कोरोनाचा फटका.. मका दरात घसरण 

corn crop 1.jpg
corn crop 1.jpg

मालेगाव : खरीप हंगामात लष्करी अळी, अवकाळी पावसामुळे मका उत्पादनात घट झाली. पर्यायाने मक्‍याला विक्रमी भाव मिळाला. राज्य शासनाचा हमीभाव एक हजार 760 रुपये असताना, बाजारभाव अडीच हजार रुपयांपर्यंत पोचला होता. मक्‍याचा दर पाहता मोजके मका उत्पादक व व्यापाऱ्यांनीही मकासाठा केला. यात उन्हाळ मक्‍याची आवक सुरू झाली. कोरोनाचा फटका व चिकनच्या अफवेमुळे कंपन्यांनी कमी माल खरेदी केला. त्याचा फटका मका उत्पादकांना बसून मक्‍याच्या दरात विक्रमी घसरण झाली. मक्‍याला सध्या सरासरी एक हजार 400 रुपये दर मिळत असल्याने शेतकरी व मका उत्पादकांचेही नुकसान झाले. 

व्यापाऱ्यांसह उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान 

मक्‍यावर लष्करी अळीचे आक्रमण झाले. मका भिजला. उत्पादन घटल्याने दर समाधानकारक मिळतील, ही शेतकऱ्यांची आशा प्रारंभी खरी ठरली. मात्र, मक्‍याचे बाजारभाव अवघे तीन महिने कायम राहिले. फेब्रुवारीच्या सुरवातीपासूनच मकादरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. यंदा उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यांनी भावाच्या आशेपोटी मका राखून ठेवला होता. व्यापाऱ्यांनीही खरेदी केलेल्या मक्‍याचा साठा केला होता. दरात घसरण होताच शेतकरी व व्यापाऱ्यांचा साठविलेला माल बाजारपेठेत आला. उन्हाळ मकाही सुरू झाल्याने दरात घसरण झाली. येथील बाजार समितीत मक्‍याच्या राशी पडल्या आहेत. मक्‍याचा साठा करायलाही जागा नाही, अशी स्थिती आहे. यातच युक्रेन व मलेशियातून चांगला मका आला. येथील मका ओला व डागी असल्याने कंपन्यांनी व्यापाऱ्यांकडून मका खरेदी करताना हात आखडता घेतला. यामुळेही दरात घसरण झाल्याचे येथील मका व्यापारी भिका कोतकर यांनी सांगितले. मध्यंतरी मालेगाव, बागलाण व उमराणे बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी दोन दिवस मका खरेदी बंद केली होती. कोरोना व्हायरसने चीनमध्ये धुमाकूळ घातला आहे. चिकन खाण्यामुळे त्रास होतो, ही अफवा पसरल्याने खवय्यांची "चिकन नको रे बाबा' अशी धारणा झाली. त्याचाही मोठा फटका बसला. पोल्ट्रीतील पक्ष्यांची उचल लांबणीवर पडली आहे. मक्‍यापाठोपाठ पोल्ट्री फीडला लागणाऱ्या सोयाबीनच्या दरात घसरण शक्‍य आहे. 
 
*कोरोनाचा फटका मका पिकाला 
*मकादरात विक्रमी घसरण 
*युक्रेन, मलेशियातून मका आयातीचा परिणाम 
*उन्हाळ मक्‍याच्या आवकेमुळे फटका 
*व्यापारी व मका उत्पादकांचेही नुकसान 
*पोल्ट्री फीड कंपन्यांची कमी खरेदी 
*पोल्ट्री फीडच्या उठावावर परिणाम 

मालेगाव बाजार समितीतील मक्‍याचे सरासरी भाव (आवक क्विंटलमध्ये) 
जुलै : 2 हजार 231 (आवक 148 क्विंटल) 
ऑगस्ट : 2 हजार 229 (99) 
सप्टेंबर : 2 हजार 131 (296) 
ऑक्‍टोबर : 1 हजार 793 (14 हजार 535) 
नोव्हेंबर : 1 हजार 641 (80 हजार 107) 
डिसेंबर : 1 हजार 798 (90 हजार 113) 
जानेवारी : 1 हजार 550 (6 हजार) 
फेब्रुवारी : 1 हजार 400 
हेही वाचा > सुनेला वाचविण्यासाठी 'ते' पुढे सरसावले!...तर मुलाने त्यांनाच

कोरोनाच्या धसक्‍यामुळे व चिकनसंदर्भात अफवा पसरल्याने चिकनची मागणी घसरली आहे. विविध पोल्ट्री फीड मिलमधील फीड गुदामे भरली आहेत. कोंबड्यांना फीड लागत आहे. तरीही विक्री व बाजारभावावर परिणाम झाला आहे. पाच हजार पिल्लांच्या पोल्ट्रीतील पक्ष्यांचे वजन लिफ्टिंगच्या वेळी अडीच टन असायचे. सध्या मागणी कमी झाल्याने पक्षी पडून आहेत. 42 दिवसांत पोल्ट्रीतून उचलले जाणारे पक्षी 50 ते 52 दिवसांनंतर उचलले जात आहेत. पक्ष्यांचे वजन तीन टन भरत असले, तरी आठ दिवसांचे जादा फीड खाऊ घालावे लागत आहे. भावामुळे उत्पादक, व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. -सुजित चव्हाण, फीड मिल प्रॉडक्‍शन व्यवस्थापक, ऊर्जा फूड्‌स ऍन्ड ग्रो प्रॉयव्हेट लिमिटेड, मंचर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com