वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

jayesh.jpg
jayesh.jpg

सटाणा (नाशिक) : वाढदिवस म्हणजे प्रत्येकासाठी एक खास दिवस असतो. कुटुंबीय, मित्र आणि आप्तेष्ट यांच्या प्रेमळ शुभेच्छांचा वर्षाव झेलण्याचा दिवस म्हणजे वाढदिवस. मात्र, या आनंदाच्या दिवशीच शहरातील पिंपळेश्‍वर रोडवरील जयेश नितीन अहिरे (वय २१) आणि त्याचा मित्र विशाल संजय इंगळे (२२, रा. खमताणे, ता. बागलाण) या दोघांचा दुचाकीने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात त्याच दिवशी मृत्यू झाल्याने शहर व तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अशी आहे घटना

शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील मोरेनगर शिवारातील सटाणा-देवळा रस्त्यावर शुक्रवारी (ता. २२) रात्री आठला मॉर्डन पिक-अप सेंटरजवळ ही घटना घडली. जयेशचा वाढदिवस असल्याने देवळा येथील मित्राने त्याला केक कापून वाढदिवस साजरा करण्यासाठी देवळ्याला बोलावले होते. त्यामुळे शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास खमताणे येथील मित्र विशाल इंगळे याला बरोबर घेऊन दोघे दुचाकीने (एमएच-४१-एएल-९०९६) जयेश देवळ्याकडे निघाला होता. शहरापासून काही अंतरावर साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील मॉर्डन पिक-अप सेंटरलगत पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टर (एमएच-१५-एएम-१५८०) चा अंदाज न आल्याने त्यांच्या दुचाकीने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीवरील जयेश आणि विशाल दोघेही गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले. 

रात्र असल्याने महामार्गावर वाहतूक सुरू होती. एका बसचालकाला दिव्यांच्या प्रकाशात अपघाती दोन्ही तरुण दिसले. त्याने बस थांबवून दोघांना तत्काळ सटाणा ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना केले. मात्र, रुग्णालयात पोचण्याआधीच दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. दरम्यान, घटनेचे वृत्त समजताच नागरिकांनी सटाणा ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती. याप्रकरणी पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com