जिल्ह्यात आधारभूत मका खरेदी संथ...'इतक्या' क्विंटलचीच नोंद?...वाचा सविस्तर

मुकुंद पिंगळे : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

शासकीय हमीभावप्रमाणे एक हजार 760 रुपयांचा दर निश्‍चित करण्यात आला असून, त्यानुसार खरेदी कामकाज सुरू आहे. मात्र, बारदानटंचाई, साठवणूक व्यवस्था अशा अडचणी येत गेल्या अन्‌ त्यातच 21 जूनअखेर राज्यातील मका खरेदीचा लक्ष्यांक पूर्ण झाल्याने खरेदी थांबली.

नाशिक : आधारभूत किंमत खरेदी योजना 2019- 20 अंतर्गत महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे जिल्ह्यातील आठ केंद्रांवर एक हजार 76 शेतकऱ्यांकडून शुक्रवार (ता.26)अखेर 32 हजार 174 क्विंटल मका पिकाची खरेदी झाली आहे. यामध्ये येवला खरेदी- विक्री केंद्राच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांसह खरेदीची आकडेवारी सर्वाधिक आहे. 

लक्ष्यांक पूर्ण झाल्याने खरेदी थांबली

मार्केटिंग फेडरेशनतर्फे आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात 19 मेपासून रब्बी हंगामातील मका खरेदी सुरू आहे. यासाठी जिल्हाभरात तालुकानिहाय नऊ खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. शासकीय हमीभावप्रमाणे एक हजार 760 रुपयांचा दर निश्‍चित करण्यात आला असून, त्यानुसार खरेदी कामकाज सुरू आहे. मात्र, बारदानटंचाई, साठवणूक व्यवस्था अशा अडचणी येत गेल्या अन्‌ त्यातच 21 जूनअखेर राज्यातील मका खरेदीचा लक्ष्यांक पूर्ण झाल्याने खरेदी थांबली. राज्य सरकारने याबाबत केंद्राच्या अन्न व नागरीपुरवठा मंत्रालयाकडे धाव घेतली. 

नऊ लाख टन खरेदीच्या उद्दिष्टास परवानगी

24 जूनला केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेंतर्गत मका खरेदीस 15 जुलैपर्यंत मुदतवाढ देत नऊ लाख टन खरेदीच्या उद्दिष्टास परवानगी दिली. त्यानुसार आता दुसऱ्या टप्प्यात 25 जूनला मका खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे खरेदी केंद्रांवर मका विक्रीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करूनच मका खरेदी केली जात आहे. त्यास रब्बी हंगामाची अट घालून दिली आहे. त्यातच खरेदीचे कामकाज गती घेत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 

नांदगाव तालुक्‍यात "वरतीमागून घोडे' 

नांदगाव तालुक्‍यात खरेदीच्या पहिल्या टप्प्यात काम सुरू झालेच नव्हते. ते दुसऱ्या टप्प्यात 25 जूनला सुरू झाले. निफाड तालुक्‍यात अद्यापही कामकाज सुरू नसल्याची स्थिती आहे. नोंदणीही सुरू नाही अन्‌ खरेदीही नसल्याची स्थिती आहे. 

खरेदी केंद्रावरील खरेदीची स्थिती 

एकूण खरेदी केंद्रे : 9 
एकूण शेतकऱ्यांची नोंदणी : सहा हजार 677 
एकूण झालेली खरेदी : 32 हजार 174 क्विंटल 
पहिल्या टप्प्यातील खरेदी : 28 हजार 508 क्विंटल 
शेतकरी संख्या : 962 
दुसऱ्या टप्प्यातील खरेदी : तीन हजार 666 क्विंटल 
शेतकरी संख्या : 114 

हेही वाचा > आनंदवार्ता! जिल्ह्यातील 'हे' चार तालुके झाले कोरोनामुक्‍त...एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

तालुकानिहाय मका खरेदी :( जूनअखेर नोंदणी व खरेदी) 
तालुका...नोंदणी झालेले शेतकरी...मका खरेदी (क्विंटल) 

सिन्नर------881------2,116 
येवला-----854-------6,978 
चांदवड----672-------3,558 
मालेगाव---6,805-----1,454 
सटाणा----2, 862----987 
देवळा-----551-------4620 
नांदगाव----104-------115  

हेही वाचा > VIDEO : अमर रहे..वीरजवान सचिन मोरे अमर रहे..शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Basic maize procurement in the district is slow nashik marathi news