"पाणी जनतेच्या उपयोगी आणा; वळण योजना प्रकल्प तातडीने पूर्ण करा" 

महेंद्र महाजन
Tuesday, 22 September 2020

पश्‍चिमेकडे वाहून जाणारे जिल्ह्यातील पाणी जनतेच्या उपयोगी आणण्यासाठी वळण योजना प्रकल्प तातडीने पूर्ण करा. तसेच महाराष्ट्रातील पाणी गुजरातमध्ये वाहून न जाता ते महाराष्ट्रात कसे राहील, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

नाशिक : पश्‍चिमेकडे वाहून जाणारे जिल्ह्यातील पाणी जनतेच्या उपयोगी आणण्यासाठी वळण योजना प्रकल्प तातडीने पूर्ण करा. तसेच महाराष्ट्रातील पाणी गुजरातमध्ये वाहून न जाता ते महाराष्ट्रात कसे राहील, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

भुजबळ : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक 
भुजबळ फार्म येथे झालेल्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ आढावा बैठकीत ते बोलत होते. माजी खासदार समीर भुजबळ, येवला पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव (नाशिक), अरुण नाईक (नगर), श्री. आमले (धुळे), ऊर्ध्व गोदावरी कार्यकारी अभियंता राहुल पाटील, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, नांदूरमध्यमेश्‍वरचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी आदी उपस्थित होते. श्री. भुजबळ म्हणाले, की नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्पांची सद्यःस्थिती लक्षात घेऊन प्राधान्याने ते पूर्ण करा. जेणेकरून त्याचा फायदा मराठवाड्याला होईल. त्यामध्ये मांजरपाडासह प्रवाही वळण योजनांसाठी प्राधान्य देण्यात यावे. त्यानुसार उर्वरित इतर योजनांची मांडणी करण्यात यावी. 

कालेश्‍वरच्या धर्तीवर आराखडा करा 
तेलंगणाच्या कालेश्‍वरम उपसा सिंचन प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यातील प्रकल्पांचा आराखडा सादर करण्यात यावा. तसेच जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांसाठी सौरऊर्जेचा वापर अधिक कसा करता येईल, याकडे लक्ष ठेवण्यात यावे. याशिवाय सिन्नर तालुक्यातील पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी तत्काळ प्रकल्पाचे काम हाती घेण्यात यावे. त्यासोबत नदीजोड प्रकल्पासाठी मुख्य अभियंता या स्वतंत्र पदाची निर्मिती विचाराधीन असून, त्याचे कार्यालय नाशिकला होण्यासाठी आपण प्राधान्य देणार असल्याचेही श्री. भुजबळ यांनी सांगितले. 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bring water useful to the people said chhagan bhujbal nashik marathi news