स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे शहरात तीनतेरा; ब्लॅक स्पॉट 'जैसे थे' स्थिती

युनूस शेख
Thursday, 14 January 2021

अनेक भागांमध्ये ब्लॅक स्पॉटची परिस्थिती जैसे थे आहे. कचऱ्याचे ढीग दिसून येत असतात. ब्लॅक स्पॉट कायमस्वरूपी नष्ट होण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत जनजागृती करणे आवश्‍यक आहे

जुने नाशिक : शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा मोठा गाजावाजा केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असल्याचे चित्र विविध भागात दिसून येत आहे. कुठे कचऱ्याचे ढीग, तर कुठे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 

स्वच्छता कर्मचारी दिसेनासे

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात शहराची प्रतिमा उंचावून पैकीच्या पैकी गुण प्राप्त करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. अभियानासंदर्भातील विविध प्रकारचे संदेश देणारे फलक भिंतीवर रंगविले जात आहे. त्यातून केवळ भिंती रंगविण्याचे काम दिलेल्या ठेकेदारास पोसण्याचे काम होत आहे. बहुतांश भागात कचरा करू नये किंवा स्वच्छ भारत अभियानाचे फलक लावले आहेत. त्याचठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. विशेषतः झोपडपट्टी भागात कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. फुटपाथालाही कचराकुंडी करून टाकल्याचे काही ठिकाणी दिसून येते. स्वच्छता कर्मचारी दिसेनासे झाले आहेत. काही भागात घंटागाडी येत नाही. आली तर त्यावरील कर्मचारी रस्त्यावरील कचरा उचलत नाही. दुसरीकडे गंजमाळ, भीमवाडी, वडाळागाव अशा विविध भागांत सांडपाण्याची समस्या नागरिकांना भेडसावत असते. अशी परिस्थिती असेल तर मग स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश सार्थक होईल का, केवळ दिखाव्यासाठी आव तर आणला जात नाही ना, असे प्रश्‍न नागरिक करत आहे. 

ब्लॅक स्पॉट जैसे थे 

अनेक भागांमध्ये ब्लॅक स्पॉटची परिस्थिती जैसे थे आहे. कचऱ्याचे ढीग दिसून येत असतात. ब्लॅक स्पॉट कायमस्वरूपी नष्ट होण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत जनजागृती करणे आवश्‍यक आहे. दिवसातून दोनदा कर्मचाऱ्यांकडून त्याठिकाणची स्वच्छता केली पाहिजे. कुणी तेथे कचरा टाकणार नाही, याची काळजी घ्यावी. घंटागाडी नियमित आली पाहिजे. कर्मचाऱ्यांना ब्लॅक स्पॉटची स्वच्छता करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तर स्वच्छ भारत अभियानाचा टप्पा गाठणे शक्य होईल. 

हेही वाचा > तरुणाकडून धक्कादायक वस्तू सापडताच पोलीसही हैराण! युवावर्गाला सहज मिळणाऱ्या गोष्टीचा लावणार शोध?

स्वच्छ भारत अभियान नावाला न राबविता त्याचे महत्त्व प्रथम महापालिकेने समजून घ्यावे. आजही विविध भागांत कचऱ्याचे ढीग असतात. त्याचे कारण म्हणजे स्वच्छता कर्मचारी साफसफाईस येत नाही. त्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. - इरफान पठाण, नागरिक 

हेही वाचा > एकच व्यवहार आणि जर्मनीला उच्च शिक्षण घेण्याचे तरुणाचे स्वप्न क्षणार्धात भंगले! 

स्वच्छ भारत अभियानाचे संदेश देणारे फलक भिंतीवर रंगवून अभियान सफल होणार नाही. तर महापालिकेकडून प्रत्यक्षरीत्या स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. केवळ दिखावा करणे योग्य नाही. - पवन पगारे, नागरिक  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Clean survey campaign underdeveloped in Nashik nashik marathi news