भावनांना मोकळी वाट करून देत आहेत.

हेही वाचा > कोरोनापेक्षा बदनामीच्या विषाणूशी 'तो' वेदनादायक संघर्ष...पण, आम्ही लढलोच!

अस्थी विसर्जनामागे वैज्ञानिक कारण असे की
नद्यांमध्ये अस्थी विसर्जनामागे वैज्ञानिक कारण असे की, नद्यांतील पाण्यात पारा आढळतो, ज्याने हाडांमध्ये आढळणारे कॅल्शियम आणि फॉस्फोरस पाण्यात विरघळुन जातात व हे पाणी जलचरांसाठी पौष्टिक आहाराचे काम करते. हाडांमध्ये आढळणारे सल्फर पाऱ्यामध्ये मिसळून पाण्याला स्वच्छ ठेवण्याचे काम करते. - प्रा.सुभाष निकम,भूगोल विषय तज्ज्ञ व प्राचार्य,
केबीएच महाविद्यालय,निमगाव

हेही वाचा > 'मी नाही, माझ्यातल्या खेळाडूने केले कोरोनाला क्लिन बोल्ड!'

शासनाने या धार्मिक विधीसाठी वाहतुकीस सुविधा द्यावी, बस सेवा सुरू झाल्याशिवाय नाशिक जाने शक्य नाही. - मिलिंद निकम, दाभाडी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands of ossuaries tie on trees due to lockdown nashik marathi news