पित्याच्या सांगण्यावरून अखेर घटनेचा ११२ दिवसांनी उलगडा; धक्कादायक माहिती समोर

कमलेश जाधव
Monday, 21 December 2020

तब्बल ११२ दिवसांनंतर गुप्त माहितीच्या आधारे या घटनेचा उलगडा येवला तालुका पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी तिघा संशयित आरोपींना अटक केली असून, वरिष्ठ पोलिस अधिकारी कसून शोध घेत आहेत.  

नगरसूल (जि.नाशिक) : तब्बल ११२ दिवसांपासून गायब असलेल्या येथील अमोल वऱ्हे या तरुणाच्या खुनाचा नुकताच येवला पोलिसांनी उलगडा केला आहे. सोमनाथ आसाराम वऱ्हे यांचे एकत्रित कुटुंब असून, ते त्यांच्या तीन मुलांसह नगरसूल शिवार नांदगाव रोड भागात राहतात.

पित्याच्या सांगण्यावरून झालेल्या खुनाचा ११२ दिवसांनी उलगडा 

अमोल वऱ्हे (वय १८) या त्यांच्या धाकट्या मुलाच्या व्यसनाधिनतेमुळे व चुकीच्या वागण्यामुळे समाजात बदनामी होते, या कारणावरून जन्मदात्या सोमनाथ वऱ्हे या पित्याने चिथावणी दिल्यामुळे अमोलचे सख्खे भाऊ असलेले संशयित आरोपी भीमराज वऱ्हे व किरण वर्हे या दोघांनी ३० ऑगस्ट २०२० ला रात्री नऊच्या सुमारास दोरीच्या सहाय्याने अमोलचा गळा आवळून खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अमोलचा मृतदेह जीपमधून नेत नगर जिल्ह्यातील मळेगाव येथून वाहणाऱ्या गोदावरी नदीत पोटाला दगड बांधून वाहत्या पाण्यात फेकून दिला.

हेही वाचा >> मित्राच्या बहिणीच्या लग्नाचा तो सोहळा ठरला अखेरचा; जीवलग मित्राची कायमची ताटातूट ​

पोलीसांचा कसून शोध 

तब्बल ११२ दिवसांनंतर गुप्त माहितीच्या आधारे या खुनाचा उलगडा येवला तालुका पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी तिघा संशयित आरोपींना अटक केली असून, वरिष्ठ पोलिस अधिकारी कसून शोध घेत आहेत.  

हेही वाचा >> चार वर्षाच्या चिमुरड्या 'राई'ने जिंकलं सर्वांचं मन! तीन तास नॉनस्टॉप कळसुबाई सर ​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 112 days after murder of his father nashik marathi news