जिल्‍ह्यात उद्यापासून शाळेची घंटा वाजणार; मात्र पालकांचे संमतीपत्र बंधनकारकच

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 January 2021

काही दिवसांपूर्वी जिल्‍हा प्रशासनाच्‍या झालेल्‍या आढावा बैठकीनुसार सोमवार (ता.४) पासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. विद्यार्थी येणार असल्‍याने शाळा, महाविद्यालयांकडून प्रांगणात निर्जंतुकीकरण केले जाते आहे.

नाशिक : कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून शाळा, महाविद्यालये बंद असल्‍याने ऑनलाइन स्‍वरूपात अध्ययन प्रक्रिया सुरू होती. परंतु प्रशासकीय धोरणानुसार सोमवार (ता. ४) पासून शहरासह जिल्‍हाभरात इयत्ता नववी ते बारावीच्‍या वर्गांना सुरवात होत आहे. या अनुषंगाने शाळा, महाविद्यालयांनी सूक्ष्म नियोजन, उपाययोजना करत विद्यार्थ्यांचे स्‍वागत करण्यासाठी सज्‍ज झाले आहेत. दुसरीकडे अनेक विद्यार्थीदेखील शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी इच्‍छुक आहेत. 

पालकांचे संमतीपत्र जमा करणे बंधनकारक

अनलॉकच्‍या प्रक्रियेत नोव्‍हेंबरअखेरीस राज्‍यातील काही जिल्‍हे, शहरांतील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यात आले होते; परंतु नाशिकमध्ये पालकांचा वाढता विरोध लक्षात घेता जिल्‍हा प्रशासनाच्‍या स्‍तरावर झालेल्‍या बैठकीत ४ जानेवारीपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केला होता. दरम्‍यान, गेल्‍या काही दिवसांपासून नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी जिल्‍हा प्रशासनाच्‍या झालेल्‍या आढावा बैठकीनुसार सोमवार (ता.४) पासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. विद्यार्थी येणार असल्‍याने शाळा, महाविद्यालयांकडून प्रांगणात निर्जंतुकीकरण केले जाते आहे. तसेच वर्गांमध्ये शारीरिक अंतर पाळले जाईल, याची खबरदारी घेत तशी बैठकव्‍यवस्‍था करण्यात कर्मचारीवृंद व्‍यस्‍त आहेत. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्‍या पालकांना त्‍यांच्‍या नोंदणीकृत व्हॉट्स‌अॅप क्रमांकावर संमतीपत्राची प्रत पाठविली जाते आहे. शाळा-महाविद्यालयांत येताना पालकांचे संमतीपत्र जमा करणे बंधनकारक असणार आहे. 

हेही वाचा>  दिव्यांग पित्याचे मुलाला अभियंता बनविण्याचे डोळस स्वप्न; कॅलेन्डर विक्रीतून जमवताय पै पै, असाही संघर्ष

आठवड्यातून तीन दिवसांचे 
नियोजन, वेळही मर्यादित 

मोठी विद्यार्थिसंख्या असलेल्‍या शाळा, महाविद्यालयांनी प्रत्‍येक विद्यार्थ्यास आठवड्यातून तीन दिवस महाविद्यालयात यावे लागेल, असे वेळापत्रक तयार केले आहे. तसेच रोज तीन तास नियमित तासिका घेतल्‍या जाणार आहेत. कुठल्‍या दिवशी उपस्‍थित राहायचे आहे, याबद्दलचे सविस्‍तर वेळापत्रक तयार केले असून, त्‍यासाठी विद्यार्थ्यांचे गट केलेले आहेत. वेळापत्रकाव्‍यतिरिक्‍त कुठल्‍याही विद्यार्थ्याने महाविद्यालय प्रांगणात उपस्‍थित राहू नये, असेही कळविले आहे. तसेच शाळा, महाविद्यालयांनी प्रत्‍येक वर्गात निगराणीसाठी शिक्षकांच्‍या नियुक्‍त्‍या केल्या आहेत.  

हेही वाचा> गॅस गिझर भडक्यात बाथरूममध्ये तरुणाचा गुदमरून मृत्यू; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाटील कुटुंबात आक्रोश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Classes IX to XII start from tomorrow in nashik district nashik marathi news