जिल्ह्यातील उमेदवारांना 'यूपीएससी' परीक्षेसाठी महामंडळातर्फे बसगाड्या

अरुण मलाणी
Tuesday, 22 September 2020

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नागरीसेवा पूर्वपरीक्षा ३१ मेस घेतली जाणार होती; परंतु कोरोनाचा फैलाव होत असल्‍याने ही परीक्षा पुढे ढकलली होती.

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या सार्वजनिक वाहतूकव्‍यवस्‍था विस्‍कळित झालेली आहे. त्‍यात केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)तर्फे नागरीसेवा पूर्वपरीक्षा ४ ऑक्‍टोबरला दोन सत्रांत होणार आहे. या परीक्षेला जिल्ह्यातील उमेदवारांना सुलभरीत्‍या पोचता यावे, याकरिता महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाने बसगाड्यांची व्‍यवस्‍था केली आहे. मुंबईसह पुणे, औरंगाबादकरिता या बसगाड्या सोडल्‍या जाणार आहेत. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नागरीसेवा पूर्वपरीक्षा ३१ मेस घेतली जाणार होती; परंतु कोरोनाचा फैलाव होत असल्‍याने ही परीक्षा पुढे ढकलली होती. सुधारित वेळापत्रकानुसार ४ ऑक्टोबरला मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आदी शहरांमधील ३८ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. नाशिक विभागातून उमेदवारांसाठी ३, ४ आणि ५ ऑक्‍टोबरला बसगाडी उपलब्‍ध केलेली आहे. मुंबईसाठी महामार्ग बसस्थानकाहून, तर पुणे, औरंगाबादसाठी नवीन सीबीएस (ठक्कर बझार) बसस्थानकातून बसगाड्या सोडल्‍या जातील. परीक्षार्थींच्या आवश्यकतेनुसार जादा बसचे नियोजन महामंडळाने केले आहे. तसेच इतर आगारांतूनही परीक्षार्थींच्या मागणीसाठी बस उपलब्ध करून दिल्‍या जातील. मात्र, त्‍यासाठी चाळीस प्रवाशांची आवश्‍यकता असेल. महामंडळातर्फे उपलब्‍ध करून दिलेल्‍या या सुविधेमुळे उमेदवारांची गैरसोय टळणार आहे.  

हेही वाचा > आश्चर्यच! आठवड्यात गायीने दिला दोनदा जन्म; डॉक्टरांच्या गोठ्यातील किमया  

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrangement of bus for UPSC examination nashik marathi news