चांदवड नगरपरिषद निवडणूक: भाजप नगरसेवकांना भूषण कासलीवाल यांचा 'व्हीप'; बैठकीत ठरणार आगामी राजकारणाची दिशा

हर्षल गांगुर्डे
Thursday, 15 October 2020

चांदवड नगरपरिषद निवडणुक काही महिन्यावर असताना पालिकेचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. गेली काही वर्षे भूषण कासलीवाल यांच्या नेतृत्वाखाली काढल्यानंतर आता त्यांच्याच विरोधात अविश्वास ठराव प्रक्रियेत खुद्द भाजप नगरसेवकांनी सहभाग दर्शविल्याने आता भाजपाचे गटनेता या हक्काने उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी संबधित नगरसेवकांना 'व्हीप' अर्थात पक्षादेश बजावला आहे.

गणुर (जि.नाशिक) : चांदवड नगरपरिषद निवडणुक काही महिन्यावर असताना पालिकेचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. गेली काही वर्षे भूषण कासलीवाल यांच्या नेतृत्वाखाली काढल्यानंतर आता त्यांच्याच विरोधात अविश्वास ठराव प्रक्रियेत खुद्द भाजप नगरसेवकांनी सहभाग दर्शविल्याने आता भाजपाचे गटनेता या हक्काने उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी संबधित नगरसेवकांना 'व्हीप' अर्थात पक्षादेश बजावला आहे. 

पक्ष विरोधी काम करू नये अशा आशयाचा व्हीप

चांदवड नगरपरिषद निवडणूकी पूर्वीचं रंगलेले राजकारण प्रत्यक्ष निवडणूक कालावधीत किती 'हाय व्होल्टेज' होणार याची चुणूक नुकतीच चांदवडकरांना दिसली. निमित्त आहे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या विरोधात आणलेला अविश्वास ठराव व या प्रक्रियेत खुद्द त्यांच्याच (भाजपा) पक्षाच्या नगरसेवकांनी घेतलेला सहभाग याबाबत चांदवड नगरपरिषदेत उद्या म्हणजेच (ता. १६) शुक्रवारी बैठक बोलविण्यात आली आहे. मात्र या बैठकीस उपस्थित राहू नये व पक्ष विरोधी काम करू नये अशा आशयाचा व्हीप पक्षादेश भूषण कासलीवाल यांनी नोटीस द्वारे पार्वताबाई पारवे, इंदूबाई वाघ, सुनीता पवार, शालिनी भालेराव, जयश्री हांडगे या नगरसेविकांना बजावला आहे.

पालिकेच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार

२०१५ साली भाजप गटातील या पाच नगरसेविका व भूषण कासलीवाल यांनी आपल्या गटाची स्थापना जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. गटनेता म्हणून कासलीवाल यांची नोंद केली आहे. यामुळे उद्या म्हणजेच ता. १६ शुक्रवारी होणाऱ्या विशेष बैठकीस उपस्थित राहू नये व पक्षविरोधी काम करू नये असा व्हीप कासलीवाल यांनी बजावला आहे. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत वरील नगरसेविकांनी पक्षादेश न मानता त्याचे उल्लंघन केल्यास सदस्य महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियमानुसार जिल्हाधिकारी यांच्याकडून होणाऱ्या व अपात्रतेच्या कारवाईस पात्र राहतील असाही उल्लेख कासलीवाल यांनी केला आहे. यामुळे उद्याच्या विशेष बैठकीत काय होईल यावर पालिकेच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhushan Kasliwal's whip to BJP corporators chandwad nashik marathi news