esakal | आश्चर्यच! आठवड्यात गायीने दिला दोनदा जन्म; डॉक्टरांच्या गोठ्यातील किमया  
sakal

बोलून बातमी शोधा

cow birth.jpg

डॉ. इरफान खान यांच्या गोठ्यातील ११ वर्षांची गिर गाय गर्भधारणा काळ पूर्ण झाल्यानंतर व्यायली. विशेष म्हणजे पहिल्यांदा गिर जातीच्या कालवडीला, तर चार दिवसांनंतर पुन्हा लाल कंधारी जातीच्या गोऱ्यास तिने जन्म दिला. हा विषय नाशिकसह परिसरवासीयांसाठी चर्चेचा ठरतो आहे. पण हा चमत्कार झाला तरी कसा??

आश्चर्यच! आठवड्यात गायीने दिला दोनदा जन्म; डॉक्टरांच्या गोठ्यातील किमया  

sakal_logo
By
मुकुंद पिंगळे

नाशिक : येथील डॉ. इरफान खान यांच्या गोठ्यातील ११ वर्षांची गिर गाय गर्भधारणा काळ पूर्ण झाल्यानंतर व्यायली. विशेष म्हणजे पहिल्यांदा गिर जातीच्या कालवडीला, तर चार दिवसांनंतर पुन्हा लाल कंधारी जातीच्या गोऱ्यास तिने जन्म दिला. हा विषय नाशिकसह परिसरवासीयांसाठी चर्चेचा ठरतो आहे. पण हा चमत्कार झाला तरी कसा??

आठवड्यात गायीने दिला दोनदा जन्म
गेल्या दहा वर्षांपूर्वी डॉ. खान यांनी सिन्नर (जि. नाशिक) येथून काळी गिर गायीची कालवड दीड वर्षाची असताना खरेदी केली होती. आतापर्यंत गायीचे तीन वित पूर्ण झाले होते. २०१६ पासून ती भाकड असल्याने ती माजावर येत नव्हती. यावर पर्याय म्हणून डॉ. खान यांनी पशु वैद्यकांकडून हार्मोन थेरपी केली. तसेच वैदिक पद्धतीने मूग, मठ हा खुराक सुरू करून ती माजावर आणण्याचा प्रयोग केला. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर गर्भधारणेसाठी गर्भाशय मसाज केला. नियमित आहारात खनिज तत्त्वांचा पुरवठा करण्यासह हिरवा व सुका चारा याचे आहारात नियोजन केले.

हेही वाचा >  मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

गिर व लाल कंधारी प्रजातीच्या वासरांना जन्म

त्यानंतर ६ सप्टेंबर २०२० ती व्यायली. त्यावेळी गिर जातीची कालवड जन्माला, तर चार दिवसांनंतर पुन्हा लाल कंधारी जातीचा गोरा जन्माला आला. त्यामध्ये पाहिले वासरू हे शारीरिकदृष्ट्या सुदृढ व सशक्त जन्माला आले, तर दुसरे वासरू तुलनात्मक कमकुवत जन्माला आले. पुढे त्यास काळजी व योग्य वेळेस पाजून ते सशक्त व सुदृढ करण्यात यश आलेले आहे. डॉ. इरफान हे गेल्या दहा वर्षांपासून देशी प्रजातीच्या जातींच्या गोसंवर्धन कार्यात सहभागी आहेत. लाल कंधारी, डांगी, खिलार, गिर या प्रजाती त्यांनी सांभाळल्या आहेत. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

डॉ. इफरान खान यांच्या गोठ्यात किमया 
असे आहेत गर्भधारणा ते व्यायल्याचे टप्पे
- ३ डिसेंबर २०१९ : गाय माजावर 
- ४ डिसेंबर २०१९ : सकाळी नऊला गिर जातीच्या वळूचे वीर्य, तर सायंकाळी सातला पुन्हा लाल कंधारी जातीच्या वळूचे वीर्य वापरून रेतन 
- ६ सप्टेंबर २०२० : सकाळी साडेदहाला गिर जातीच्या कालवडीला जन्म 
- ११ सप्टेंबर २०२० : सकाळी साडेसहाला लाल कंधारी जातीचा गोऱ्याला जन्म 


यापूर्वी अशा घटनेची लातूर जिल्ह्यात नोंद 
यापूर्वी अहमदपूर (जि. लातूर) येथे २००५ लाल कंधारी प्रजातीच्या गाय व्यायली असता, असा प्रकार १५ वर्षांपूर्वी घडल्याचे समोर आले आहे. त्याची नोंद डॉ. नितीन मार्कंडेय यांनी केली आहे. 


गर्भधारणा कालावधीत दोन गर्भ वाढत असतील तर काही गर्भ वाढीला पूरक ठरत नाहीत. मात्र ते जिवंत स्वरूपात गर्भाशयात टिकवून ठेवले जातात. असे गर्भ पुन्हा उत्तेजित करून गर्भधारणा जरी सुरू झाली, तरी त्यांची वाढ अगदी कमी असते. यामुळेच अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या उंचीच्या, वजनाच्या गर्भाची जन्मताना निवड होते. यात गर्भाचा जन्म एकाचवेळी होणे अपेक्षित असते. मात्र, प्रजननातील ठळक विकृतीमध्ये दोन प्रसूतीमधील अंतर क्वचितप्रसंगी असे वाढलेले दिसून येते. मात्र, हा प्रकार सामान्य अजिबात नाही. -डॉ. नितीन मार्कंडेय, ‘माफसू’अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी  

संपादन  - ज्योती देवरे