esakal | नाशिककरांना लवकरच स्वस्त गॅस उपलब्ध! पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठ्याचा मार्ग मोकळा 
sakal

बोलून बातमी शोधा

LPG-cylinders.jpg

स्मार्ट शहराकडे वाटचाल होत असताना नाशिकमध्ये स्मार्ट प्रकल्प येऊ घातले आहेत. त्यातीलच घरोघरी सिलिंडरऐवजी पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा करण्याची योजना महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीतर्फे अमलात आणली जात आहे.

नाशिककरांना लवकरच स्वस्त गॅस उपलब्ध! पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठ्याचा मार्ग मोकळा 

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : घरोघरी पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) दीडशे किलोमीटरचे रस्ते खोदण्यासाठी महापालिकेचे डॅमेजिंग चार्जेस भरण्याची तयारी दर्शविली आहे. या माध्यमातून शहरात स्वस्त गॅस उपलब्ध होण्याशिवाय महापालिकेच्या उत्पन्नात देखील वाढ होणार आहे. गॅस सिलिंडर साधारण सहाशे ते सातशे रुपयांदरम्यान मिळते. पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर नाशिककरांना निम्म्या किमतीत गॅस उपलब्ध होईल. 

लवकरच स्वस्त गॅस उपलब्ध; पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठ्याचा मार्ग मोकळा 
स्मार्ट शहराकडे वाटचाल होत असताना नाशिकमध्ये स्मार्ट प्रकल्प येऊ घातले आहेत. त्यातीलच घरोघरी सिलिंडरऐवजी पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा करण्याची योजना महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीतर्फे अमलात आणली जात आहे. नॅचरल गॅससाठी एमएनजीएल कंपनीने आडगाव ट्रक टर्मिनल, मालेगाव स्टॅन्ड, पाथर्डी फाटा, विल्होळी नाका या चार स्टेशनसाठी महापालिकेकडून पंधरा वर्षांसाठी जागेचा करार केला आहे. येथे सीएनजी युनिट, रिफलिंग केले जाईल.

‘एमएनजीएल’ खोदकामाचे शुल्क भरणार

आता पुढील टप्प्यात गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदावे लागणार आहेत. शहरात पहिल्या टप्प्यात दीडशे किलोमीटरची पाइपलाइन टाकली जाईल. परंतु रस्ते खोदण्यापूर्वी महापालिकेकडे डॅमेज चार्जेस भरावे लागणार असल्याने पुणे महापालिकेच्या धर्तीवर डॅमेज चार्जेसमध्ये सवलत मिळावी, अशी मागणी एमएनजीएल कंपनीकडून करण्यात आली होती. महापालिकेची आर्थिक परिस्थिती पुणे व मुंबई महापालिकेइतकी सक्षम नसल्याने आयुक्त कैलास जाधव यांच्यासह स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी नकार दिला. त्यामुळे कंपनीने डॅमेज चार्जेस भरण्याची तयारी दाखविल्याने नॅचरल गॅस पाइपलाइन टाकण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

पर्यावरणपूरक व निम्मी किंमत 
- एलपीजी गॅसपेक्षा ४० टक्क्यांनी किंमत कमी 
- घरोघरी सिलिंडर पोचविण्याची पद्धत होणार बंद 
- पाणी मीटरप्रमाणे वापरानुसार होणार बिलिंग 
- गॅस सिलिंडरसाठी वारंवार नंबर लावण्यापासून सुटका 
- स्फोटक गॅस नसल्याने धोके कमी 
- चोवीस तास गॅस उपलब्ध 
- हाताळण्यास सोपे 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

...असे होईल खोदकाम 
शहरात पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा करताना रस्ते खोदकाम केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात २५ किलोमीटरचे रस्ते खादून पाइपलाइन टाकली जाईल. सिडकोतील पाथर्डी फाटा सर्कल येथे ९२३ मीटर, आनंदनगर ५,२०८ मीटर, ज्ञानेश्वरनगर भागात ५,६८९, पाथर्डी रस्त्यावरील पांडवनगरी येथे ३,१२८ मीटर, इंदिरानगर भागात ४,३४३, तर सातपूर भागात सेरेन मेडाजमधील ७,१२० मीटर याप्रमाणे खोदकाम केले जाईल. 

हेही वाचा > ...म्हणून अधिकृत मेडिकलमधूनच खरेदी करा औषधे! रुग्ण व नातलगांना सतर्कतेचा इशारा


घरोघरी गॅस पाइपलाइन पोचविण्यासाठी एमएनजीएल प्रयत्नशील आहे. परंतु महापालिकेचे नुकसान होऊ नये म्हणून रस्ते खोदकामासाठी शुल्क भरून घेतले जाणार आहे. महापालिकेला साधारण २५ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होईल. शहराच्या दृष्टीने प्रकल्प महत्त्वाचा आहे. -गणेश गिते, सभापती, स्थायी समिती 

महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच नाशिकमध्ये नवीन सीएनजी स्टेशन सुरू होतील. हरित व सुंदर नाशिकसाठी एमएनजीएल मदत करण्याचे आश्वासन आयुक्त व स्थायी समिती सभापतींनी दिले. -राजेश पांडे, संचालक, एमएनजीएल