"राग मानू नका?, पण तुमच्याकडे काल रात्री आलेले पाहुणे अमूक ठिकाणाहून आले असे समजले.."

guests.jpg
guests.jpg
Updated on

नाशिक / पंचवटी : "राग मानू नका?, परंतु तुमच्याकडे काल रात्री आलेले पाहुणे अमूक ठिकाणाहून आल्याची माहिती आम्हाला समजली आहे, तेव्हा संपूर्ण सोसायटीला अडचणीत न आणता संबंधित पाहुण्यांची अन्यत्र व्यवस्था करा, अन्यथा आम्हाला महापालिका प्रशासनासह पोलिसांना कळवावे लागेल', असा धमकीवजा आदेश किंवा सुचना हल्ली अनेक ठिकाणी ऐकावयास मिळत आहेत. 

"संबंधित पॉझिटिव्हच आहे, हाच समज"?
कोरोनाचा प्रादुर्भाव एव्हाना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर झाल्याचे आढळून येते. त्यामुळे प्रत्येकाकडेच संशयाने पाहिले जात आहे. त्यातच एखाद्या कॉलनीत, गल्लीत किंवा सोसायटीत पाहुणे आल्यावर तर विचारायलाच नको. आलेली व्यक्ती कोरोना पॉझीटिव्ह असो वा नसो, संबंधित पॉझिटिव्हच आहे, हा समज करून ज्यांच्याकडे हे पाहुणे आले, त्यांना हैराण केले जात आहे. प्रवेशद्वारावरावरील सुरक्षारक्षकाकडूनच आत जाण्यास मज्जाव केला जातो. त्यामुळे आलेल्या पाहुण्यांसह यजमानांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

ग्रामीण भागातही हिच परिस्थिती 
विशेष म्हणजे केवळ शहरातील उच्चभ्रू वसाहतीतच हा प्रश्‍न उभा राहिला असे नाही तर छोट्या मोठ्या गल्ली-बोळातील घरी पाहुणे आले की त्यांच्यासह घरमालकांकडे संशयाने पाहिले जाते. काल परवा पर्यंत केवळ शहरी भागापुरताच हा प्रश्‍न मर्यादित होता, परंतु आता ग्रामीण भागातही याचे लोण पोहोचले आहे. ग्रामीण भागात पाहुणा आला की सरपंच, ग्रामसेवक आदींना गाठून गावात पाहुणे आल्याची माहिती दिली जाते. जागृती म्हणून हे ठिक असले तरी यामुळे अनेक ठिकाणी कटू प्रसंग उभे राहात आहेत. यामुळे काही ठिकाणी समजावले जाते तर काही ठिकाणी थेट वादावादी, हाणामारीपर्यंतचे प्रसंग उद्‌भवत आहेत. 

पाहुण्यांकडे तंदुरूस्तीचे वैद्यकीय सर्टिफिकेट आहे का?
परवा म्हसरूळ परिसरातील एका बहुमजली सोसायटीत एक कुटुंब मुंबईहून आले. पाहुण्यांकडे दोनचार भल्यामोठ्या बॅगा असल्यामुळे ते परगावहून आल्याची खबर काही वेळात संपूर्ण सोसायटीत पसरली. काहीवेळाने ज्या कुटुंबाकडे पाहुणे आले होते, ते वगळून संपूर्ण सोसायटीतीमधील सदस्य इमारतीच्या टेरेसवर जमा झाले अन्‌ त्यांच्यात या अनाहूत पाहुण्यांबाबत चर्चा सुरू झाली. सदर पाहुणे मालेगाव परिसरातून आले असून त्यामुळे संपूर्ण सोसायटीतील सदस्यांचे जीव कसे धोक्‍यात आले, यावर सर्वजण तावातावाने चर्चा करू लागले. काहीवेळाने पाहुणे आलेल्या कुटुंब प्रमुखाला टेरेसवर बोलावून त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांकडे तंदुरूस्तीचे वैद्यकीय सर्टिफिकेट आहे का? अशी विचारणा करण्यात आल्यावर संबंधितांचा चेहरा कावराबावरा झाला. मात्र काही वेळाने आलेले पाहुणे बॅगांसह निघून गेल्यावर अन्य सभासदांचा जीव भांड्यात पडला. 

बाहेरगावहून आलेल्यांना प्रवेश न देण्याचे धोरण

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र भितीचे वातावरण आहे. सोसायटीमधील 32 सदनिकाधारकांचे आरोग्य जपण्यासाठी सद्या आम्ही बाहेरगावहून आलेल्यांना प्रवेश न देण्याचे धोरण स्विकारले आहे. - अनिकेत पाटील, वृंदावन सोसायटी, पंचवटी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com