Onion Export ban : लासलगावला संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको; केंद्राच्या कांदा निर्यात बंदीने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

भाऊसाहेब गोसावी
Tuesday, 15 September 2020

तीन महिने ६०० ते ७०० रुपये क्विंटल विकणाऱ्या कांद्याला सरासरी दोन हजार रुपये भाव मिळायला आठवडाही उलटत नाही तोच सरकारने निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.

नाशिक / लासलगाव : तीन महिने ६०० ते ७०० रुपये क्विंटल विकणाऱ्या कांद्याला सरासरी दोन हजार रुपये भाव मिळायला आठवडाही उलटत नाही तोच सरकारने निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट व बांगलादेश बॉर्डर येथे रविवारी रात्रीपासूनच निर्यातीसाठी दाखल झालेले कंटेनर सोमवारी सोडले नसल्याने निर्यातबंदीची शक्यता अखेर खरी ठरली. गेल्या वर्षीच २९ सप्टेंबर २०१९ रोजी निर्यातबंदी केल्यानंतर ती यंदा फेब्रुवारीत उठवण्यात आली होती. आठ महिन्यांत पुन्हा निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. राज्यात ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले असून केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

सरकारचा हा निर्णय

कांद्याने आठवडाभरात सरासरी दोन हजार रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर आणखी भाववाढीच्या भीतीने केंद्र सरकारने सोमवारी अखेर कांदा निर्यातबंदीचा आदेश जारी केला आहे. कांद्याचे उत्पादन करणाऱ्या नाशिक जिल्ह्यासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने कांदा पिकाचे झालेले नुकसान लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

लासलगाव- नामपूरला आंदोलन

केंद्र शासनाने अचानक कांद्याची निर्यात बंदी केल्या मुळे कांदा उत्पादन शेतकऱ्यांची कोंडी केल्यामुळे  रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली रयत क्रांती संघटनेचे नेते दिपक पगार यांच्या नेतृत्वाखाली नामपुर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आंदोलन करण्यात आले. कांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी संतप्त, उमराणेमध्ये कांदा लिलाव बंद करण्यात आला. तर मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोकोही करण्यात आला. लासलगावातही कांदा लिलाव अद्याप बंद तर शिरुरमध्येही कांदा पडून आहे.

कांदा आता निर्यात न होता देशातच राहील

वाणिज्य मंत्रालयाचे अमितकुमार यांनी सोमवारी (ता.१४) सायंकाळी कांदा निर्यातबंदीचे परिपत्रक काढले आहे. सद्य:स्थितीत मुंबई बंदरावर दुबई, कोलंबो येथे निर्यातीसाठी ४०० कंटेनर (सुमारे १२ हजार टन), तसेच लासलगाव व कसबे सुकेणे येथून रेल्वेने ८४ रॅकमधून ३,२४२ टन कांदा नुकताच पाठवला आहे. असा एकूण १५ ते १६ हजार टन कांदा आता निर्यात न होता देशातच राहील. या मालापोटी व्यापाऱ्यांचे ४० ते ४२ कोटी रुपये अडकणार आहेत, शिवाय आता हा कांदा सडायला सुरुवात होईल आणि व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

महाराष्ट्रातील विशेषतः नाशिकमधील कांद्याला मागणी

दक्षिण भारत व मध्य प्रदेशातील कांदा या वर्षीच्या पावसाने खराब झाल्याने महाराष्ट्रातील विशेषतः नाशिकमधील कांद्याला मागणी वाढली होती. त्यामुळे कांद्याचे भाव वधारले होते. मात्र, देशात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन कांद्याचे किरकोळ बाजारात भाव वाढतील. यामुळे संसदेतील पावसाळी अधिवेशनात रोष निर्माण होईल. यामुळे केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी केल्याचे समोर आले आहे. याचा परिणाम कांदा भावावर होईल व येत्या काळात वधारलेले कांद्याचे भाव खाली येतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप होईल, असे चित्र आहे.

तुटवड्याच्या भीतीने निर्यातबंदी

अतिपावसामुळे कांदा पिकाला फटका बसला असून, देशांतर्गत बाजारात तुटवडा जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन ही बंदी घालण्यात आली आहे. देशातील कांद्याची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावात घाऊक बाजारात कांद्याचा दर टनाला ३० हजार रुपये (३० रुपये किलो) किलोपर्यंत पोहोचला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Block the way of angry farmers to Lasalgaon nashik marathi news