
‘बार्क’चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता आणि गोस्वामी यांच्यामधील व्हॉट्सॲपचे ५०० पानांचे चॅट पुढे आले असल्याने त्याबद्दल चौकशी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक : रिपब्लिक माध्यम समूहाचे संपादक अर्णव गोस्वामी यांना बालाकोट अन् पुलवामा या संवेदनशील विषयांची माहिती कशी होती, याची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी मंगळवारी (ता. १९) बैठक होत आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी (ता. १८) येथे दिली. ‘बार्क’चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता आणि गोस्वामी यांच्यामधील व्हॉट्सॲपचे ५०० पानांचे चॅट पुढे आले असल्याने त्याबद्दल चौकशी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अनिल देशमुख : बालाकोट अन् पुलवामाबद्दल पूर्वकल्पना कशी?
एका विवाह सोहळ्यासाठी नाशिकमध्ये आले असताना देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, आल्ट न्यूजचे सहसंस्थापक प्रतीक सिन्हा यांनी यापूर्वी दासगुप्ता आणि गोस्वामी यांच्यातील कथित चॅटबद्दलचा दावा केला होता. व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉटदेखील त्यांनी समाज माध्यमांत शेअर केले आहेत. सिन्हा यांनी शेअर केलेल्या चॅटमध्ये गोस्वामींनी हवाई हल्ला करून निवडणुका जिंकण्यात येतील, असे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनीही पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर गोस्वामी यांनी आनंद व्यक्त केला होता, असा आरोप केला आहे.
हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश
महाविकास आघाडीला मोठे यश
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्याचे सांगून श्री. देशमुख म्हणाले, की हे समन्वयाचे यश आहे. पुढील निवडणुकीतही सगळे एकत्र असतील. विरोधकांना ‘मुंगेरीलाल का सपने’ पडताहेत. नागपूरमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. येत्या निवडणुकीतही महाविकास आघाडी सोबत असेल. तसेच नामांतर विषयात समन्वय समिती चर्चा करून मार्ग काढतील. शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत पोलिस गणवेशाबाबत सूचना आली आहे. त्यावर अद्याप निर्णय नाही.
हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच