भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये "फलकयुद्ध'..महापालिका प्रशासन दोन हात दूर 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 February 2020

या घटनेवरून दोन्ही पक्षांत श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून, या प्रकरणापासून पोलिस व महापालिका प्रशासनाने दोन हात दूर राहणे पसंत केले आहे. आगामी काळात भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये "फलकयुद्ध' पाहायला मिळणार आहे.

नाशिक  : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे सेंट्रल पार्क येथे प्रशासकीय मंजुरी न घेता "शिवछत्रपती उद्यान' असे फलक लावल्याने राजकारण पेटले आहे. भाजपने या प्रकाराचा निषेध केला असून, ही राजकीय स्टंटबाजी असल्याची टीका भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी केली. या घटनेवरून दोन्ही पक्षांत श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून, या प्रकरणापासून पोलिस व महापालिका प्रशासनाने दोन हात दूर राहणे पसंत केले आहे. आगामी काळात भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये "फलकयुद्ध' पाहायला मिळणार आहे. 

राष्ट्रवादीकडून "शिवछत्रपती उद्यान' फलक; भाजपकडून निषेध 

या फलकाच्या उद्‌घाटनप्रसंगी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सिडको विभागीय अध्यक्ष विशाल डोके, कॉंग्रेसचे माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, कॉंग्रेसचे सिडको अध्यक्ष विजय पाटील, बाळासाहेब जमदाडे, दीपक मराठे, संजय भामरे, सुनील जगताप, डॉ. संदीप मंडलेचा, शंकर पांगरे, रोहित जगताप, अमित खांडे, प्रीतम भामरे, योगेश गांगुर्डे, आशिष हिरे आदी उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत हा फलक येथून हटविणार नाही, असा निर्धार फलक लावणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विशाल डोके यांनी केल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. 

प्रशासकीय मान्यता न घेता फलक लावणे चुकीचे
अशा पद्धतीने फलक लावणे हे असंविधानिक आहे. यापूर्वी मी व शिवसेनेच्या नगरसेविका रत्नमाला राणे यांनी महासभेत सेंट्रल पार्कच्या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव व आतील सभागृहाला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याचा ठराव केलेला आहे. प्रशासकीय मान्यता न घेता फलक लावणे चुकीचे आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. -मुकेश शहाणे, भाजप नगरसेवक 

हेही वाचा > ज्या आईच्या उदरातून जन्म घेतला, त्यावरच 'त्याने' घाव घातला...

हा फलक कोणत्याही परिस्थितीत हटविणार नाही

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सेंट्रल पार्कचे "शिवछत्रपती उद्यान' असे नामकरण करत फलकाचे अनावरण केले. या उपक्रमाबाबत सर्व शिवप्रेमींनी स्वागत केले आहे. हा फलक कोणत्याही परिस्थितीत हटविणार नाही. फलक कोणी हटविण्याचा प्रयत्न केल्यास त्यास जशास तसे उत्तर देऊ. -विशाल डोके, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, विभागीय अध्यक्ष, सिडको 

हेही वाचा > सुनेला वाचविण्यासाठी 'ते' पुढे सरसावले!...तर मुलाने त्यांनाच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Park naming controversy battle of credit for NCP and BJP Nashik Marathi News