एकीकडे शेतकऱ्यांना मिळेना खत..दुसरीकडे कृषी अधिकारी म्हणतात, "ऑल इज वेल'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जुलै 2020

खतांच्या काळ्या बाजाराचा अनुभव स्वतः कृषिमंत्र्यांनाच औरंगाबादमध्ये आला. तोच अनुभव सध्या बागलाणमध्ये जागोजागी शेतकऱ्यांना येत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सची ऐशीतैशी, एक-दोन गोणी तरी खत मिळेल या आशेने शेतकरी सकाळपासून लांबलचक रांगेत उभे राहतात पण नंबर आल्यावर काहीच मिळत नाही. ​

नाशिक / नामपूर : खतांच्या काळ्या बाजाराचा अनुभव स्वतः कृषिमंत्र्यांनाच औरंगाबादमध्ये आला. तोच अनुभव सध्या बागलाणमध्ये जागोजागी शेतकऱ्यांना येत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सची ऐशीतैशी, एक-दोन गोणी तरी खत मिळेल या आशेने शेतकरी सकाळपासून लांबलचक रांगेत उभे राहतात पण नंबर आल्यावर काहीच मिळत नाही. कृषी विभागाचे अधिकारी दुसऱ्या तालुक्‍यातील शेतकरीही येथून खते नेत असल्याचा अजब दावा करीत असले तरी यूरिया शिल्लक नसल्याचे फलक झळकत असल्याने खरे बोलतेय कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

यूरिया शिल्लक नसल्याचा लावलेला फलक. 
नामपूर शहरात नामपूर बृहत्‌ सहकारी संस्था व वैभव ऍग्रो एजन्सी यांच्यामार्फत खतपुरवठा केला जातो. मोसम खोऱ्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने परिसरातील 35 ते 40 खेड्यांमधील शेतकरी खते व कृषिसाहित्य खरेदीसाठी नामपूरला प्रथम पसंती देतात. दोन्ही ठिकाणी शासकीय दराने खतविक्री होत असल्याने शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार नसते; परंतु गेल्या काही दिवसांपासून लॉकडाउनमुळे कंपन्यांकडे पुरेसा माल उपलब्ध नसल्याने स्थानिक पातळीवर तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे विक्रेते सांगतात. 

हेही वाचा >  "जगावं की मरावं'..दिव्यांग आजीबाईला आले चक्क सोळा हजारांचे वीजबिल..!

शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते

रासायनिक कंपन्यांकडून 500 टन खतांची मागणी केल्यानंतर साधारण 20 ते 25 टन माल मिळत असल्याने विक्री करताना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते. शासकीय नियमाप्रमाणे यूरियाची प्रतिगोण 266 रुपये दराने विक्री सुरू आहे. मागणी व पुरवठा यांचे प्रमाण व्यस्त झाल्याने दुकानांसमोर शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. -किरण कोकणे, संचालक, वैभव ऍग्रो एजन्सी, नामपूर 

हेही वाचा > पहाटेची वेळ...जुना वाडा कोसळतो तेव्हा.. अंगावर काटा आणणारी दुर्घटना..!

(संपादन - ज्योती देवरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture officers say said All is well nashik marathi news