पांजरपोळच्या जागेवर सिडकोचा सातवा प्रकल्प; पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे ४५ वर्षांनंतर सिडको सक्रिय 

cidcos seventh project at Panjarpol site nashik marathi news
cidcos seventh project at Panjarpol site nashik marathi news

नाशिक/सिडको : नाशिकच्या विकासात भर घालणारा सिडकोचा भव्यदिव्य प्रकल्प लवकरच साकारण्याचे विचाराधीन आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन नाशिक सिडको प्रशासक घनश्याम ठाकूर यांच्यासमवेत बैठक घेतली. पुढील आठवड्यात सिडकोचे मुख्य व्यवस्थापक व नगरविकासमंत्री यांच्या सोबत प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिले. 

साधारणतः १९७५ ला सिडको प्रशासनाने नाशिकला एक हजार एकर जमीन हस्तांतरित करून त्यावर २४ हजार ५०० लघु, मध्यम व उच्च वर्गातील नागरिकांसाठी एकूण सहा योजनांमध्ये घरे बांधली. तसेच पाच हजार प्लॉट्सचे शाळा, रुग्णालय, घरगुती, व्यापारी संकुल, सामाजिक वापरासाठी वाटप केले. सिडकोच्या या प्रकल्पाला तब्बल ४५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात नाशिकची वाढती लोकसंख्या व परवडणाऱ्या घरांची गरज लक्षात घेऊन सिडकोसारखा एक नवीन प्रकल्प होणे काळाची गरज होती. मात्र हा विषय कायम दुर्लक्षित राहिला. हे लक्षात घेऊन शनिवारी (ता. ३) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भुजबळ फार्म येथे सिडको प्रशासन अधिकारी घनश्याम ठाकूर यांच्यासोबत बैठक घेतली. 

मुंबईत बैठक 

सिडकोच्या नवीन योजना नाशिकमध्ये कशा राबविता येतील, यावर प्रोजेक्ट तयार करून पुढील आठवड्यात सिडकोचे मुख्य व्यवस्थापक व नगरविकास मंत्र्यांसोबत बैठक होणार असून, त्यात, पालकमंत्री भुजबळ यांच्या पुढाकारातून अहवाल सादर होणार आहे. त्यात पांजरपोळच्या जमिनीवर सातवा प्रकल्प साकार होऊ शकतो. सिडकोच्या या प्रस्तावित नवीन प्रकल्पाबाबत पालकमंत्री भुजबळ यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे नाशिकच्या बांधकाम क्षेत्राला बूस्ट मिळण्याच्या अपेक्षा आहे. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. 

पांजरपोळ जमिनीवर प्रकल्प 

सिडकोच्या नवीन प्रोजेक्टसाठी अंबड परिसरातील पांजरपोळ संस्थेची एक हजार २०० एकर जमीन घेण्याचा विचार आहे. यात प्रत्येक वर्गातील नागरिकांना परवडेल, अशी घरे व प्लॉटची विक्री करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम, मेट्रो प्रकल्प, आयटी पार्क, हेलिपॅड, स्वीमिंग टॅंक आदीचे नेटके नियोजन असल्याचे समजते. 


पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सिडकोच्या नवीन प्रोजेक्टसंदर्भात पुढाकार घेतला असून, पुढील आठवड्यात माजी खासदार समीर भुजबळ, सिडकोचे मुख्य व्यवस्थापक व नगरविकासमंत्री यांच्यातील बैठकीत प्रोजेक्ट सादर होणार आहे. 
- घनश्याम ठाकूर, सिडको प्रशासक, नाशिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com