येवल्यात ५२ जणांनी घेतली कोरोनावरील लस, तर ४० जणांनी फिरवली पाठ 

संतोष विंचू
Saturday, 16 January 2021

येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी (ता. १६) कोविड लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. रांगोळी काढून लसीकरणाच्या मोहिमेचे स्वागत झाले. केंद्रावर शनिवारी ९५ पैकी ५२ रुग्णांनी कोरोनावरील लस टोचून घेतली. तर पात्र लाभार्थ्यांपैकी ४० लाभार्थ्यांनी पाठ फिरवली.

येवला (जि. नाशिक) : येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी (ता. १६) कोविड लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. रांगोळी काढून लसीकरणाच्या मोहिमेचे स्वागत झाले. केंद्रावर शनिवारी ९५ पैकी ५२ रुग्णांनी कोरोनावरील लस टोचून घेतली. तर पात्र लाभार्थ्यांपैकी ४० लाभार्थ्यांनी पाठ फिरवली.

कुणालाही या लसीकरणाने त्रास झाला नाही. येथील उपजिल्हा रुग्णालयातील केंद्रांवर लसीकरणाची सर्व तयारी करत सकाळी लसीकरण मोहिमेची सुरवात झाली. कोविड लसचे कोणतेही विपरित परिणाम होत नसल्याचे शासनाने जाहीर केले आहे. पण, लस दिल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला अर्धा तास वेटिंग रूममध्ये थांबविण्यात आले होते.

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

कोणालाही त्रास झाला नाही

सकाळी तहसीलदार प्रमोद हिले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड व उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलेजा कुप्पास्वामी यांच्या हस्ते पूजन करण्यात येऊन लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे, डॉ. शरद कातकाडे, डॉ. आनंद तारू, तालुका आरोग्य विस्तार अधिकारी राजेंद्र खैरे, डॉ. संजय जाधव, अरुण चव्हाण, अनिल शिरसाठ आदी उपस्थित होते. 
प्रारंभी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलेजा कुप्पास्वामी यांना कोरोनावरील लस टोचण्यात आली. तहसीलदार प्रमोद हिले यांनी त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाचपर्यंत या लसीकरण केंद्रावर पात्र लाभार्थ्यांना लस देण्यात आली. या निर्धारित वेळेत येवला उपजिल्हा रुग्णालय, तसेच अंदरसूल प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी व कर्माचाऱ्यांना लस देण्यात आली. लस घेतलेल्या कुणालाही त्रास जाणवला नसल्याची माहिती डॉ. कुप्पास्वामी यांनी दिली. 

हेही वाचा >  लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?

१०० पात्र लाभार्थ्यांना लस

येथे शनिवारी १०० पात्र लाभार्थ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. यातील पाच लाभार्थ्यांची नावे दुबार आल्याने ९५ पात्र लाभार्थ्यांना लस देण्यात येणार होती. यातील तिघा जणांना ॲलर्जी असल्याने त्यांची नावे ऐनवेळी यादीतून वगळण्यात आली. यातील ५२ जणांनी लसीकरण केंद्रावर येऊन प्रत्यक्ष लस टोचून घेतली. तर तब्बल ४० जणांनी लस घेण्यास स्वारस्य दाखवले नाही. लसीकरणाबाबत सर्वांच्या मनात बऱ्याच शंका असल्या तरी उत्सुकता देखील होती. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये चांगला संदेश जाऊन ही लस सुरक्षित असल्याची भावना त्यांच्या मनात तयार करण्यासाठी मी स्वत: लस घेतल्याचे कुप्पास्वामी यांनी सांगितले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 52 people were vaccinated against coronavirus In Yeola nashik marathi news