
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजात अधिक रुजविण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करत विविध सामाजिक कार्यक्रमातून प्रत्येक गावात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करावी, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
नाशिक : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजात अधिक रुजविण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करत विविध सामाजिक कार्यक्रमातून प्रत्येक गावात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करावी, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबई झाली, यावेळी ते बोलत होते.
जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून साजरा व्हावा
भुजबळ म्हणाले, की देशातील महिलांसाठी महात्मा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली. महिलांना शिकवण्यासाठी महात्मा फुले यांनी पत्नी सावित्रीबाईंना शिकवले आणि शिक्षिका केले. त्या काळात सामाजिक बहिष्कार स्वीकारून प्रसंगी शेण व दगडधोंड्यांचा मार सहन करत त्यांनी मुलींना शिकवण्याचे कार्य केले. शिक्षण मिळाल्याने चूल आणि मूल परंपरेत चार भिंतीत अडकलेली महिला घराबाहेर पडली. त्याचा परिणाम म्हणजे आज महिला अनेक महत्वाच्या पदांवर काम करताना आपण पाहत आहोत. त्यामुळे महिला मुक्तीच्या शिल्पकार सावित्रीबाईंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिन देशभर महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत सकारात्मकता दर्शवली.
हेही वाचा >> पित्याच्या सांगण्यावरून अखेर घटनेचा ११२ दिवसांनी उलगडा; धक्कादायक माहिती समोर
‘सावित्रीज्योती’ मालिकेला अर्थसहाय्य
तसेच महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत सोनी मराठी वाहिनीवर सुरु असलेली ‘सावित्रीजोती’ मालिका बंद करण्यात येत आहे. महापुरुषांचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य सरकारतर्फे अर्थसहाय्य देण्यात यावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी त्यांनी चर्चा केली. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे जीवन व समाजकार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचे काम मालिकेद्वारे केले जात आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्म झाल्यापासूनच्या साधारण ३० वर्षाच्या कालावधीचे प्रक्षेपण झालेले आहे. मालिकेचे अद्याप १०० भाग प्रदर्शित होण्याचे बाकी आहेत.
माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, कार्याध्यक्ष बापू भुजबळ, प्रा. हरी नरके, महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे, ऍड सागर किल्लारीकर, मंगेश ससाने, कमलाकर दरोडे, पांडुरंग अभंग, ईश्वर बाळबुधे, बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे, अॅड.सुभाष राऊत, प्रित्येश गवळी, प्रा.दिवाकर गमे, प्रा. नागेश गवळी, रमेश बारस्कर, राज असरोडकार, प्रा कविता मेहेत्रे आदी उपस्थित होते.
हेही वाचा >> डॉक्टरांचे ऐकले असते तर आज 'त्यांचे' प्राण वाचले असते! परिसरात हळहळ
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी वयाच्या १७ व्या वर्षांपासून ते ७७ व्या वर्षांपर्यंत म्हणजेच ५० वर्षे सामाजिक कार्यात सातत्याने काम केले. सातत्याने ५० वर्ष सामाजिक कार्य करणाऱ्या त्या एकमेव महिला होत्या. त्यांच्या विचारांचा वारसा आपण जपला पाहिजे. तसेच मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र ओबीसीच्या ताटातील आरक्षण हिसकावून घेऊ नये यासाठी ओबीसी समाजात जनजागृती करण्यात यावी.
- प्रा. हरी नरके