देवना साठवण तलावाला प्रशासकीय मान्यता; १२.७७ कोटींचा खर्च अपेक्षित

संतोष विंचू
Wednesday, 20 January 2021

खरवंडी व देवदरी या गावांजवळील मन्याड नदीच्या दोन मोठ्या नाल्यांच्या संगमावर देवना साठवण बंधाऱ्याचे काम प्रस्तावित आहे. तापी खोऱ्याच्या बृहत् आराखड्यात हा प्रकल्प भविष्यकालीन प्रकल्प म्हणून प्रस्तावित करण्यात आला आहे.

येवला (नाशिक) : तालुक्यातील अवर्षणप्रवण ईशान्य भागासाठी जलसंजीवनी देणारा अन् वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या देवना साठवण तलावाला शासनाकडून मान्यता मिळाली आहे. यामुळे १२.७७ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प मार्गी लागण्याचा आशावाद जागा झाला आहे. या संदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून याबाबत माहिती दिली आहे. 

प्रकल्पासाठी १२.७७ कोटींचा खर्च अपेक्षित

उत्तरपूर्व भागासाठी असलेल्या देवना साठवण तलावाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. या योजनेस राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जलसंधारण महामंडळाने प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे येवल्यातील ईशान्य भागातील पाणीप्रश्न सोडविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खरवंडी व देवदरी या गावांजवळील मन्याड नदीच्या दोन मोठ्या नाल्यांच्या संगमावर देवना साठवण बंधाऱ्याचे काम प्रस्तावित आहे. तापी खोऱ्याच्या बृहत् आराखड्यात हा प्रकल्प भविष्यकालीन प्रकल्प म्हणून प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी नाशिक येथील मुख्य अभियंता नियोजन व जलविज्ञान कार्यालयाचे पत्र २० जानेवारी २०१४ अन्वये १.८५ दशलक्ष घनमीटर (६५.३३ दशलक्ष घनफूट) पाणी वापरासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र उपलब्ध झालेले आहे. प्रस्तावित धरण संरेखेपासून १८ चौरसकिमी पाणलोट क्षेत्र आहे. मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेकडून योजनेच्या माती धरणाचे काटछेदाचे संकल्पन करण्यात आलेले आहे. तसेच एस.एल.टी.ए.सी.कडून या प्रकल्पाची छाननी झालेली असून, प्रकल्पासाठी १२.७७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेस जलसंधारण महामंडळाकडून प्रशासकीय मान्यता देण्याच्या सूचना भुजबळ यांनी दिलेल्या होत्या. 

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

प्रकल्पाचे फायदे 

खरवंडी व देवदरी गावाच्या जवळ दोन मोठ्या नाल्यांच्या संगमावर माणिकपुंज मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असून, येवला तालुक्यातील देवदरी, खरवंडी, राहडी, कोळम खुर्द या गावांच्या शिवारातील शेतीस उपसा पद्धतीने सिंचनाचा लाभ होईल. वन्यप्राण्यांच्या पाण्यासाठी व रोपवाटिकेसही लाभ होणार आहे. या प्रकल्पासाठी वैजापूर तालुक्यातील १३ हेक्टर व येवला तालुक्यातील ४४ हेक्टर असे एकूण ५७ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येत आहे. त्यांपैकी ५५.७५ हेक्टर वनक्षेत्र असून, १.२५ हेक्टर क्षेत्र खासगी आहे. या मातीच्या धरणाची लांबी २२५ मीटर इतकी असून, धरणाची उंची ही १६.१८ मीटर, तर सांडव्याची लांबी ९० मीटर इतकी असेल. या परिसरात २.८ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होते. या साठवण तलावात त्यांपैकी १.८५ दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्यात येऊन या प्रकल्पाची सिंचनक्षमता ३५८ हेक्टर इतकी असेल. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना या साठवण तलावाचा मोठा फायदा मिळणार आहे.  

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administrative approval for Devna storage lake nashik marathi news