...म्हणून अधिकृत मेडिकलमधूनच खरेदी करा औषधे! रुग्ण व नातलगांना सतर्कतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

बनावट औषधांची विक्री करून थेट रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे धक्कादायक प्रकार सध्या घडत आहेत. औषधांच्या काळ्या बाजाराची प्रकरणे पुढे येऊ लागल्याने यापुढील काळात रुग्ण आणि त्यांच्या नातलगांनी अधिक सतर्क राहायला सांगण्यात येत आहे.

नाशिक : बनावट औषधांची विक्री करून थेट रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे धक्कादायक प्रकार सध्या घडत आहेत. औषधांच्या काळ्या बाजाराची प्रकरणे पुढे येऊ लागल्याने यापुढील काळात रुग्ण आणि त्यांच्या नातलगांनी अधिक सतर्क राहायला सांगण्यात येत आहे.

महागडी औषधे चोरट्या मार्गाने विकल्याचा प्रकार

सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी सरकारकडून मोफत पुरविण्यात येणारी रेमडेसिवीरसारखी महागडी औषधे तेथील काही कंत्राटी कर्मचारी चोरट्या मार्गाने बाहेर आणून विकत असल्याचा प्रकार उघडकीस येत आहेत. या प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या आदेशानंतर सिव्हिल हॉस्पिटलच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची चौकशी समिती नेमून या गैरप्रकाराची चौकशी केली. 

दुकानांमधूनच औषधे खरेदी करून फसवणूक टाळावी,

बनावट औषधांची विक्री करून थेट रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकारही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेमडेसिवीर औषध काळ्या बाजारात विकणे गंभीर आहेच. मात्र, औषधाच्या बाटलीत दुसरेच औषध विकण्याचा धंदा कोणी सुरू केला, तर रुग्ण जीवानिशी जाईल. त्यामुळेच नागरिकांनी प्रचलित औषध दुकानांमधून औषधे खरेदी करून त्याचे रीतसर बिल घ्यावे, असे आवाहन मांढरे यांनी केले. काळ्याबाजारात अल्प किमतीत औषध खरेदी करणे अधिक जोखमीचे असून, नागरिकांनी औषध दुकानांमधूनच औषधे खरेदी करून फसवणूक टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

कोविडमधील कर्मचाऱ्यांसाठी बॅचेस

रेमडेसिवीरच्या काळ्याबाजाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेमण्यात आलेल्या चौकशी समितीलाही कोविड कक्षातील कामकाजात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. याबाबतची निरीक्षणे नोंदवून ती जिल्हा शल्यचिकित्सकांना सादर करण्यात आली आहेत. संसर्गापासून बचाव करण्याच्या कारणास्तव कोविड कक्षामध्ये वावरणारे डॉक्टर, परिचारिका आणि अन्य सर्वच कर्मचाऱ्यांना पीपीई किट परिधान करणे अनिवार्य आहे. मात्र, या पीपीई किटमुळे डॉक्टर व कर्मचारी पटकन लक्षात येत नाही. म्हणूनच सिव्हिल प्रशासनाने नावांची बॅचेस बनविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली आहे. संबंधित कर्मचारी कायम आहे की कंत्राटी, डॉक्टर आहे की अन्य कर्मचारी हे ओेळखणे त्यामुळे शक्य होऊ शकणार आहे.

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

जिल्हाधिकारींचे आवाहन

याचा काळाबाजारच नाही, तर स्वार्थासाठी बनावट औषधांच्या विक्रीही होत आहेत. यातून एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी रेमडेसिवीर असो वा अन्य औषधे, अधिकृत मेडिकल स्टोअर्समधूनच खरेदी करून त्याचे रीतसर बिल घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only buy medicines from authorized medical nashik marathi news