महापालिकेच्या महासभेसाठी भाजपचा अट्टहास..जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीपूर्वीच अजेंडा जाहीर 

nashik nmc bjp.jpg
nashik nmc bjp.jpg

महासभेसाठी भाजपचा अट्टहास 

जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीपूर्वीच अजेंडा जाहीर, शिवसेनेचा इशारा 


नाशिक : महापालिकेची महासभा महिन्यातून एकदा घ्यावी लागते, हे जरी खरे असले तरी आपत्कालीन परिस्थितीत सभा घेता येत नाही. घ्यायचीच असेल, तर जिल्हाधिकाऱ्यांची विशेष परवानगी लागते. महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मात्र परवानगीची वाट न पाहताच 20 मेचा महासभेचा अजेंडा जाहीर केल्याने आपत्कालीन कायद्याचे तीन तेरा वाजविले आहे. विशेष म्हणजे, तहकूब व नियमित तसेच अंदाजपत्रकीय अशा दोन सभा जाहीर केल्याने कितीही सामाजिक अंतर ठेवले तरी एकाच ठिकाणी दोन दिवस बसावे लागणार आहे. त्यामुळे भाजपला नेमके काय साधायचे, असा प्रश्‍न चर्चिला जात आहे. 

महासभेचा अजेंडा आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चर्चेला
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी सलग चौथा लॉकडाउन लागू करण्याचे संकेत सरकारकडून मिळत आहे. अशा परिस्थितीत स्थानिक संस्थांनीदेखील महासभा विलंबाने घेण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक महापालिकेला मात्र महासभा घेण्याची घाई झाली असून, सोशल डिस्टन्स राखण्यासाठी थेट कालिदास कलामंदिरमध्ये महासभा घेण्याची व महासभेच्या सभागृहात स्थायी समिती सदस्यांची बैठक घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. नियमानुसार आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या नगरसचिव विभागाकडून परवानगी मागितली आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नसताना महासभेच्या कामकाजाचा अधिकृत अजेंडा जाहीर केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय सकारात्मकच होईल, हे गृहित धरून महासभेचा काढलेला अजेंडा आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चर्चेला आला आहे. 

आपत्कालीन परिस्थितीत घाई का? 
कोरोनावर विशेष महासभा झाली असती तर एकवेळ समजू शकलो असतो; परंतु संचारबंदी लागू असताना महासभा बोलाविण्याची घाई संशयास्पद आहे. दोन दिवस महासभा चालणार असल्याने याची जबाबदारी सत्ताधारी भाजप घेणार का? पहिली सभा नियमित विषयांची आहे. हे विषय यापूर्वीच महासभेवर चर्चेला आले होते. त्या विषयांना महत्त्व न देता तहकूब करण्यात आले. आता संचारबंदीच्या काळात या विषयांचे एवढे काय महत्त्व भाजपला वाटले. दुसरी महासभा अंदाजपत्रकीय असली तरी आतापर्यंतचा इतिहास ऑक्‍टोबरमध्ये अंदाजपत्रक मंजूर झाल्याचा आहे. त्यामुळे भाजपचा हा अट्टाहास शहराला परवडणार नाही. कोरोनाशी लढा देणाऱ्या अधिकाऱ्यांना अधिकाधिक कामासाठी वेळ देणे अपेक्षित असताना, त्यांना दोन दिवस अडकून ठेवणे शहरासाठी परवडणारे नाही. भाजपचा कालिदासमधील महासभेचा दोनदिवसीय नाट्यप्रयोग आरोग्याच्या दृष्टीने धोकादाक असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com